आरे कॉलनीतील आगीची सीआयडी चौकशीची शिवसेनेची मागणी
आगीमागे मोठं षडयंत्र असल्याचा आरोप केला जात आहे. शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत पत्र लिहून चौकशीची मागणी केली आहे.
मुंबई : आरे कॉलनीतील जंगलाला लागलेल्या आगीची सीआयडीमार्फत चौकशी करण्याची मागणी शिवसेनेने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. आरे कॉलनीतील आग विझली असली तरी संशयाचा धूर कायम आहे. आगीमागे मोठं षडयंत्र असल्याचा आरोप केला जात आहे, त्यामुळे शिवसेनेनं याबाबत चौकशीची मागणी केली आहे.
शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत पत्र लिहिलं आहे. आरे कॉलनीतील आगीमुळे अनेक दुर्मिळ झाडांसह वन्य प्राणी, जीवांची हानी झाली आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि आरे कॉलनी जवळ असणाऱ्या खासगी भूखंडावर वारंवार आगीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे या घटना वणवा भडकल्याने होत आहेत की मुद्दाम या आगी लावल्या जात आहेत, याबाबत स्थानिक नागरिक आणि वन प्रेमींमध्ये संशय आहे, असं पत्रात म्हटलं आहे.
त्यामुळे ही आग लागली की लावली गेली या प्रकरणाची चौकशी, सरकारच्या चौकशी यंत्रणेमार्फत करणे आवश्यक आहे. या आगीची सीआयडीमार्फत चौकशी करुन अहवाल सादर करण्याच्या सूचना संबंधीत अधिकाऱ्यांना द्याव्यात, अशी विनंती सुनील प्रभूंनी मुख्यमंत्र्यांनी पत्राद्वारे केली आहे.
मनसेच्या शिष्टमंडळानं घेतली सुधीर मुनगंटीवारांची भेट
आरे कॉलनीतील आग प्रकरणी मनसेच्या शिष्टमंडळानेही वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली. बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर, नितीन सरदेसाई यांनी मंत्रालयात मुनगंटीवारांची भेट घेतली. आरे आग प्रकरणी पुढील आठवड्यात जिल्हाधिकारी, महसूल विभाग, आरे विभाग, पदुम मंत्री जाणकर यांची बैठक लावणार असल्याचं आश्वासन मुनगंटीवार यांनी मनसेच्या शिष्टमंडळाला दिलं.
गोरेगाव येथील आरे कॉलनीतील जंगलात 3 डिसेंबरला भीषण आग लागली होती. जवळपास 3-4 किमी परिसरात ही आग पसरली होती. अग्निशमन दलाच्या जवळपास 100 जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत, जवळपास 6 तासांनी ही आग विझवली. मात्र या आगीमागे मोठं षडयंत्र असल्याचा आरोप केला जात आहे. आरे कॉलनीतील जमीन मिळवण्यासाठी जाणुनबुजून ही आग लावण्यात आल्याच आरोप होत आहे.