'मुंबई मा जलेबी ने फाफडा, उद्धव ठाकरे आपडा'; शिवसेनेकडून गुजराती समाजाचा मेळावा
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेने गुजराती मतदारांना साद घातली आहे. 'मुंबई मा जलेबी ने फाफडा, उद्धव ठाकरे आपडा' असा नारा देत शिवसेनेने 10 जानेवारीला मुंबईत गुजराती समाजाचा मेळावा आयोजित केला आहे.
मुंबई : भाजपची व्होट बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुजराती समाजाला साद घालण्यासाठी शिवसेनेने सुरुवात केली आहे. मुंबई महापालिकेचे निवडणूक डोळ्यासमोर ठेवून 'मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा' असा नारा शिवसेनेने दिला आहे. येत्या 10 जानेवारीला शिवसेनेने मुंबईत गुजराती समाजाचा मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संबोधित करणार आहेत. शिवसेनेचे राष्ट्रीय संघटक हेमराज शाह यांनी या संदर्भातील पत्रक जारी केलं आहे.
भाजपसोबत युती तुटल्यानंतर शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं आणि मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे विराजमान झाले. यानंतर भाजप आणि शिवसेनेमध्ये अनेक आरोप प्रत्यारोप झाले. त्यातच शिवसेनेचा गड समजल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. परिणामी ही निवडणूक शिवसेनेसाठी देखील प्रतिष्ठेची ठरली. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणूक समोर ठेवत गुजराती मतदारांना शिवसेना साद घालणार आहे. या मतदारांच्या माध्यमातून आपल्याकडे खेचण्याचा शिवसेनाचा प्रयत्न आहे. राष्ट्रीय संघटक हेमराज शाह यांच्या आयोजनाखाली हा मेळावा पार पडणार आहे.
शिवसेनेची गुजराती मतदारांना साद फेब्रुवारी २०२२ मध्ये होणारी मुंबईसह दहा महापालिकांची निवडणूक अत्यंत वेगळ्या परिस्थितीत होणार आहे. भाजप जनता पक्षाच्या हातातील सत्ता भाजपच्या हटवादी गुजराी नेतृत्त्वामुळे आणि मराठी नेतृत्त्वाला संधी न देण्याच्या संकुचित मनोवृत्तीमुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हिरावून घेतली असल्याने भाजप नेते अस्वस्थ झाले आहेत. त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली मी मुंबईकर ही प्रतिमा जपत अत्यंत साधेपणाने महाराष्ट्रातील सर्व धर्म समभाव जपत उत्कृष्ट काम करत संकटावर मात करत मुंबई, महाराष्ट्र कोरोनाच्या संकटातून बाहेर काढण्यात यश मिळवले. हे न पाहावल्यामुळे भाजप नेते अस्वस्थ झाले आहेत आणि मुंबई महापालिकेवरचा भगवा झेंडा खाली खेचण्याच्या वल्गना करत आहेत. शिवसेनेच्या दृष्टीने ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे राष्ट्रीय संघटक हेमराज शाह यांनी रविवारी १० जानेवारी २०२१ रोजी मुंबईमधील गुजराती बांधवांचा मेळावा आयोजित केला आहे. मुंबईमधील गुजराती मतदारांना जागृत करण्यासाठी रविवारी १० जानेवारी २०२१ रोजी सकाळी दहा वाजता नवनीत हॉल, गुजराती समाज भवन, लोटस पेट्रोल पंपसमोर, ओशिवरा जोगेश्वरी लिंक रोड, जोगेश्वरी (पश्चिम) इथे हा मोळावा आयोजित करण्यात आला आहे. कोरोना संकटाच्या वातावरणात सर्व नियामंचे पालन करण्यात येणार असून प्रथम येणाऱ्या शंभर लोकांना सभागृहात प्रवेश देण्यात येणार आहे. या परिसरातील शिवसैनिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेनेचे राष्ट्रीय संघटक हेमराज शाह यांनी केले आहे.
'केम छो वरळी' म्हणत याआधीही गुजराती मतदारांना साद खरंतर गुजराती मतदारांना साद घालण्याचा शिवसेनाचा हा पहिला प्रयत्न नाही. याआधी विधानसभा निवडणुकीच्या वेळी आदित्य ठाकरे यांनी वरळी मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बॅनर लावण्यात आले होते. या बॅनरमधून मराठीसोबतच इतर भाषेतील मतदारांनाही आकर्षित करण्याचा प्रयत्न झाला होता. यामध्ये 'केम छो वरळी' असं पोस्टरही लावण्यात आलं होतं. परंतु या पोस्टरवरुन पारंपरिक मतदारांना जाहीर नाराजी व्यक्त केली होती.