PMLA कोर्टाचे विशेष न्यायाधीश एच. एस. सातभाई यांची यवतमाळला बदली
Mumbai PMLA judge transferred : मुंबई सत्र न्यायलयाचे अतिरिक्त न्यायाधीश एच. एस. सातभाई यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या बदलीची सध्या चर्चा सुरू आहे.
Mumbai PMLA judge transfered मुंबई सत्र न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश एच. एस. सातभाई यांची यवतमाळ सत्र न्यायालयात बदली करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार जनरल यांच्याकडून या आदेशावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. मात्र अचानक ही बदली झाल्यामुळे कोर्टाच्या वर्तुळात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. न्या. एच. एस. सातभाई हे 'प्रीव्हेंशन ऑफ मनी लाँड्रींग ॲक्ट' या विशेष कोर्टाचं कामकाज पाहत होते. सध्या त्यांच्याकडे अनेक महत्त्वाची न्यायप्रविष्ट प्रकरणं असल्याचे बोलले जात आहे.
महाराष्ट्र सदन घोटाळा, हेक्सवर्ल्ड यांसह अन्य काही हायप्रोफाईल प्रकरणांचा यात समावेश होता. मुळचे नाशिकचे असलेले न्यायाधीश एच. एस. सातभाई यांनीच राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांच्यासह या प्रकरणातील अनेक आरोपींना पुराव्यांअभावी निर्दोष मुक्त केलं होतं. ज्यात समीर भुजबळ, पंकज भुजबळ, चमणकर कुटुंबिय आणि अन्य आरोपींचा समावेश होता.
इतकंच नव्हे तर सोमवारीही एच.एस. सातभाई यांच्या कोर्टात राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची रिमांड, शिवसेना नेते आनंदराव अडसुळ यांचा अटकपूर्व जामीन तर एकनाथ खडसे यांचं भोसरी प्रकरणही सुनावणीसाठी होतं.
दरम्यान, महापालिका निवडणुकांसाठी बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीला विरोध करणाऱ्या याचिकांची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयानं राज्य निवडणूक आयुक्त आणि राज्य सरकारला नोटीस बजावत दोन आठवड्यांत यावर भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायमूर्ती अमजद सय्यद आणि न्यायमूर्ती एस. जी. डिगे यांच्या खंडपीठापुढे यावर सुनावणी झाली.
राज्य सरकारनं तीन सदस्यांचा प्रभाग असा निर्णय महापालिका निवडणुकीसाठी घेतला आहे. मात्र हा बदल केवळ राजकीय सोयीनुसार घेण्यात आला असून मतदारांनी एक उमेदवार एक प्रभाग अशी मागणी करायला हवी, असंही याचिकेतून म्हटलेलं आहे. आगामी मुंबई, ठाणे, पुणे, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, पनवेल, मीरा-भाईंदर, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, नाशिक, मालेगाव, परभणी, नांदेड-वाघळा, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर व चंद्रपूर या महापालिका निवडणुकांमध्ये हा मुद्दा महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
Devendra Fadanvis : "सरकार येईल, कधी येणार हे डोक्यातून काढून टाका", ऑपरेशन लोटसच्या चर्चांना विराम
सोशल मीडियावर अंबाजोगाई रुग्णालयाच्या कोविड वॉर्डच्या ढिसाळ कारभाराचा पंचनामा !
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha