(Source: Poll of Polls)
Uddhav Thackeray : ज्या शिवसेना नेत्यांमागे ईडीची पिडा, तेच म्हणत आहेत गड्या भाजप बरा! पण आता थेट उद्धव ठाकरेंकडून युतीचा मुद्दा निकालात
महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून भाजपने ईडीसह केंद्रीय तपास यंत्रणांचा केलेला यथेच्छ वापर केल्याचे काही लपून राहिलेला नाही. राज्यातील शिवसेनेचे अनेक नेते ईडीच्या रडारवर आहेत.
Uddhav Thackeray Live : गेल्या दोन दिवसांपासून शिवसेनेतील अंतर्गत बंडाळीवर मौन बाळगून असलेल्या शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भावनिक साद घातली आहे.
मुख्यमंत्र्यांनी गुवाहाटीमध्ये व्हाया सुरत तंबू ठोकून असलेल्या शिवसेनेच्या सर्व आमदारांना भावनिक साद घालताना सांगतिले की, माझ्या सहकाऱ्यांनी तिकडे जाऊन बोलण्यापेक्षा तोंडावर सांगावे. आजच मुख्यमंत्रीपद सोडतो. आज राजीनाम्याचं पत्र तयार करुन ठेवतो. जे आमदार गायब आहेत त्यांनी यावं आणि ते पत्र घेऊन जावं. ही लाचारी नाही, मजबूरी नाही. जोपर्यंत माझ्यासोबत शिवसैनिक आहेत, तोपर्यंत मी कोणतेही आव्हान स्वीकारेन. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्याकडून चेंडू आता नाराज आमदारांच्या गटाचे नेतृत्व करत असलेल्या नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोर्टात ढकलला आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे काय भूमिका घेतात ? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
नाराजांचा मुद्दा विचारधारेचा पण खरी अडचण ईडीची पीडा
महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून भाजपने ईडीसह केंद्रीय तपास यंत्रणांचा केलेला यथेच्छ वापर केल्याचे काही लपून राहिलेला नाही. राज्यातील शिवसेनेचे अनेक नेते ईडीच्या रडारवर आहेत. यामध्ये शिवसेना मुलुख मैदानी तोफ असलेल्या संजय राऊत यांनाही दणका बसला आहे. मिलिंद नार्वेकर यांनाही बंगला पाडावा लागला. इतकचं नव्हे, तर मुख्यमंत्र्यांच्या घरापर्यंत ईडी पोहोचली. श्रीधर पाटणकर ( रश्मी ठाकरे यांचे बंधू) यांचीही संपत्ती जप्त झाली आहे. भाजप नेते महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेवर दररोज गल्लीपासून दिल्लीपर्यंत आरोप करत आहेत. त्यामुळे अनेक शिवसेना नेत्यांनी ईडीची धास्ती घेतली आहे. बंडाळीचे नेतृत्व करत असलेल्या एकनाथ शिंदे यांनीही ईडीची धास्ती घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.
शिवसेनेचे कोणकोणते ईडीच्या रडारवर?
अनिल परब
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी असलेल्या अनिल परब यांच्यावर किरीट सोमय्या यांनी सर्वाधिक कडाडून हल्ला केला आहे. त्यांना सातत्याने जेलमध्ये टाकण्याची भाषा केली आहे. त्याच अनिल परब यांची कालच ईडीने सलग 11 तास दापोली रिसाॅर्ट प्रकरणात चौकशी केली आहे.
प्रताप सरनाईक
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना ईडीने दणका दिला आहे. एनएसईएल कंपनीतून प्रताप सरनाईक यांच्या कंपन्यांमध्ये पैसा आल्याचा आरोप आहे. त्यांची संपत्तीही ईडीकडून जप्त झाली आहे. ईडीचा फास आवळताच त्यांनी भाजपसोबत चला अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती.
भावना गवळी
शिवसेना खासदार भावना गवळी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून भाजपसोबत जाण्याची विनंती केली आहे. त्यांनी विचारधारेचा मुद्दा उपस्थित केला असला, तरी त्यांनी आतापर्यंत चारवेळा ईडीकडून नोटीस येऊनही हजेरी लावलेली नाही. विविध संस्थांच्या माध्यमातून त्यांच्यावर भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. किरीट सोमय्यांनी 100 कोटींचा अपहार केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
यशवंत जाधव
मुंबईमधील शिवसेना यशवंत जाधव यांच्यावर कोरोना काळात भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. शेल कंपन्यांच्या माध्यमातून कुटुंबीयांनी लाभ घेतल्याचा आरोप आहे. त्यांच्यावरही ईडीने आणि आयकर विभागाने छापेमारी केली आहे. गुवाहाटीमध्ये गेलेल्या आमदारांमध्ये यशवंत जाधव यांच्या पत्नी यमिनी जाधव यांचाही समावेश आहे.
अर्जुन खोतकर
अर्जुन खोतकर यांच्यावर जालना साखर कारखाना विक्रीत 100 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. खोतकरांवरी ईडीने छापेमारी केली आहे.
आनंदराव अडसुळ
आनंदराव अडसुळ यांच्यावर मुंबईच्या सिटी सहकारी बँकेचे अध्यक्ष असताना शेकडो कोटींचा अपहार केल्याचा आरोप आहे. खोतकर यांच्या कांदिवली येथील घरावर ईडीने छापेमारी केली आहे.
रवींद्र वायकर
भाजप नेते किरीट सोमय्यांनी वायकर यांच्यावर जमीन खरेदी प्रकरणात आरोप केल्यानंतर रवींद्र वायकर यांची ईडीकडून चौकशी झाली आहे.
तपास यंत्रंणाकडून बसत असलेला दणका पाहून शिवसेनेतील अनेक नेते हबकून गेले आहेत. त्यामुळेच त्यांनी ईडीचा ससेमीरा पाठिमागे गड्या भाजप बरा, अशी सोयीची भूमिका घेतली आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनातून भाजपशी जुळवून शक्यता पूर्णपणे फेटाळून लावली आहे. त्यामुळे हे नेते आता काय करणार ? आणि एकनाथ शिंदे काय भूमिका घेतात हे पहावं लागणार आहे.