सायन उड्डाणपूल दुरुस्तीला आजपासून सुरुवात, एकूण आठ ट्रॅफिक ब्लॉक घेतले जाणार
मुंबई शहर आणि उपनगर यांना जोडणाऱ्या सायन उड्डाणपुलाचं दुरुस्तीचं काम आजपासून एमएसआरडीसीकडून हाती घेण्यात आलं आहे. आजपासून पुढील चार दिवस पहिला ट्रॅफिक ब्लॉक असणार आहे. तर त्यानंतर आणखी तीन ब्लॉक घेतले जाणार आहेत.
मुंबई : सायन उड्डाणपूल दुरुस्तीला आजपासून सुरुवात होत आहे. या कामासाठी एकूण आठ ट्रॅफिक ब्लॉक घेतले जाणार आहेत. त्यासाठी पुढील दोन महिने आठवड्यातून चार दिवस हा पूल बंद राहणार आहे. सायन उड्डाणपुलाचे बेअरिंग बदलण्याचे काम आजपासून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्यावतीने हाती घेण्यात आलं आहे.
वाहतुकीच्यादृष्टीने उड्डाणपुलाचं महत्त्व लक्षात घेता आठवड्यातील केवळ चार दिवस बेअरिंग बदलण्याचे काम करण्यात येणार आहे. एकूण आठ ट्रॅफिक ब्लॉक मुंबई वाहतूक विभागाकडून मंजूर केले असून त्यातील पहिला ब्लॉक आजपासून 17 फेब्रुवारीला सकाळी 6 वाजेपर्यंत असणार आहे.
सायन उड्डाणपुलाचं बांधकाम 1999 मध्ये महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने केलं होतं. मुंबई शहर आणि उपनगरांना जोडणारा हा महत्त्वाचा उड्डाणपूल आहे. त्यानंतर 2017 मध्ये सायन उड्डाणपुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट आयआयटी मुंबई मार्फत करण्यात आलं होतं. आयआयटीच्या अहवालानुसार उड्डाणपुलाचे बेअरिंग बदलण्याची शिफारस करण्यात आली होती. त्यानुसार हे काम हाती घेण्यात आलं आहे.
ट्रॅफिक ब्लॉकचे वेळापत्रक
- 14 फेब्रुवारी ते 17 फेब्रुवारी सकाळी 6 वाजेपर्यंत.
- 20 फेब्रुवारी रात्री 10 वाजेपासून ते 24 फेब्रुवारी सकाळी 6 वाजेपर्यंत.
- 27 फेब्रुवारी रात्री 10 वाजेपासून ते 2 मार्च सकाळी 6 वाजेपर्यंत.
- 5 मार्च रात्री 10 वाजेपासून ते 9 मार्च सकाळी 6 वाजेपर्यंत.
- 12 मार्च रात्री 10 वाजेपासून ते 16 मार्च सकाळी 6 वाजेपर्यंत.
- 19 मार्च रात्री 10 वाजेपासून ते 23 मार्च सकाळी 6 वाजेपर्यंत.
- 26 मार्च रात्री 10 वाजेपासून ते 30 मार्च सकाळी 6 वाजेपर्यंत.
- 2 एप्रिल रात्री 10 वाजेपासून ते 6 एप्रिल सकाळी 6 वाजेपर्यंत.
बेअरिंग बदलण्याचे काम पूर्ण झाल्यावर उड्डाणपुलाचे (Expansion Joint) बदलण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. यामध्ये डांबरीकरणाच्या कामाचा देखील समावेश आहे. या कामासाठी मात्र हा उड्डाणपुल वाहतुकीसाठी सलग 20 दिवस बंद ठेवण्याचे नियोजन आहे.