Shishir Shinde: शिशिर शिंदे यांचा शिवसेना ठाकरे गटाला 'जय महाराष्ट्र', पक्षात होणाऱ्या घुसमटीमुळे राजीनामा
Shishir Shinde Resign: आपण कुणाला नकोसे होणे माझ्या संवेदनशील मनाला मुळीच रुचत नाही, माझी घुसमट मीच थांबवतो असं शिशिर शिंदे यांनी आपल्या राजीनामा पत्रात लिहिलं आहे.
![Shishir Shinde: शिशिर शिंदे यांचा शिवसेना ठाकरे गटाला 'जय महाराष्ट्र', पक्षात होणाऱ्या घुसमटीमुळे राजीनामा shiv sena shishir shinde resign letter to uddhav thackeray mumbai marathi news update Shishir Shinde: शिशिर शिंदे यांचा शिवसेना ठाकरे गटाला 'जय महाराष्ट्र', पक्षात होणाऱ्या घुसमटीमुळे राजीनामा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/17/dbff3b9c8ff66fdeb99fc28c52baa20c168702105517693_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई: शिशिर शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गट उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. शिशिर शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनाम्याचं पत्र सुपूर्त केलं. आपल्याला ठाकरे गटात मनासारखं काम करायला मिळत नसल्याचं त्यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं. पक्षात होणारी घुसमट आपणच थांबवत असल्याचं त्यांनी या पत्रात म्हटलं आहे.
शिशिर शिंदे यांनी राजीनामा देण्यामागची सविस्तर भूमिका त्यांच्या पत्रात मांडली आहे. त्यातून पक्षात काम करण्याची संधी मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. चार वर्षे आपल्याला कोणतीही जबाबदारी देण्यात आली नव्हती, नंतर आपल्याला शोभेचं पद देण्यात आलं, त्यामुळे आपल्या आयुष्यातील चार वर्षे वाया गेल्याचं शिशिर शिंदे यांनी पत्रात लिहिलंय. आपल्या कोणत्याही कृत्यामुळे शिवसेनेची बदनामी किंवा अप्रतिष्ठा झाली नाही निश्चयपूर्वक अभिमानाने नमूद करतो असंही त्यांनी या पत्रात म्हटलं आहे.
राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यानंतर शिशिर शिंदेंनी त्यांना साथ देत शिवसेना सोडली होती. त्यानंतर 19 जून 2018 ला शिशिर शिंदे यानी शिवसेनेत पुन्हा प्रवेश केला. पण घरवापसी नंतर तब्बल चार वर्षे पक्षात राजकीय पुनर्वसनासाठी त्यांना वाट पाहावी लागली. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिशिर शिंदे शिवसेनेच्या उपनेतेपदी वर्णी लागली. शिशिर शिंदे हे 2009 ला भांडुप विधानसभा मतदार संघातून आमदारपदी निवडून आले होते. त्यानंतर 2014 साली झालेल्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.
Shishir Shinde Letter To Uddhav Thackeray: शिशिर शिंदे यांनी पत्रात नेमकं काय लिहिलं?
दि. 19 जून 2018 रोजी मी अतिशय आत्मियतेने शिवसेनेत पक्षप्रवेश केला त्यानंतर 4 वर्षांत 30 जून 2022 पर्यंत मला कोणतीही जबाबदारी मिळाली नाही. प्रत्येक कार्यकर्त्यांची काही ओळख असते. कार्यकर्त्याचे काही गुण असतात. परंतु या चार वर्षांच्या कालावधीत माझे कर्तृत्व, संघटन कौशल्य हातात घेतलेले काम फत्ते करण्याची जबरदस्त जिद्द, समाजाच्या विविध क्षेत्रात असलेले जिव्हाळ्याचे संबंध या सर्व बाबी दुर्लक्षित करण्यात आल्याची मला खंत वाटते.
माझ्या जीवनातली चार अमूल्य वर्षे फुकट गेली अशी माझी धारणा आहे. 30 जून 2022 रोजी माझी "शिवसेना उपनेते" म्हणून नियुक्ती अचानकपणे झाली. जबाबदारी नसलेले शोभेचे पद मिळाले.
असो. मी आजपासून शिवसेनेच्या उपनेतेपदाचा आणि पक्षाचा राजीनामा देत आहे. माझ्या कोणत्याही कृत्यामुळे शिवसेनेची बदनामी किंवा अप्रतिष्ठा झाली नाही हे मात्र मी निश्चयपूर्वक अभिमानाने नमूद करतो.
गेल्या सहा महिन्यांत आपली भेट होणे देखील अशक्य झाले. आपण कोणाला नकोसे होणे माझ्या संवेदनशील मनाला मुळीच रुचत नाही. माझी घुसमट मीच थांबवतो.
या पत्राद्वारे कोणतेही जाहीर दोषारोप न करता मी आपणास 'जय महाराष्ट्र' करतो.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)