मस्ती करणाऱ्या विद्यार्थ्याला उठाबशांची शिक्षा, मुलगा रुग्णालयात दाखल
जास्त उठाबशा मारल्यामुळे पायाच्या नसा आखडल्या असल्याने त्याला चालता येत नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. त्यामुळे आणखी दोन दिवस विद्यार्थ्याला रुग्णालयात उपचार घ्यावे लागणार आहेत.
वसई : मस्ती करतो म्हणून सहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला शिक्षकाने चक्क दोनशे उठबशा काढायला लावल्या. यामुळे विद्यार्थ्याला रुग्णालयात दाखल कराव लागलं आहे. श्री कांबळे असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. श्रीच्या पालकांनी याप्रकरणी शाळेविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
श्री नालासोपारा पूर्वेकडील सेंट विलीब्रोर्डस् या शाळेत इयत्ता सहावी शिकत आहे. शुक्रवारी कराटेचं प्रशिक्षण घेण्यासाठी शाळेच्या टॅरेसवर श्री आणि शाळेतील इतर मुलं जमली होती. त्यावेळी श्री मस्ती करत असल्याचं कराटे प्रशिक्षण देणाऱ्या शिक्षकाने पाहिलं. त्यानंतर संबधित शिक्षकाने श्रीसह सात जणांना 200 उठाबशा काढण्याची शिक्षा दिली.
इतर सहा जणांनी काही उठाबशा काढून नकार दर्शवला. मात्र श्रीने शंभर उठाबशा काढून आपले पाय दुखत असल्याचं शिक्षकाला सांगितलं. मात्र शिक्षकाने ओरडून त्याला आणखी शंभर उठाबशा काढण्यास सांगितलं.
दोन दिवस श्रीने घरी याबद्दल काहीच सांगितलं नाही. मात्र आज सकाळपासून श्रीला चालणंही शक्य होत नव्हतं. त्यावेळी पालकांनी विचारल्यावर त्याने घडलेला प्रकार पालकांना सांगितला. त्यानंतर पालकांनी शाळा प्रशासनाकडे याबाबत विचारणा केली, त्यावेळी शाळेने याबाबत काहीही बोलण्यास नकार दिला.
त्यामुळे श्रीच्या पालकांनी अखेर तुळींज पोलीस ठाण्यात शाळेच्या शिक्षकाविरोधात तक्रार दाखल केली आहे. सध्या श्रीला नालोसापाराच्या रकिया रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
जास्त उठाबशा मारल्यामुळे पायाच्या नसा आखडल्या असल्याने त्याला चालता येत नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. त्यामुळे आणखी दोन दिवस श्रीला रुग्णालयात उपचार घ्यावे लागणार आहेत.