Shrikant Shinde: आता बांधावर जाऊन नाटक करता, अडीच वर्षे शेतकऱ्याच्या बांधावर का गेला नाही? श्रीकांत शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना प्रश्न
Shrikant Shinde: अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना यांनी स्वतःला घरात कोंडून घेतलं आणि आता शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नाटक करतात अशी टीका खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली.
ठाणे: शेतकऱ्याच्या बांधावर जाणं हे राजकारण आहे, अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना शेतकऱ्याच्या बांधावर का गेला नाही असा सवाल शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना केला. यांनी फक्त घोषणा केल्या, आमच्या सरकारने सर्व निकष बाजूला ठेऊन शेतकऱ्यांना मदत दिली असंही ते म्हणाले.
शुक्रवारी उद्धव ठाकरे हे अहमदनगरमध्ये दुष्काळग्रस्त भागाच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. त्याला उत्तर देताना खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी हे आधी केलं असत तर बरं झालं असतं. आता नाटक करून काहीही फायदा होणार नाही. सर्वात जास्त मदत शेतकऱ्यांना आमच्या सरकारने केली. याआधी अडीच वर्षे यांचं सरकार होत तेव्हा स्वतःला घरामध्ये बंद करून घेतलं. जेव्हा आमचं सरकार आलं तेव्हा सर्व निकष बाजूला सारून शेतकऱ्यांना मदत केली. केंद्राच्या निधीत आणखी भर घालून मदत दिली.
शेतकऱ्यांना जे जे लागेल ते आमच्या सरकारने दिलं, आम्ही फक्त घोषणा आणि आश्वासन देत बसलो नाही असं खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले. ते म्हणाले की, आज जे शेतकऱ्याच्या बांधावर जाताय ते लोकांना दाखवण्यासाठी जाताय. हे अगोदर करायला पाहिजे होतं. आता भेटायला जायचं नाटक करायचं, हे नाटक शेतकऱ्यांना आणि महाराष्ट्राला देखील समजलं आहे.
शेतकऱ्यांच्या बांधावर जाणं हे राजकारण
उद्धव ठाकरे यांच्या अहमदनगर दौऱ्यावर राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनीही टीका केली. ते म्हणाले की, बांधावर जाणे हेदेखील राजकारण असतं. आम्ही जे काम करतो ते बांधावर जाऊन सुटत नाही. बाळासाहेब ठाकरे यांचा विचार होता 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण. मात्र काही जणांकडून शंभर टक्के राजकारण केलं जात आहे. बांधावर पाणी गेलं पाहिजे यासाठी आम्ही काम करतो यालाच शिंदे फडणवीस आणि पवार यांचं सरकार म्हणतात. राजकारण कोणीही करू दे, आम्ही विकासासाठी कटिबद्ध आहोत. नियोजन हे नियोजन असतं, ते करावं लागतं आणि यासाठी शिंदे साहेबांनी रात्रंदिवस मीटिंग घेतल्या आहेत. केवळ आपण काय तरी दाखवायचं आणि मीडियासमोर जायचं असं मर्यादित काम असू नये यासाठी शिंदे फडणवीस आणि अजितदादा काम करत आहेत.
दादा भूसे यांचा उद्धव ठाकरे यांना सल्ला
उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेवर राज्याचे मंत्री दादा भुसे यांनीही प्रत्युत्तर दिले आहे. 'एक रुपयात पीकविमा करणारे राज्य महाराष्ट्र आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजितदादा यांच्या मार्गदर्शनाखाली क्रांतिकारी निर्णय घेतला. दरम्यान पीक विमा योजेनच्या प्रक्रियेनुसार सर्व गोष्टी होतात. पहिला ट्रिगर हा दोन पावसात 21 दिवसांचा खंड असायला पाहिजे. त्यात 25 टक्के रक्कम दिली जाते आणि नंतर शेवटी पीक कंपनीवेळी उर्वरित रक्कम दिली जाते. हा बीड पॅटर्न असून तो सर्व राज्यात लागू केला आहे. याची प्रक्रिया आणि प्रोसेस असते. विभागीय आयुक्तांनी शासन पातळीवर अहवाल दिला जातो. उद्धव ठाकरे यांनी आता जेवढा वेळ दिला, त्याच्या पन्नास टक्के वेळ त्यांनी या आधी शेतकऱ्यांना द्यायला पाहिजे होता.
ही बातमी वाचा: