सुषमा अंधारेंचा शिवसेना प्रवेश, पक्षात येताच मिळालं उपनेतेपद; प्रवेशावेळी भावूक होत अंधारे म्हणाल्या...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि चळवळीतील कार्यकर्त्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत अंधारे (Sushma Andhare) यांनी शिवबंधन बांधलं.
Sushma Andhare join Shiv sena : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर मागील काही दिवसांपासून उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) यांच्या शिवसेनेतून आऊटगोईंग सुरु होतं. पण आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये इनकमिंग सुरु झालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि शाहू- फुले-आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सुषमा अंधारे यांनी शिवबंधन बांधलं.
यावेळी त्या भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. पक्षात येताच त्यांना उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसेना उपनेतेपदाचं गिफ्ट देखील मिळालं आहे. प्रवेशावेळी विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे, आदित्य ठाकरे उपस्थित होते.
यावेळी ईडी , सीबीआय , निवडणूक आयोग यांचा पाशवी वापर करून संविधानिक चौकट तोडली जात आहे. ज्यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले होते की, माझं हिंदुत्व हे शेंडी आणि जाणव्याचे नाही. तेव्हा मी ठरवलं की शिवसेनेत जायचे. माझ्या डोक्यावर कुठल्या ईडीचं ओझं नाही आणि मला कुठलेही प्रलोभन नाही. आणि मला अजून पीठ मिठाचे मातोश्रीमधील डबे माहित नाहीत. मी नवीन आहे. नीलमताई माझ्यासाठी आईप्रमाणे आहेत. अनेक जण म्हणाले की, मी टीका केली होती. पण आमचं एकच संविधानिक शत्रू असेल तर मी त्यांचे नेतृत्व स्वीकारायला तयार आहे, असं त्यांनी म्हटलं.
आता पुन्हा सामान्य सैनिकांना असामान्य करण्याची वेळ - उद्धव ठाकरे
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, आम्ही 3 तास बोलत होतो, विविध विषयांवर बोललो, मला भूक लागली म्हणून मी म्हणालो नंतर भेटू, त्यांचा दुसऱ्या दिवशी फोन आला की मला शिवसेनेमध्ये यायचे आहे. आता देखील 2 लढाया सुरू आहेत. एक सुप्रीम कोर्टात आहे त्याबद्दल मला बोलायचे नाही. पण एका गोष्टीचे कौतुक वाटते की वेगळ्या विषयाच्या ताई आज आल्या. ज्यांना सामान्यांचे असामान्य केले ते निघून गेले, पुन्हा सामान्य व्हायला, आता पुन्हा सामान्य सैनिकांना असामान्य करण्याची वेळ आली आहे. नसलेल्या शिवसेनेची तिकडे बांधणी सुरू आहे, ते सोडा आता आपल्याला शिवसेनेची पुनर्बांधणी करायची आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
कोण आहेत सुषमा अंधारे?
1) कोरेगाव भीमा प्रकरणात मिलींद एकबोटे आणि संभाजी भिडे यांच्यावर कारवाई करण्याबाबत फिर्याददार
2) शाहू-फुले-आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्या
3) गणराज्य संघाच्या प्रमुख. या संघामार्फत संविधानिक हक्कांबाबत जनजागृती करण्याचं काम
4) लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि विधानसभा निवडणुकीत त्यांनी आपल्या गणराज्य संघचा राष्ट्रवादीला पाठींबा दिला.
5) विधानसभा निवडणुकीनंतर विधान परिषदेवर संधी मिळण्याची आशा मात्र पक्षाकडून अमोल मिटकरी यांना पक्षाकडून विधानपरिषदेवर संधी
6) राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी संधी मिळण्याची आशा मात्र त्यावेळी देखील संधी न मिळाल्यामुळे नाराजीचा सूर
7) मागील काही दिवसांपासून सचीन अहिर यांच्या माध्यमातून शिवसेनेत प्रवेश करण्याबाबत चर्चा