येत्या 8 दिवसात ठाणे खड्डेमुक्त होणार, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
ठाणे शहरातील रस्ते येत्या 8 दिवसात खड्डेमुक्त करणार असल्याचे आश्वासन पालकमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिले आहे.
ठाणे : पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज खड्ड्यांमुळे चाळण झालेल्या ठाण्यातील रस्त्यांची पाहणी केली. गेल्या अनेक दिवसांपासून याच खड्ड्यांमुळे संपूर्ण ठाणे शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होते आणि याचा खूप मोठा फटका वाहनचालकांना बसतोय. त्यामुळेच एकनाथ शिंदे यांनी स्वतः सर्व रस्त्यांची पाहणी करून पुढील आठ दिवसात खड्डे बुजवले जातील असे आश्वासन आज दिले आहे.
एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याची सुरुवात मुलुंडच्या आनंद नगर टोल नाका येथून झाली. त्या ठिकाणी त्यांनी एमएमआरडीए, एमएसआरडीसी, सार्वजनिक बांधकाम खाते आणि ठाणे महानगर पालिकेच्या अधिकारी आणि अभियंत्यांना धारेवर धरले. इथून पुढे तीन हात नाका येथे सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाची पाहणी त्यांनी केली. हे काम करत असलेल्या कंत्राटदाराला त्यांनी चांगले काम करण्याची समज दिली. हा दौरा पुढे आनंद नगर नाका, घोडबंदर रोड वर पोहोचला. या ठिकाणी देखील रस्त्याची दुर्दशा पाहून लवकरात लवकर काम पूर्ण करण्याचे आदेश शिंदे यांनी दिले. तिथून पुढे घोडबंदर रोडवरील गायमुख जवळ ज्याठिकाणी खड्ड्यामुळे एका तरुणाचा जीव गेला त्या ठिकाणी सुरू असलेल्या कामांची पाहणी एकनाथ शिंदे आणि खासदार राजन विचारे यांनी केली. तिथे जे डांबरीकरण सुरू होते ते निकृष्ट दर्जाचे असल्याने ठेकेदाराला शिंदे ओरडले. घोडबंदर रोडवरून पुन्हा यु टर्न घेऊन दौरा मुंबई नाशिक हायवे वरून थेट पडघा इथे पोहचला. इथे तर टोल नाका हाकेच्या अंतरावर होता तरी रस्त्यावर मोठमोठे खड्डे दिसून येत होते. याठिकाणी टोल घेणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्याने हात जोडून सर्वांची माफी मागितली आणि पुढील पंधरा दिवसात हा रस्ता व्यवस्थित करून देण्याचे आश्वासन त्याने दिले.
या रस्ते पाहणी दौऱ्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पुढील 8 दिवसात सर्व रस्ते दुरुस्त होतील असे आश्वासन दिले आहे. तर सर्व सरकारी संस्थांच्या समन्वयाची जबाबदारी एका नोडल ऑफिसारला देऊन हे काम पूर्ण करणार असल्याचे ते म्हणाले. तसेच मुंबई नाशिक हायवेच्या समस्येबद्दल थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी स्वतः चर्चा करणार असल्याचे शिंदे म्हणाले. पून्हा 8 दिवसांनी याच रस्त्यांची पाहणी करून कामे झाली नसल्यास त्या अधिकारी आणि ठेकेदारावर कठोर कारवाई करणार असे त्यांनी जाहीर केले.