कॉक्स अँड किंग्ज आर्थिक घोटाळा प्रकरणातील मुख्य साक्षीदाराचा संशयास्पद मृत्यू! हत्या की आत्महत्या चर्चेला उधाण
कॉक्स अँड किंग्ज आर्थिक घोटाळा प्रकरणातील मुख्य साक्षीदाराचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. कंपनीचा माजी फायनान्स एक्झिक्यूटिव्ह सागर देशपांडे यांचा मृतदेह टिटवाळा स्टेशन जवळ रेल्वे ट्रॅकवर आढळून आला आहे.
मुंबई : गेल्या 11 ऑक्टोबरपासून बेपत्ता असलेल्या कॉक्स अँड किंग्ज कंपनीचे माजी फायनान्स एक्झिक्यूटिव्ह सागर देशपांडे यांचा मृतदेह टिटवाळा स्टेशन जवळ रेल्वे ट्रॅकवर आढळून आला आहे. एका मोठ्या आर्थिक घोटाळ्यातील महत्त्वाचे साक्षीदार असल्याने सागर यांच्या मृत्यूमुळे संशयाचे वलय निर्माण झाले आहे.
सागर देशपांडे, (वय 38) हा कॉक्स अँड किंग्ज आर्थिक घोटाळा प्रकरणातील मुख्य साक्षीदार आहे. या संपूर्ण प्रकरणातील तपास आणि त्याचा निकाल या एका व्यक्तीच्या साक्षीवर अवलंबून होता. मात्र, हा व्यक्तीच आता या जगात नाहीये. 11 तारखेला टिटवाळा इथे जातो सांगून सागर घराबाहेर पडले. मात्र, पुन्हा परतले नाही. एक दिवसानंतर त्यांच्या कुटुंबाने ठाण्यातील नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये हरवल्याची तक्रार नोंदवली. त्यानुसार नौपाडा पोलिसांनी शोध सुरू केला.
सागर देशपांडे घरातून गायब झाल्याच्या दुसऱ्या दिवशी कल्याण लोहमार्ग पोलिसांकडे एका अपघाती मृत्युची नोंद झाली होती. बारा तारखेला झालेल्या या अपघातातील व्यक्ती आणि सागर देशपांडे यांच्या वर्णनात साधर्म्य आढळल्याने नौपाडा पोलिसांनी काल म्हणजे शनिवारी या ठिकाणी जाऊन माहिती घेतली असता तो मृतदेह सागर देशपांडेचा असल्याचे निष्पन्न झाले. कल्याण लोहमार्ग पोलीस मधील वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाल्मिकी शार्दुल यांनी सांगितले की, "12 तारखेला आम्हाला एक डेड बॉडी सापडली, आम्ही ADR ची नोंद केली, नंतर तो मृतदेह ठाण्यातील सीएचा असल्याचे समजले, यात आत्महत्या की हत्या याचा शोध आम्ही घेत आहोत. मात्र, यापेक्षा अधिक माहिती माझ्याकडे नाही". सागर यांच्या नातेवाईकांना देखील मृतदेहाची ओळख पटली. मात्र, सागर यांच्या मृत्यूमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले. कारण कॉक्स अँड किंग्ज आर्थिक घोटाळ्यातील सागर हे मुख्य साक्षीदार होते.
काय आहे कॉक्स अँड किंग्ज प्रकरण? येस बँक घोटाळा उघड झाल्यानंतर सक्तवसुली संचालनालयाने म्हणजेच ईडीने या प्रकरणाची चौकशी सुरू केली. बँकेचे संस्थापक राणा कपूर यांनी ज्या विविध उद्योग समूहांना बेकायदेशीररित्या कर्जवाटप केले होते त्यापैकी एक कॉक्स अँड किंग्ज ही कंपनी होती. कॉक्स अँड किंग्जने, येस बँकेच्या 3 हजार 642 कोटी रुपयांच्या कर्जाचा अपहार केल्यामुळे बँकेचे सी एफ ओ अनील खंडेलवाल आणि अंतर्गत ऑडिटर नरेश जैन यांना ईडीने अटक केली होती. तसेच यात इतर बड्या अधिकाऱ्यांचा देखील समावेश होता.
सागर देशपांडे हे चार्टर्ड अकाउंटंट होते तसेच ते या ट्रॅव्हल कंपनीत जुलै 2010 पासून कार्यरत होते. सागर या कंपनीच्या फायनान्स एक्झिक्यूटिव्ह पदावर असल्याने आणि येस बँक घोटाळा प्रकरणाशी संबंधतीत हे प्रकरण असल्याने ईडीने देशपांडे यांची मार्च महिन्यात साक्षीदार म्हणून चौकशी केली होती.
अनैतिक संबंधातुन तिहेरी हत्याकांड! मलकापूर तालुक्यातील घटना
मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाने देखील याप्रकरणी सागर यांची चौकशी केली होती. त्यात अनेक महत्त्वाचे खुलासे सागर यांनी केले होते. तसेच कंपनीच्या इतर व्यवहाराबद्दल देखील महत्त्वाची कागदपत्रे पुरवण्याचे आश्वासन पोलिसांना दिले होते. याच प्रकरणी 13 तारखेला सागर यांची पुन्हा चौकशी होणार होती. मात्र, 11 तारखेला सागर गायब झाले आणि बारा तारखेला त्यांचा मृत्यू झाला होता.
सुत्रांच्या माहितीप्रमाणे ज्यावेळी सागर यांचा मृतदेह सापडला. त्यावेळी कोणत्याही मोटरमन किंवा लोको पायलेटने त्यांच्या ट्रेन खाली आत्महत्या झाल्याची नोंद केली नाही. तसेच सागर यांच्या मृतदेहाच्या ठिकाणापासून लांब असलेल्या रेल्वे फाटका शेजारी त्यांची गाडी आढळून आली आहे. या सर्व गोष्टींमुळे सागर यांच्या मृत्यूवर संशयाचे धुके निर्माण झाले आहे. सागर यांची हत्या झाल्याचे किंवा त्यांना आत्महत्येला प्रवृत्त केल्याचे देखील बोलले जात आहे. मात्र, जोपर्यंत सागर यांच्या मृत्यूमुळे कोणाकोणाला फायदा होणार आहे हे पोलीस शोधून काढत नाहीत तोपर्यंत ही हत्या होती की आत्महत्या हे देखील निष्पन्न होणार नाही.
Wadhwan Property Seized | वाधवान बंधूंची 1411कोटींची संपत्ती जप्त, येस बॅंक घोटाळ्याप्रकरणी कारवाई