coronavirus | सकारात्मक, मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा कालावधी 29 दिवसांवर!
मुंबईतील कोरोनाबाधित रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी म्हणजेच डबलिंग रेट 29 दिवसांवर पोहोचला आहे. रुग्णवाढीचा सरासरी दर कमी होऊन 2.43 टक्क्यांवर आला आहे.
मुंबई : महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात कोरोना व्हायरसचा सर्वाधिक प्रादुर्भाव झालेलं शहर म्हणजे मुंबई. कोरोनाचा सर्वात मोठा हॉटस्पॉट अशी ओळख मुंबई शहराची बनली होती. परंतु हीच ओळख लवकरच पुसली जाऊ शकते. कारण मुंबईतील कोरोनाबाधित रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी म्हणजेच डबलिंग रेट 29 दिवसांवर पोहोचला आहे. रुग्णवाढीचा सरासरी दर कमी होऊन 2.43 टक्क्यांवर आला आहे. डबलिंग रेट माटुंग्यात सर्वात जास्त असून दहिसरमध्ये सर्वात कमी आहे. त्यामुळे मुंबईचे वाईट दिवस संपले आहेत, असं म्हटलं तरी वावगं ठरणार आहे. ही गोष्ट मुंबईसह राज्यासाठी अतिशय सकारात्मक आणि दिलासादायक आहे.
"मुंबईचा रुग्णसंख्या वाढीच्या दराचा आलेख खाली आला किंवा त्या मार्गावर आहे. हाच ट्रेण्ड महिनाभार कायम राहिला तर कोविड-19 ला अतिशय सहजरित्या हाताळू शकतो. कोरोना रुग्णांचा डबलिंग रेट 13 मेपासून मोठ्या प्रमाणात सुधारला आहे," अशी माहिती राज्याच्या कोविड टास्क फोर्समधील सदस्य डॉक्टर शशांक जोशी यांनी दिली.
इंडियन कॉलेज ऑफ फिजिशियनचे डीन डॉ. शशांक जोशी म्हणाले की, "कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या ही कोरोनाबाधितांच्या जवळपास पोहोचली आहे. तसंच रुग्ण दुप्पटीचा कालावधी 30 दिवसांच्या जवळ पोहोचल्याने, मुंबईतून ही महामारी जाण्याच्या उंबरठ्यावर आहे. जर आपण सोशल डिस्टन्सिंग पाळलं, सतत हात धुतले, मास्क वापरले तर आपण कोरोनाचा दुसरा पीक टाळू शकतो.
"एकदा का डबलिंग रेट 30 दिवसांवर पोहोचला तर अतिरिक्त बेड्सची गरज मोठ्या प्रमाणात कमी होईल. तर डबलिंग रेट 32 दिवसांवर पोहोचला तर मुंबई महापालिकेला सध्या उपलब्ध बेड्समध्येच चौपट रुग्णांवर उपचार करता येईल," असं बीएमसीची आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सांगितलं.
विशेष म्हणजे दोन महिन्यांपूर्वी कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेले मुंबईतील वरळी, धारावी आणि वांद्रेसारख्या परिसरातील रुग्णसंख्या वाढीचा दर खाली आहे.
दरम्यान मुंबईत काल (17 जून) 1359 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाल्याने एकट्या शहरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 61 हजार 587 वर पोहोचला आहे. आतापर्यंत 3244 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.