TMC Budget : पेपर फुटीनंतर आता ठाणे महानगरपालिकेचा अर्थसंकल्प देखील फुटला?
TMC Budget : अंदाजपत्रकाच्या महत्त्वाच्या बाबी आणि एकूण अंदाजपत्रकाची रक्कम एका स्थानिक वृत्तपत्रात छापून आल्यामुळे विरोधकांनी एकच गोंधळ माजवला.
ठाणे : ठाणे महानगरपालिकेचा आज अर्थसंकल्प सादर करण्यात आला. मात्र या अर्थसंकल्पाच्या सादरीकरणानंतर दिवसभर विरोधकांनी ठाणे महानगरपालिकेच्या प्रशासनावर प्रचंड आरोप केले. त्यांनी आयुक्तांचा राजीनामा देखील मागितला आहे.
आज ठाणे महानगरपालिका आयुक्त डॉक्टर विपीन शर्मा यांनी स्थायी समिती अध्यक्ष संजय भोईर यांना 2022-23 चे मूळ अंदाजपत्रक सुपूर्त केले. मात्र याच अंदाजपत्रकाच्या महत्त्वाच्या बाबी आणि एकूण अंदाजपत्रकाची रक्कम एका स्थानिक वृत्तपत्रात छापून आल्यामुळे विरोधकांनी एकच गोंधळ माजवला. मूळ अंदाज पत्रक म्हणजेच अर्थसंकल्प हा एक गोपनीय दस्तावेज असतो. हा अर्थसंकल्प स्थायी समिती सदस्यांना देखील कालपर्यंत दिला गेला नव्हता. मग तो एखाद्या वृत्तपत्रात कसा छापून आला असा सवाल करत मनसेने देखील थेट आयुक्तांच्या कार्यालयात जाऊन राडा केला.
मनसे आणि काँग्रेस सोबतच भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे देखील आजच्या अर्थसंकल्पाला विरोध दर्शवला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस गोपनीयतेचा भंग झाल्याची तक्रार थेट पोलीस स्टेशनला करणार आहे. तर भाजपकडून हा अर्थसंकल्प रद्द करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.
ज्या वृत्तपत्रात अर्थसंकल्पाबाबत बातमी छापून आली. वृत्तपत्र शिवसेनेच्या जवळचे असल्यामुळेच त्यांना बातमी दिली गेली, असा आरोप विरोधकांनी केला आहे. तर याची चौकशी होईल असे आश्वासन आयुक्त डॉक्टर बीपी शर्मा यांनी दिले आहे. एकूणच आज विरोधकांनी उठवलेल्या या वादामुळे पुढचे काही दिवस तरी ठाण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापणार आहे. ह्या एका मुद्द्यावर सर्व विरोधक एकत्रित झाले असतानाच शिवसेना मात्र मूग गिळून गप्प का असा सवाल देखील निर्माण होत आहे.
संबंधित बातम्या :
TMC Budget: कोणतीही करवाढ नसलेला ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प जाहीर; विरोधकांचा हल्लाबोल
Maharashtra Omicron Cases: राज्यात आज ओमायक्रॉनच्या 121 रुग्णांची नोंद, सर्वाधिक रुग्ण नागपूरात आढळले