सावरकर भाजपसाठी आदर किंवा श्रद्धेचा विषय नसून राजकारणाचा विषय; सामनाच्या अग्रलेखामधून भाजपवर टीका
अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालचा तिसरा दिवस अपेक्षेप्रमाणे सावरकरांच्या मुद्द्यावरुन तापला. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त विरोधी पक्षाने मांडलेला गौरव प्रस्ताव विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी फेटाळला.
मुंबई : शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखामधून भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करण्यात आली आहे. 'वीर सावरकरांची ढाल, भाजपचा पुळका खोटा' या मथळ्याखाली प्रसिद्ध अग्रलेखात देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर भाजप नेत्यांना लक्ष्य करण्यात आलं आहे. सावरकर हा विषय भाजपसाठी आदर किंवा श्रद्धेचा विषय नसून राजकारणाचा विषय बनल्याची टीका सामनामधून करण्यात आली आहे. सावरकरांना भारतरत्न देण्याबाबत फडणवीसांनी लिहिलेल्या दोन पत्रांचं काय झालं? या पत्रांची केंद्रान दखल न घेणे हा महाराष्ट्राचा आणि वीर सावरकरांचा अपमान आहे, अशी टीकाही सामनामधून करण्यात आली आहे. याच अग्रलेखात राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही लक्ष्य करण्यात आलं आहे. 2002 पर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने 'तिरंगा ध्वज' राष्ट्रध्वज का मानला नाही? असा सवाल अग्रलेखात विचारण्यात आला आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालचा तिसरा दिवस अपेक्षेप्रमाणे सावरकरांच्या मुद्द्यावरुन तापला. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त विरोधी पक्षाने मांडलेला गौरव प्रस्ताव विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी फेटाळला. त्यानतंर विरोधकांनी सभागृहात निषेधाचे फलक झळकावत घोषणा दिल्या होत्या. सावरकरांच्या गौरव प्रस्तावाच्या मुद्द्यावर भाजप आमदारांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. 'सामन्यात खूप, विधीमंडळात चूप' अशा घोषणा यावेळी आमदारांनी दिल्या. तसंच सावरकर यांचा गौरव करायला शिवसेनेला लाज वाटते का? असा सवालही देवेंद्र फडणवीसांनी विचाारला होता.
दरम्यान, सत्तेसाठी शिवसेनेने लाचारी पत्करली आहे. शिवसेनेला इतकं लाचार झालेलं कधीही पाहिलं नाही, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका केली. सावरकरांचा अपमान करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून शिवसेना बसली आहे, हे जनता विसरणार नाही, असंही ते म्हणाले होते.
पाहा व्हिडीओ : विधानसभेत सावरकरांवरून हलकल्लोळ! कॉंग्रेसच्या शिदोरी मासिकावर बंदीची मागणी
सामनाचा अग्रलेख : वीर सावरकरांची ढाल! भाजपचा पुळका खोटा!!
स्वातंत्र्यवीर सावरकरांची 'ढाल' करून भाजप हे नवराष्ट्रवादाचे राजकारण खेळते आहे. त्यामुळे शिवसेनेसमोर 'पेच' निर्माण होईल असे त्यांना वाटत असेल तर ते भ्रमात आहेत. शिवसेनेसमोर 'पेच' निर्माण होणार नाही, पण तुम्ही जे ढोंग उभे केले आहे. त्या ढोंगाच्या पेकाटात मात्र नक्कीच लाथ बसेल. भाजपला वीर सावरकरांचा आलेला पुळका खोटा आहे. वीर सावरकर हे भाषाप्रभूसुद्धा होते. मराठी भाषेत 'शुद्धी'चे प्रयोग त्यांनी केले. आजच्या मराठी भाषादिनी वीर सावरकरांचे स्मरण करूया!
वीर सावरकरांच्या विषयावर सरकारची कोंडी करू, असे भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रातील मंडळींनी जाहीर केले. याचा अर्थ स्पष्ट आहे. सावरकर हा भाजपसाठी आदर किंवा श्रद्धेचा विषय राहिला नसून फक्त राजकारणाचा विषय बनला आहे. भाजपतर्फे विधानसभेत सावरकर गौरवाचा प्रस्ताव आणणे व त्यावर चर्चा करणे ही 'कोंडी' करण्याची योजना कशी होऊ शकते? वीर सावरकर हा फक्त चर्चेचा विषय नाही, तर कृतीचा आणि जगण्याचा विषय आहे. वीर सावरकर हे त्याग, तत्त्व, तेज आणि संघर्षाच्या बाबतीत सगळ्यांनाच पुरून उरले व हयातभर त्यांचे स्थान अढळ राहिले. सावरकरांच्या स्मृतिदिनी त्यांचे पुण्यस्मरण सगळ्यांनीच केले. त्यांच्या स्मरणाचे ढोंग आज जे करीत आहेत. त्यांना सावरकर खरेच कळले काय? भाजप म्हणते वीर सावरकरांच्या विषयावर कोंडी करू. जे स्वतःच कोंडीत सापडले आहेत त्यांनी दुसऱ्यांची कोंडी करण्याची भाषा करू नये. महाराष्ट्रात सरकारची कोंडी करण्यापेक्षा केंद्रातील भाजप सरकारने वीर सावरकरांचा काय सन्मान राखला यावर महाराष्ट्रातील फडणवीस, पाटील, मुनगंटीवार, शेलार आदी मंडळींनी प्रश्न उभे केले पाहिजेत. कालच्या प्रजासत्ताक दिनीही मोदी सरकारने वीर सावरकरांना 'भारतरत्न' का जाहीर केला नाही? यावर महाराष्ट्रातील हे नव सावरकरप्रेमी काही प्रकाश टाकणार आहेत काय? महाराष्ट्राच्या विधानसभेने ठराव करावा वगैरे मागणी ठीक आहे, पण फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी वीर सावरकरांना 'भारतरत्न' देण्याविषयी दोन पत्रे पंतप्रधान मोदी यांना पाठवली होती. त्याचे पुढे काय झाले? त्या पत्रांची दखल केंद्राने घेतली नाही हा महाराष्ट्राचा आणि वीर सावरकरांचाही अपमान आहे!
वीर सावरकर हे अंदमानातून सुटल्यावर रत्नागिरीत सामाजिक कार्य करीत राहिले. देशभरातील अनेक प्रमुख लोक त्यांना तेथे येऊन भेटले. त्यात महात्मा गांधींपासून डॉ. हेडगेवारांपर्यंत पुढारी होते. वीर सावरकर आणि डॉ. हेडगेवार यांच्यात जी चर्चा झाली त्याचा तपशील महाराष्ट्रातील 'नव सावरकर भक्तां'नी तपासून पाहिला पाहिजे. महात्मा गांधी रत्नागिरीत सावरकर यांना त्यांच्या घरी जाऊन भेटले. दोन नेत्यांतील चर्चा संपली. निघता निघता गांधीजींनी सावरकरांच्या पत्नीला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. वीर सावरकरांच्या पत्नी माई – म्हणजे यमुनाबाई आल्या. माईंना महात्माजी व कस्तुरबा यांनी आदरपूर्वक नमस्कार केला. महात्माजी कस्तुरबांना म्हणाले, "आपल्या पतीला 50 वर्षांची काळय़ा पाण्याची खडतर शिक्षा झाली असतानाही मनोधैर्याने साहस दाखवून संसारास तोंड दिले त्या या थोर साध्वीला नमस्कार करूया!" त्यानंतर महात्माजी म्हणाले, "स्वदेशी आणि अस्पृश्यता निवारण या दोन्ही कार्याला आपला आशीर्वाद असूदे." वीर सावरकर म्हणाले, "अवश्य! अवश्य!" हे आम्ही यासाठीच सांगत आहोत की, वीर सावरकरांचे कार्य, राजकीय विचार भूमिकांच्या पलीकडचे होते. भारतीय जनता पक्षाला सावरकरांचे विज्ञाननिष्ठ हिंदुत्व, गोमातेसंदर्भातील परखड विचार पेलवणारे आहेत काय? भाजपच्या पुढाऱ्यांनी जाहीर केले आहे की, 'माझी जन्मठेप' या आत्मकथेचे आम्ही जाहीर वाचन करू! भाजपला इतके कष्ट घेण्याचे कारण नाही.
महाराष्ट्राच्या घराघरांत हा ज्वलंत ग्रंथ कधीच पोहोचला आहे. वीर सावरकरांचे स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान होतेच, पण स्वातंत्र्य चळवळीत भाजप किंवा तेव्हाचा 'संघ' परिवार कोठे होता? 1947 साली स्वातंत्र्यदिनही संघाने मानला नाही व राष्ट्रध्वज तिरंगा संघ मुख्यालयावर फडकवला नाही. काही ठिकाणी तिरंग्याचा घोर अपमान करण्याचा प्रयत्न झाला हे सर्व इतिहासात नोंदले गेले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर सरदार पटेल यांनी दोन वेळा बंदी आणली. दोन्ही वेळेला 'बंदी' उठवताना सरदारांनी एक अट कायम ठेवली ती म्हणजे, "तिरंगा ध्वज राष्ट्रध्वज आहे. तो मानावाच लागेल." ही अट गोळवलकर गुरुजींनी मान्य केली, पण 2002 पर्यंत संघाने हा शब्द पाळला नाही, असे 'रेकॉर्ड' सांगतेय. राष्ट्रध्वजाचा अपमान करणारे देशद्रोही ठरवले जातात. स्वतःस राष्ट्रवादी म्हणवून घेणाऱया संघटना 2002 पर्यंत 'राष्ट्रध्वज' फडकवायला तयार नव्हत्या. भगवा ध्वज हे शिवसेनेचेही प्रतीक आहे, पण भगव्याच्या बरोबरीने 'तिरंगा'ही फडकवला जातो हा आपला राष्ट्रवाद आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांची 'ढाल' करून भाजप हे नवराष्ट्रवादाचे राजकारण खेळते आहे. त्यामुळे शिवसेनेसमोर 'पेच' निर्माण होईल असे त्यांना वाटत असेल तर ते भ्रमात आहेत. शिवसेनेसमोर 'पेच' निर्माण होणार नाही, पण तुम्ही जे ढोंग उभे केले आहे त्या ढोंगाच्या पेकाटात मात्र नक्कीच लाथ बसेल. भाजपला वीर सावरकरांचा आलेला पुळका खोटा आहे. वीर सावरकर हे भाषाप्रभूसुद्धा होते. मराठी भाषेत 'शुद्धी'चे प्रयोग त्यांनी केले. आजच्या मराठी भाषादिनी वीर सावरकरांचे स्मरण करूया!
संबंधित बातम्या :
'सामन्यात खूप, विधीमंडळात चूप', सावरकरांचा गौरव प्रस्ताव फेटाळल्यानंतर भाजपची घोषणाबाजी