(Source: ECI/ABP News/ABP Majha)
व्हेल माश्याच्या उलटीची तस्करी करणारे गजाआड, 4 कोटींचा मुद्देमाल जप्त, 'व्हेल'च्या उलटीला का आहे एवढी किंमत?
ठाण्यात व्हेल माशाची उलटीची विक्री करण्यास आलेल्या दोघा तस्करांना पोलिसांनी अटक केली आहे. गुरुवारी सायंकाळी त्यांना ठाण्यातून बेड्या ठोकल्या आहेत.
ठाणे : ठाण्यात व्हेल माशाची उलटीची विक्री करण्यास आलेल्या दोघा तस्करांना पोलिसांनी अटक केली आहे. गुरुवारी सायंकाळी त्यांना ठाण्यातून बेड्या ठोकल्या आहेत. यांच्याकडून तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी आणि एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई ठाणे गुन्हे शाखाच्या पथकाने केली आहे.
व्हेल माशाची उलटी ही समुद्रात तरंगणारे सोनं मानलं जातं. सुगंधित उत्पादने तसेच औषध बनवण्यासाठीही याचा उपयोग होतो. यामुळे या उलटीला आंतरराष्ट्रीय बाजारात कोट्यवधीची किंमत आहे. या व्हेल माशाची उलटी विक्री करण्यास दोन जण ठाण्यातील घोडबंदर रोड परिसरात येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखा वागळे युनिटच्या पथकाला मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलीस पथकाने गुरुवारी सायंकाळी जुना जकात नाका, घोडबंदर रोड येथे सापळा लावला.
यावेळी दोन संशयित इसम होंडा कंपनीच्या युनिकॉर्न मोटारसायकल वरून जात असताना पोलिसांना आढळून आले. दोघा दुचाकीस्वारांना पोलिसांनी अडवून त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे 4 किलो 1000 ग्रॅम इतकी समुद्रात आढळणाऱ्या व्हेल माशाची उलटी आढळून आली. मंगेश जावळे व नंदकुमार दाभोळकर असे या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी या दोघा तस्करांना अटक करीत व्हेल माशाची उलटी व मोटारसायकल जप्त केली. जप्त करण्यात आलेल्या उलटीची किंमत तब्बल 4 कोटी रुपये इतकी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या दोघांना ठाणे न्यायालयाने 7 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याबाबत अधिक तपास ठाणे गुन्हा शाखा करत आहे.
का आहे बाजारात एवढी किंमत
एका वेबसाईटच्या माहितीनुसार व्हेल माशाच्या शरीरातून निघालेला अॅम्बरग्रीस हा पदार्थ अत्तर किंवा सुगंधित उत्पादने तयार करण्यासाठी वापरले जाते. जगभरात हे अत्तर लाखोंच्या किमतीनं विकले जाते. त्यात अॅम्बरग्रीस (व्हेल माशाची उलटी) यापासून तयार केलेल्या अत्तर कोट्यवधींना विकत घेतले जाते. एवढेच नाही तर अॅम्बरग्रीसपासून अगरबत्ती आणि धूपही तयार केले जाते. तर, काही देशांमध्ये अॅम्बरग्रीसचा वापर सुगंधित सिगरेट तयार करण्यासाठी होतो.