Shivsena : शिवसेनेची बैठक संपली, पाच खासदारांची दांडी, अनुपस्थित खासदार शिंदे गटाच्या गळाला लागणार का याकडे लक्ष
शिवसेनेच्या (Shivsena) खासदारांची आज मातोश्रीवर बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीला पाच खासदार अनुपस्थितीत राहिल्याची माहिती आहे.
मुंबई: शिवसेनेच्या (Shivsena) खासदारांची आज बोलावण्यात आलेली बैठक संपली असून त्याला पाच खासदारांनी दांडी मारल्याचं स्पष्ट झालं आहे. हे पाच खासदार शिंदे (Eknath Shinde) गटामध्ये जाणार का याबद्दल आता चर्चा रंगू लागल्या आहेत. दरम्यान, शिवसेना खासदारांची मातोश्रीवर तब्बल पाच तास बैठक सुरू होती, त्यामध्ये एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याबद्दल कोणताही ठोस निर्णय झाला नसल्याची माहिती आहे.
आमदारांच्या पाठोपाठ शिवसेनेत खासदारही नाराज असल्याच्या चर्चा होत्या. त्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेनेच्या खासदारांची बैठक बोलवली होती. ही बैठक सुमारे पाच तास चालली होती. आता यातून काय मार्ग निघणार, खासदारांची नाराजी उद्धव ठाकरे दूर करणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेने पाठिंबा द्यावा अशी भूमिका काही खासदारांनी घेतल्याची माहिती आहे. खासदार राहुल शेवाळे यांनी यासंबंधी एक पत्र उद्धव ठाकरेंना दिलं होतं. त्यावरही आज चर्चा करण्यात आली असली तरी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याविषयी कोणताही ठोस निर्णय आज झाला नाही.
शिवसेनेचे अनुपस्थित खासदार
1. यवतमाळ-वाशिम - भावना गवळी
2. परभणी - संजय जाधव
3. हिंगोली - हेमंत पाटील
4. कल्याण-डोंबिवली - श्रीकांत शिंदे
5. रामटेक - कृपाल तुमाने
अनुपस्थित खासदारांमध्ये कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक यांचाही समावेश आहे. पण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या परवानगीने आपण दिल्लीमधील बैठकीला उपस्थित राहिल्याने मुंबईतील बैठकीला उपस्थित राहू शकलो नसल्याचे त्यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले.
दरम्यान, द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यायचा की नाही हे अद्याप ठरलं नसलं तरी शिवसेनेच्या खासदारांचे एक शिष्टमंडळ त्यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळते. त्यानंतर जर शिवसेनेने द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला तर त्या मातोश्रीवर आभार मानण्यासाठी येऊ शकतात अशीही माहिती मिळतेय.