(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कांजूरमार्गच्या जागेवर केंद्राचा दावा धक्कादायक! ती जमीन राज्याचीच : सुप्रीया सुळे
प्रस्तावित मेट्रो कारशेडसाठी कांजूरमार्गच्या जागेवर केंद्र सरकारने दावा केल्याचं वृत्त आहे.कुठल्याही कायद्याप्रमाणे ज्या राज्याची जमीन असते त्याचा त्यावर पहिला अधिकार असतो : खासदार सुप्रीया सुळे
मुंबई : मेट्रो कारशेडसाठी आरेच्या जागेला पर्याय म्हणून मुख्यमंत्र्यांनी कांजूरमार्गच्या जागेची घोषणा केली. परंतु, आता या जागेवर केंद्र सरकारने दावा केल्याचं वृत्त आहे. यावर खासदार सुप्रीया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कांजूरमार्गच्या जागेवर केंद्राने केलेला दावा धक्कादायक आहे. ती जमीन महाराष्ट्र सरकारची आहे. कुठल्याही कायद्याप्रमाणे ज्या राज्याची जमीन असते त्याचा त्यावर पहिला अधिकार असतो. केंद्र सरकार सातत्याने राज्याचे सगळे अधिकार काढून घेण्याचं काम करतंय, अशी प्रतिक्रिया खासदार सुळे यांनी दिली आहे.
केंद्राच्या उद्योग संवर्धन आणि अंतर्गत व्यापार (डीआयपीपी) मंत्रालयाने राज्याचे मुख्य सचिव सचिन कुमार यांना पत्र पाठवून कारशेडच्या जागेवर आपला हक्क सांगितल्याचं समोर येत आहे. "कांजूरमार्गची जागा मिठागराची असून, त्यावरील हक्क आम्ही सोडलेला नाही. 'एमएमआरडीए'ने यापूर्वीही या जागेवर प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव पाठवला होता, मात्र तो फेटाळला होता. आता या जागेवर परस्पर कारशेड उभारलं जात असून, ते चुकीचं आहे. त्यामुळे केंद्र सरकारचं मोठं नुकसान होणार आहे. याबाबत तातडीने हस्तक्षेप करत एमएमआरडीने सुरु केलेलं कारशेडचं काम थांबवावं, असं या पत्रात म्हटलं आहे.
काय म्हणाल्या खासदार सुप्रीया सुळे?
कांजूरमार्गच्या जागेवर केंद्राने दावा धक्कादायक आहे. ती जमीन महाराष्ट्र सरकारची आहे. कुठल्याही कायद्याप्रमाणे ज्या राज्याची जमीन असते त्याचा त्यावर पहिला अधिकार असतो. केंद्र सरकार सातत्याने राज्याचे सगळे अधिकार काढून घेण्याचं काम करत आहे. त्यांच्या कृतीतून ते दिसतंय, हे दुर्दैवी आणि निंदाजनक आहे. भाजपचे नेते कोणत्या आधारावर टीका करत आहेत? जमीन महाराष्ट्राची आहे ती विकास कामासाठी वापरली जातेय.
कांजूरमार्ग मेट्रो कारशेडच्या जागेवर केंद्राचा दावा, फलकही लावला!
या देशात केंद्र सरकार हळूहळू आणीबाणी आणतंय असं चित्र आहे. महाराष्ट्र हे सुसंस्कृत राज्य आहे. मंदिरांचे टाळे तोडण्याची भाषा मी कधीच ऐकलेली नाही. हे दुदैवी आहे, सत्ता नसल्यामुळे कदाचित त्यांना काहीच सूचत नाही, त्यामुळे कदाचित ते बिचारे असे वागत असतील. कदाचित त्यांचा समतोल बिघडला असावा, असा टोलाही सुळे यांनी लगावला. लग्नाचे हॉल्स खुले करण्याची विनंती मी मुख्यमंत्र्यांना केली आहे. टप्प्याटप्प्याने हॉल खुले करा. दिवाळीनंतर हॉल उघडा, पण त्याचे बुकींग घ्यायला आता परवानगी द्या. त्यामुळे बॅण्डवाले, केटरर्स यांना दिलासा मिळेल.
Kanjurmarg Metro Car Shed | कांजूरमार्ग मेट्रो कारशेडच्या जागेवर केंद्र सरकारच्या मालकीचा फलक