एक्स्प्लोर
मुंबईकर जगात सर्वाधिक तणावग्रस्त, स्ट्रेस दूर करण्यासाठी टिप्स
एबीपी माझाने मानसोपचारतज्ञ डॉ. आशिष देशपांडे यांच्याशी चर्चा करुन याबाबत काही टिप्स जाणून घेतल्या आहेत.
मुंबई : देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी 31 टक्के मुंबईकर तणावाखाली जीवन जगत असल्याचं एका संशोधनातून समोर आलं आहे. लीब्रेट या डॉक्टरांच्या ऑनलाईन सल्लागार संस्थेने हा सर्व्हे केला आहे. तसेच संपूर्ण देशातल्या महत्त्वाच्या शहरांमधील 60 टक्के नागरीक हे तणावाखाली जगत असल्याचही यात म्हटलं आहे.
मुंबईतील धावपळीच्या जीवनातही तुम्ही वेळेचं आणि दैनंदिन कामकाजाचं व्यवस्थित नियोजन केल्यास तणावापासून दूर राहू शकता. एबीपी माझाने मानसोपचारतज्ञ डॉ. आशिष देशपांडे यांच्याशी चर्चा करुन याबाबत काही टिप्स जाणून घेतल्या आहेत.
‘’मोबाईलचा वापर कमी करा’’
ट्रेनमध्ये, बसमध्ये, रस्त्याने किंवा घरातही प्रत्येकजण मोबाईलमध्ये गुंतलेला असतो. सोशल मीडियाचा वापर प्रमाणापेक्षा जास्त वाढल्याने प्रत्येकजण स्वतःमध्येच गुंतलेला आहे. मोबाईलच्या वापरामुळे घरातही व्यवस्थित संवाद होत नाही. त्यामुळे आपण तणावाखाली जातो.
ऑफिसमधील काम झाल्यानंतर घरी जाताना तुम्ही प्रवासात ट्रॅफिकमध्ये अडकता किंवा ट्रेनचा तांत्रिक गोंधळ होतो आणि चिडचिड होणं सुरु होतं. अगदी काही सेकंदाचा सिग्नल लागलेला असेल तरीही तो नकोसा वाटतो. अशा वेळी संयम आणि शांततेने राहणं हा एकमेव मार्ग आहे. त्यानंतर घरी गेल्यानंतर मोबाईलमध्ये अडकून न राहता कुटुंबियांशी संवाद साधला तर तणाव दूर होण्यास मदत होते, असं तज्ञांचं मत आहे.
ताणतणावामुळे रक्तदाब, त्वचेचे विकार, हृदयविकाराचा झटका असे आजारही वाढत असल्याचं मानसोपचारतज्ञांचं म्हणणं आहे.
‘’तणाव गरजेचाच, पण नियोजन महत्त्वाचं’’
स्वतःच्या विकासासाठी तणाव गरजेचा आहे. आयुष्यात तणाव नसता तर माणसाने प्रगतीच केली नसती. तणाव येऊ नये म्हणून आपण काळजी घेतो आणि बुद्धी वापरतो. त्याचाच फायदा स्वतःच्या विकासासाठी होतो. मात्र या सगळ्यात नियोजन महत्त्वाचं आहे, असं डॉ. आशिष देशपांडे यांनी सांगितलं.
‘’खाण्याची काळजी घ्या’’
ऑफिसमध्ये काम करताना खाण्याची काळजी घेणं सर्वात महत्त्वाचं आहे. खासगी क्षेत्रात कामकाजाच्या वेळेत ही काळजी घेणं बऱ्याचदा शक्य होत नाही. त्यामुळे खारट, मसालेदार आणि चटपटीत पदार्थ खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात.
वेळेवर खाणं शक्य नसेल तर सकाळचा नाष्टा महत्त्वाचा आहे. तो चांगला करावा, रात्रीचं जेवण कमी करावं. झोप महत्त्वाची आहे. किमान सात ते आठ झोप गरजेची आहे. झोप न घेतल्यास अॅसिडिटीसारखे प्रॉब्लम होतात आणि तणाव आणखी वाढतो.
ऑफिसमध्ये काम करताना ही काळजी घ्या
जास्त तणाव जाणवत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा, असंही डॉक्टर सांगतात. ज्या व्यक्तीचं बालपण स्वकेंद्रित गेलेलं आहे, म्हणजे ज्याला कधी नकार ऐकण्याची सवय नाही, ज्याला कधी कुणी उलट बोललेलं नाही, अशा व्यक्तींना ऑफिसमध्ये टीमसोबत काम करताना अडचणी येतात.
ऑफिसमध्ये सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या होणं शक्य नाही. मॅनेजर आणि कर्मचारी यांच्यात थोडासा तणाव असणं स्वाभाविक आहे. समुपदेशन घेण्यासाठी हेल्पलाईन आहेत. राज्य सरकारचीही मोफत हेल्पलाईन आहे. तुम्ही घरबसल्या तुमची अडचण त्यांना सांगून सल्ला घेऊ शकता, असंही डॉक्टर आशिष देशपांडे यांनी सांगितलं.
सर्व्हे काय सांगतो?
या सर्वेनुसार, मुंबईतल्या नोकरदार वर्गातील व्यक्तींचं तणावाचं मुख्य कारण अपूरा वेळ, दिलेलं काम वेळेत पूर्ण करु न शकणं, मानसिक तणावाशी संघर्ष, ऑफिसमधील राजकारण, ओव्हर टाईम काम करणं, तसेच, प्रोफेशनल जीवन आणि वैयक्तीक जीवनात योग्य संतुलन नसल्याची मुख्य कारणं आहेत.
लीब्रेट संस्थेचे सीईओ आणि संस्थापक सौरभ अरोडा यांनी याबाबत सांगितलं की, “तणावाखालील व्यक्तींना आपल्या कुटुंबाशी आणि मित्रांशी बोलताना नेहमी अस्वस्थता जाणवते. पण आरोग्याच्या दृष्टीनं त्यांनी आपले विचार, आपल्या भावना इतरांसमोर व्यक्त करणं गरजेचं आहे.”
पाहा व्हिडिओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement