(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सामनाचा अग्रलेख 'राजकीय भूकंपा'वर नाही तर 'अफगाणिस्तानातील भूकंपा'वर! काय आहे आजच्या लेखात
Shiv Sena Saamana Article : राज्याच्या राजकारणात खासकरुन शिवसेनेत मोठा 'भूकंप' झाला आहे. असं असताना आज सामनाच्या अग्रलेखात काय असेल याची उत्सुकता सर्वांना लागून होती.
Shiv Sena Saamana Article : राज्याच्या राजकारणात खासकरुन शिवसेनेत मोठा 'भूकंप' झाला आहे. असं असताना आज सामनाच्या अग्रलेखात काय असेल याची उत्सुकता सर्वांना लागून होती. राजकीय स्थितीवर आणि शिवसेनेच्या भूमिकेबाबत काहीतरी भाष्य असावं असा कयास लावला जात होता. मात्र आजचा सामनाचा अग्रलेख हा थेट अफगाणिस्ताणातील भूकंपाच्या स्थितीवर लिहिण्यात आला आहे. या लेखात अफगाणिस्तानातील निसर्गाच्या प्रकोपावर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. अफगाणिस्तानात शेकडो गावे उद्ध्वस्त करणाऱ्या या विनाशकारी भूकंपानंतर हजारो लोक बेघर झाले आहेत. जे लोक सुदैवाने बचावले, त्यांची घरेदारे, संसार पुन्हा उभे करण्यासाठी जगभरातून माणुसकीचा ओघ अफगाणिस्तानात पोहोचायला हवा, असं लेखात म्हटलं आहे.
लेखात म्हटलं आहे की, कायमच जीव मुठीत घेऊन जगणाऱ्या अफगाणिस्तानवर आता निसर्गाचा प्रकोप झाला आहे. बुधवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास अफगाणिस्तानात शक्तिशाली भूकंप झाला. अफगाणच्या पाकटिका प्रांतातील चार जिल्हे या विनाशकारी भूकंपात पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. एक हजाराहून अधिक लोक या भूकंपात मृत्युमुखी पडले आहेत. अफगाणिस्तानातील भूकंपात चार जिल्ह्यांतील शेकडो खेडी उद्ध्वस्त झाली आहेत. भूकंप झाला तेव्हा मध्यरात्रीचे दोन वाजले होते. साखरझोपेची वेळ असल्याने लोकांनाबचावाची संधीही मिळाली नाही. जमीन का हलते आहे हे कळायच्या आत घराचे छत आणि भिंती अंगावर कोसळल्या आणि हजारो लोक ढिगाऱ्याखाली दाबले गेले, असं लेखात म्हटलं आहे.
अग्रलेखात म्हटलं आहे की, संकटाचे भयंकर स्वरूप आणि उपलब्ध असलेली तोकडी यंत्रणा यामुळे तालिबानने जगभरातील देशांना मदत करण्याची विनंती केली आहे. त्यातच भूकंपापाठोपाठ आलेल्या मुसळधार पावसानेही अफगाणिस्तानात हाहाकार उडविला आहे. भूकंपग्रस्त भागासह अनेक जिल्ह्यांना तुफानी पाऊस आणि पुराचा तडाखा बसला. यात हजारो घरे वाहून गेली. आधी भूकंपाच्या तडाख्यात हजारांवर लोक मृत्युमुखी पडले असतानाच काही तासांनी पाऊस आणि पुराच्या तडाख्यातही 400 लोक मरण पावले. लागोपाठ आलेल्या दोन नैसर्गिक आपत्तींमुळे अफगाणिस्तानची जनता हवालदिल झाली आहे. सरकारला एकाचवेळी दोन आघाड्यांवर मदतकार्यासाठी शिकस्त करावी लागत आहे, असं लेखात म्हटलं आहे.
हजारो बळी घेणाऱ्या भूकंपाची अफगाणिस्तानातून येणारी छायाचित्रे मन सुन्न करणारी आहेत. शेकडो गावे उद्ध्वस्त करणाऱ्या या विनाशकारी भूकंपानंतर हजारो लोक बेघर झाले आहेत. जे लोक सुदैवाने बचावले, त्यांची घरेदारे, संसार पुन्हा उभे करण्यासाठी जगभरातून माणुसकीचा ओघ अफगाणिस्तानात पोहोचायला हवा, असंही लेखात म्हटलं आहे.