Tata Mumbai Marathon : मुंबई मॅरेथॉन स्पर्धेला तुफान प्रतिसाद आणि उत्साह, कोणी मारली बाजी? वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
मुंबईतीलच नव्हे, महाराष्ट्र, देश-विदेशातील धावपटू मुंबई मॅरेथॉनमध्य सहभागी होते. मॅरेथाॅनचं यंदाचं19 वं वर्ष होतं. अशात, मॅरेथाॅन अमॅच्युअरमध्ये यंदा अनेक धावपटू सहभागी झाले होते.
मुंबई: घड्याळाच्या काट्याशी नातं सांगणारी मुंबईनगरीत (Mumbai) आज टाटा मुंबई मॅरेथॉन (Mumbai Tata Marathon) मोठ्या उत्साहात पार पडली. पहाटे सव्वा पाच वाजल्यापासून मुंबई मॅरेथॉनमधल्या वेगवेगळ्या शर्यतींना सुरुवात झाली. मुख्य मॅरेथॉन भारतीय पुरुष गटात श्रिनु बुगाथाने अव्वल स्थान पटकावलं आहे. तर पूर्ण मॅरेथॉन पुरुष गटात इथोपिआच्या हायली लेमी आणि पूर्ण मॅरेथॉन महिला गटात अबेराश मिनसिवो बाजी मारली आहे.
दरवर्षी मुंबई मॅरेथॉन स्पर्धा वेगवेगळ्या गटांमध्ये आयोजित होते. यात 42 किमी फुल मॅरेथॉन मुख्य स्पर्धा असते. 21 किमी हाफ मॅरेथॉन, ड्रीम रन अशी वेगवेगळ्य़ा गटांसाठी सुद्धा स्पर्धा होते. यंदा मुंबई मॅरेथॉनमध्ये 59 हजारपेक्षा जास्त स्पर्धक सहभागी झाले होते. फक्त मुंबईतीलच नव्हे, महाराष्ट्र, देश-विदेशातील धावपटू मुंबई मॅरेथॉनमध्य सहभागी होते. मॅरेथाॅनचं यंदाचं19 वं वर्ष होतं. अशात, मॅरेथाॅन अमॅच्युअरमध्ये यंदा अनेक धावपटू सहभागी झाले होते.
टाटा मुंबई मॅरेथॉन 2024 विजेते
पूर्ण मॅरेथॉन (पुरुष)
- हायली लेमी (इथोपिआ)
- हेमानॉट अल्यू (इथोपिआ)
- मित्कु तफा (इथोपिआ)
पूर्ण मॅरेथॉन (महिला)
- अबेराश मिनसिवो (इथोपिआ)
- मूलूअबट तेसगा (इथोपिआ)
- मेधिन बेजेनी (इथोपिआ)
पूर्ण मॅरेथॉन (भारतीय गट)
- श्रिनु बुगाथा
- गोपी थोनकल
- शेरसिंह तन्वर
- अर्ध मॅरेथॉन (पुरुष)
- सावन बरवाल
- किरण म्हात्रे
- मोहन सैनी
अर्ध मॅरेथॉन (महिला)
- अमरीता पटेल
- पूनम दिनकर
- कविता यादव
मुंबई मॅरेथाॅन आयोजकांचा गलथान कारभार समोर
मुंबई मॅरेथाॅन आयोजकांना गलथान कारभार समोर आला आहे. मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या अनेक धावपटूंना मेडलच मिळाली नाहीत, आयोजकांकडून मेडल्स हरवल्याचे स्पर्धकांना उत्तरं देण्यात आले आहे. मेडल्स मिळत असलेल्या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आयोजकांना स्पर्धकांच्या रोषाला सामोरे जावं लागले. स्पर्धकांच्या गोंधळानंतर पोलिसांनी मेडल काऊंटरचा ताबा घेतला. पोलिस उपायुक्त प्रविण मुंढे यांच्याकडून स्पर्धकांना समजवण्याचा प्रयत्न केला जात आहे.स्पर्धकांची संख्या आणि मेडल्सचा ताळमेळ न जमल्याने आयोजकांची गोची झाली आहे.
मुंबई मॅरेथॉनच्या निमित्तानं मुंबई वाहतूक पोलिसांकडून रात्रीपासूनच शहरात अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली होती. तसंच मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या सर्व धावपटूंना उपनगरीय लोकलनं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचण्याची सूचना करण्यात आली होती. मुंबई मॅरेथॉनमधल्या मुख्य शर्यतीचा मार्ग हा सीएसएमटी - हुतात्माचौक - चर्चगेट - मरिन ड्राईव्ह - पेडर रोड - हाजी अली - वांद्रे वरळी सागरी सेतू मार्ग - माहिम - प्रभादेवी - हाजी अली आणि तिथून पुन्हा सीएसएमटी असा होता.