Thane Unlock : ठाण्यात निर्बंधात शिथिलता आणल्यानंतर 'कही खुशी कही गम'!- नेमकं काय झालंय?
ठाणे जिल्ह्यातील निर्बंध शिथिल करूनही कही खुशी कही गम असेच वातावरण बघायला मिलत आहे. वेळ वाढवून दिल्याने दुकानदार आनंदात तर निर्बंध शिथिल न केल्याने हॉटेल मालक बेमुदत संपाचा पावित्र्यात आहेत.
ठाणे : ठाणे जिल्ह्यातील निर्बंध शिथिल करूनही कही खुशी कही गम असेच वातावरण बघायला मिलत आहे. वेळ वाढवून दिल्याने दुकानदार आनंदात तर निर्बंध शिथिल न केल्याने हॉटेल मालक बेमुदत संपाचा पावित्र्यात आहेत.
मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आणि राज्यातील अनेक जिल्ह्यांचे निर्बंध शिथिल करण्यात आले. मात्र मुंबई आणि आसपासच्या महानगरातील निर्बंध शिथिल करायचे की नाही याबाबत स्थानिक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांना निर्णय घेण्यास सांगण्यात आले. त्यानुसार ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी ठाण्यातील निर्बंध शिथिल केले. हॉटेल आणि रेस्टॉरंट सोडून सर्व दुकाने यांना रात्री दहा पर्यंत वेळ वाढवून देण्यात आली आहे त्यामुळे दुकानदार आनंदात आहेत. निर्बंध शिथिल करून वेळ वाढवून दिल्याने ठाणे स्टेशन मार्केट मधील दुकानदारांनी सरकारचे आभार देखील मानले आहेत.
ठाण्यातील एक हॉटेल मालक पराग सावके, 2019 च्या नोव्हेंबर मध्ये त्यांनी ठाणे कॅन्टीन नावाने नवीनच हॉटेल सुरू केले, पण लगेच मार्चमध्ये लॉकडाऊन लागला आणि त्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरले. "आज माझ्यावर कर्ज आहे, कर्मचाऱ्यांचे पगार थकले आहेत, सरकारचा टॅक्स भरायचा आहे, असे सगळे असताना नियमात पण शिथिलता नाही", असे पराग सावके यांनी सांगितले.
मात्र यामधून हॉटेल आणि रेस्टॉरंट यांना वगळण्यात आल्याने ते आता संघर्षाच्या भूमिकेत आहेत. सोमवार पर्यंत नियमात बदल नाही केला तर हॉटेल बेमुदत बंद करण्याचा इशाराच त्यांनी दिलाय. "एक तर सरकारने रात्री 10 पर्यंत आम्हाला मुदत द्यावी किंवा संध्याकाळी 6 ते रात्री 12 पर्यंत आम्हाला परवानगी द्यावी, नाहीतर सोमवार पासून ठाण्यात 1 हजार पेक्षा जास्त हॉटेल्स बंद राहतील, पार्सल सेवा देखील आम्ही सुरू ठेवणार नाही", असे ठाणे हॉटेल ओनर्स असोसिएशनचे ॲडव्हायझर रत्नाकर शेट्टी यांनी सांगितले.
ठाणे जिल्ह्यातील विरारमध्ये एका हॉटेल व्यावसायिकाने गेल्याच महिन्यात नुकसान सहन न झाल्याने स्वतःच्याच हॉटेलमध्ये आत्महत्या केली. त्यानंतर तरी सरकारला जाग येईल असे वाटत होते मात्र तसे झाले नाही. तसेही जी वेळ सरकारने दिली आहे त्यात काहीच व्यवसाय होत नसल्याने बेमुदत बंद करून सरकारला जागे करण्याचा प्रयत्न हॉटेल मालक करत आहेत. आता तरी सरकारला जाग येणार का? हा खरा प्रश्न आहे.