ठाणे पालिका आरोग्य अधिकारी डॉ. मुरूडकर यांना 5 लाखांची लाच घेताना अटक
इमिनोशॉप इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने ठाणे महानगर पालिकेला 30 व्हेंटिलेटर पुरवण्यासाठी निविदा भरल्या होत्या. ही निविदा 1.5 कोटींची होती. ती मंजूर करण्यासाठी मुरुडकर यांनी एकूण रकमेच्या 10 टक्के म्हणजेच 15 लाखाची मागणी केली होती.
ठाणे : ठाणे महानगर पालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. राजू मुरुडकर याना गुरुवारी संध्याकाळी लाचलुचपत खात्याच्या पथकाने 5 लाख रुपये घेताना अटक केली. डॉ. राजू मुरुडकर हे ठाणे महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाचे प्रमुख आहेत. सध्या कोविड काळात सर्व कंत्राटे आणि हॉस्पिटल विषयक व्यवहार त्यांच्याच माध्यमातून केले जात होते. याच गोष्टीचा गैरफायदा मुरुडकर यांनी घेऊन कंत्राट देण्यासाठी लाच मागितली आणि ते एसीबीच्या जाळ्यात अडकले. त्यांच्या विरोधात रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इमिनोशॉप इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने ठाणे महानगर पालिकेला 30 व्हेंटिलेटर पुरवण्यासाठी निविदा भरल्या होत्या. ही निविदा 1.5 कोटींची होती. ती मंजूर करण्यासाठी मुरुडकर यांनी एकूण रकमेच्या 10 टक्के म्हणजेच 15 लाखाची मागणी केली होती. त्यापैकी 5 लाख रुपयांचा पहिला हफ्ता स्वीकारण्यासाठी आज ते स्वतःच्या लाईफ लाईन या हॉस्पिटलमध्ये संध्याकाळी आले होते. तिथे आधीच लाच लुचपत प्रतिबंधक टीम सापळा लावून हजर होती. त्यामुळे ही लाच घेताना मुरुडकर यांना रंगेहाथ पकडण्यात आले.
डॉ. मुरुडकर हे पहिल्यांदाच चर्चेत आले असे नाही. मागील महिन्यात एका आरटीआय कार्यकर्त्याने माहितीच्या अधिकारात मागितलेल्या माहितीत मुरुडकर यांचे 4 खासगी रुग्णालय असल्याचा आरोप केला होता. तर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील काही दिवसांपूर्वी मुंब्रा येथील कोविड हॉस्पिटल मधील साधनसमग्री चोरल्याचा आरोप केला होता. त्याबाबत चौकशी करण्याचे आदेश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते.
ठाण्यात कोविड चाचणीसाठी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या रांगा
मागील संपूर्ण आठवडा रुग्णाची संख्या ही मनात धडकी भरविणारी ठरत आहे. रुग्णसंख्येच्या वाढीसोबतच रुग्णांच्या मृत्यूचा आकडाही वाढला आहे. ठाण्यात रुग्णांना बेड अपुरे पडत आहेत. यासर्व गोष्टींमुळे आणि पालिकेने अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी सक्तीची केल्याने आपण कोरोनाचे शिकार झाले आहोत काय? याची चाचपणी करण्यासाठी विविध चाचणी केंद्रावर पालिका आस्थापना आणि अत्यावश्यक सेवेचे कर्मचारी यांनी आज गर्दी केलेली बघायला मिळाली. ठाणे महापालिका हद्दीत कोरोना चाचणीचे 12 केंद्र आहेत. यातील मानपाडा, टेम्भी नाका, कळवा, वागळे इस्टेट, सावरकर नगर, लोकमान्य नगर अशा विविध केंद्रावर आरटीपीसीआर आणि अँटीजेन अशा चाचण्या करण्यासाठी गर्दी झालेली होती.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Thane Corona : ठाण्यात कोविड चाचणीसाठी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या रांगा