एक्स्प्लोर
ग्रामपंचायत निवडणुकीवरुन शिवसेनेची भाजपवर बोचरी टीका
आमच्या पक्षास इतक्या ग्रामपंचायती विजयांचा आकडा लागला, वगैरे गमजा आज तरी कुणी मारू नये.’ अशा शब्दात शिवसेनेनं भाजपवर टीका केली आहे.
मुंबई : हजारहून अधिक ग्रामपंचायतीत भाजपचे सरपंच निवडून आल्याचा दावा करण्यात आल्यानंतर शिवसेनेनं आज (बुधवार) सामनातून त्यावर जोरदार टीका केली आहे. ‘हे सत्य आहे की अनेक ठिकाणी प्रस्थापितांना भुईसपाट करून नव्या, ताज्या दमाच्या मंडळींना मतदारांनी संधी दिली आहे. त्यात सर्वच पक्षांच्या मातब्बरांचा समावेश आहे. आमच्या पक्षास इतक्या ग्रामपंचायती विजयांचा आकडा लागला, वगैरे गमजा आज तरी कुणी मारू नये.’ अशा शब्दात शिवसेनेनं भाजपवर टीका केली आहे.
तसेच या निवडणुकीत पैशाच्या बळावर भाजपनं सरपंच निवडून आणल्याचा आरोप शिवसेनेनं केला आहे. इतकंच नव्हे तर साम-दाम-दंड-भेद या नीतीने निवडणुका भाजप लढवत असल्याचा आरोपही शिवसेनेनं केला आहे.
दरम्यान शिवसेनेच्या टीकेला आता भाजप नेमकं काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.
एक नजर सामनाच्या अग्रलेखावर :
- लोकांना दिलासा देण्याचे कर्तव्य पार पाडण्याऐवजी फक्त निवडणुका जिंका व विजयाचे ढोल वाजवा हेच जणू ईश्वरी कार्य फडणवीस सरकारने अंगीकारले आहे. लोकांनी ग्रामपंचायत निवडणुकीत कमळाबाईस ‘तलाक’ दिला आहे. भाजपने आकड्यांचा खेळ कितीही करूद्यात, सत्य वेगळेच आहे. ते सत्य स्वीकारले तर लोकांचा मान ठेवला असे होईल. पराभवाच्या मानेवर पाय ठेवून विजयाच्या किंकाळ्या मारता येणार नाहीत. ग्रामपंचायत निवडणुकीत विजय गांडो थयो छे! विजय वेडा झाला आहे व लोकांनी विजयाला चोपले आहे!
- ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल संमिश्र लागले आहेत. ग्रामपंचायतीही आपल्या हाती राहाव्यात म्हणून सत्ताधारी भाजपने ‘थेट’ निवडणुकांचा बुद्धिबळ पट मांडला. पण वजिरांना फार महत्त्व न देता हत्ती, घोडे, उंट व शिपायांनीही अनेक ठिकाणी फत्ते केल्याचे चित्र आहे. हे हत्ती, घोडे, उंटही आमचीच सावत्र मुले व त्यांचे पाळणे कमळाबाईनेच हलवले, असा दावा कुणी करणार असतील तर त्याला काय करायचे? आजच्या ग्रामपंचायत निवडणूक निकालांत राजकीय यश बघणे म्हणजे मेंढ्यांच्या ‘बें बें’मधून कोकिळेच्या आवाजाचा आस्वाद घेण्यासारखे आहे, असे मत शेतकऱ्यांचे नेते गिरीधर पाटील यांनी व्यक्त केले आहे ते योग्य आहे.
- हे सत्य आहे की अनेक ठिकाणी प्रस्थापितांना भुईसपाट करून नव्या, ताज्या दमाच्या मंडळींना मतदारांनी संधी दिली आहे. त्यात सर्वच पक्षांच्या मातब्बरांचा समावेश आहे. आमच्या पक्षास इतक्या ग्रामपंचायती विजयांचा आकडा लागला, वगैरे गमजा आज तरी कुणी मारू नये. कर्जमाफीची दमडीही शेतकऱ्यांच्या हाती न पडता कर्जमाफीचे श्रेय फक्त जाहिरातबाजीतून लाटल्यासारखेच मग हे होईल. त्यामुळे जरा सबुरीने घ्या इतकेच आम्ही सांगू शकतो.
- विरोधकांकडे ग्रामपंचायतींचीही सत्ता राहू नये व सर्वत्र ‘कमळा’बाईचीच मैफल सजावी त्यासाठी थेट सरपंच निवडीचा कायदा मुख्यमंत्र्यांनी घाईघाईने केला, पण तरीही नक्की किती ठिकाणी भाजपचे सरपंच निवडून आले? ग्रामपंचायतीत अनेक ठिकाणी असे झाले आहे की,
- सदस्य एका पक्षाचे व सरपंच दुसऱ्या पक्षाचा. नगरपालिका निवडणुकीतही भाजपने हाच घोळ घातला. त्यामुळे नगरपालिकेत बहुमत कोणत्याही पक्षाचे येऊ द्या. थेट नगराध्यक्ष किंवा सरपंच निवडणुकीत साम-दाम-दंड-भेद नीतीने आम्ही माणसे निवडून आणू. यात ‘दाम’ महत्त्वाचे आहे व ते भरपूर असल्याने ‘थेट’ पद्धतीत त्यांना ते फायद्याचे ठरत आहे. पुन्हा या निवडणुका पक्ष चिन्हांवर लढवल्या जात नसल्याने महाराष्ट्रातील यच्चयावत सर्वच ग्रामपंचायती भाजपनेच जिंकल्याचा दावाही ते करू शकतात, पण वस्तुस्थिती तशी नाही.
- त्यांचे अनेक महत्त्वाचे किल्ले ढासळले आहेत व शिवसेना तसेच राष्ट्रवादीने विजयी कूच केले आहे. बीड जिह्यात पंकजा मुंडे यांचा गड ढासळला आहे. तेथे धनंजय मुंडे यांनी मुसंडी मारली आहे. हा पंकजा मुंडे यांना धक्का असला तरी भारतीय जनता पक्षाची दयनीय अवस्था समोर आली आहे. परळी तालुक्यात महत्त्वाच्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस विजयी झाली आहे. रावसाहेब दानव्यांच्या जालन्यातही भाजप मागे पडला आहे. संभाजीनगरात शिवसेना आघाडीवर आहे. येवला, सिन्नर, इगतपुरीत शिवसेनेने वर्चस्व राखले आहे. अकोले, नगरमध्येही भाजप मागे पडला आहे. येथे विखे-पाटलांची डाळही शिजलेली दिसत नाही. जळगावात शिवसेनेची मोठी आघाडी आहे. एकंदरीत ग्रामपंचायतीचे निकाल महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांना विचार करायला लावणारे आहेत.
संबंधित बातम्या :
ग्रामपंचायत निवडणूक निकालावरुन भाजप-काँग्रेसचे दावे-प्रतिदावे
आईचा विजयोत्सव क्षणभंगुर, दोन मुलींचा अपघाती मृत्यू
ग्रामपंचायत निवडणूक : चुरशीच्या लढतीत सुनेची सासूवर मात
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement