कल्याण-डोंबिवली महापालिकेत अधिकाऱ्यांच्या संगनमतानं 'टॅक्स घोटाळा'?
कल्याण-डोंबिवली महापालिकेत टॅक्स घोटाळा होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. अधिकाऱ्यांच्या संगनमताने हा घोटाळा होत असल्याचा आरोप स्थायी समिती सभापतींनी केला आहे.
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेत टॅक्स घोटाळा होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. अधिकाऱ्यांच्या संगनमताने हा घोटाळा होत असल्याचा आरोप स्थायी समिती सभापतींनी केला आहे. गेल्या दोन वर्षात यामुळे केडीएमसीचं 19 कोटी 60 लाख रुपयांचं नुकसान झालं आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात करबुडव्यांची संख्या मोठी आहे. आर्थिक वर्ष संपत येताच प्रभाग अधिकाऱ्यांना थकबाकी वसूल करण्याचं टार्गेट केडीएमसीकडून दिलं जातं. अशावेळी केडीएमसीचे अधिकारी थकबाकीदारांकडून मोठ्या रकमेचे पोस्ट डेटेड म्हणजे पुढच्या आर्थिक वर्षातल्या तारखेचे चेक घेतात. मात्र चालू आर्थिक वर्ष संपल्यानंतर हे चेक बँकेत टाकले की ते बाऊन्स होतात. अशाप्रकारे केडीएमसीत मागील 2 वर्षात तब्बल 19 कोटी 60 लाख रुपयांचे चेक बाऊन्स झाले आहेत.
एकीकडे केडीएमसीत असलेल्या आर्थिक चणचणीमुळे विकासकामांना खीळ बसत आहे. त्यात दरवर्षी असे प्रकार होत असल्यानं यामागे अधिकारी आणि थकबाकीदारांचं संगनमत असल्याचा आरोप स्थायी समिती सभापती राहुल दामले यांनी केला आहे. या थकबाकीदारांची यादी 'एबीपी माझा'च्या हाती लागली असून त्यात प्रभाग समितिनिहाय थकबाकीची आकडेवारीही नमूद करण्यात आली आहे.
चेक बाऊन्स होणं हा फौजदारी गुन्हा असतानाही गेल्या दोन वर्षात या थकबाकीदारांवर केडीएमसीनं कुठलीही फौजदारी कारवाईही केलेली नाही. त्यामुळे या सगळ्यात अधिकारी आणि थकबाकीदार आशा दोघांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्याची मागणी स्थायी समिती सभापती राहुल दामले यांनी केली. या नव्या आर्थिक घोटाळ्यामुळे केडीएमसीचे अनेक अधिकारी अडचणीत येण्याची शक्यता आहे.