(Source: ECI/ABP News/ABP Majha)
खोट्या आणि बदनामीकारक दाव्याप्रकरणी राहुल कंवल यांच्यावर कारवाई करावी, शिवसेनेची मागणी
सीरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख अदर पुनावाला यांच्या मुलाखतीवरुन ज्येष्ठ निवदेक राहुल कंवल यांनी खळबळजनक दावा केला होता. 'सेनेचे गुंड' सीरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख अदर पुनावाला यांना धमकी देत असल्याचं राहुल कंवल यांनी म्हटलं होतं. त्यानंतर शिवसेनेने इंडिया टुडे ग्रुपच्या संस्थापकांना पत्र लिहून खोटा आणि बदनामीकारक आरोप केल्याप्रकरणी राहुल कंवल यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
मुंबई : शिवसेनेने वृत्तनिवदेक राहुल कंवल यांची तक्रार करणारं पत्र 'इंडिया टुडे ग्रुप'ला लिहिलं आहे. 'सेनेचे गुंड' सीरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख अदर पुनावाला यांना धमकी देत असल्याचा वक्तव्य राहुल कंवल यांनी आपल्या शोमध्ये केलं होतं. परंतु हे वक्तव्य खोटं आणि बदनामीकारक असून याबाबत कारवाई करावी तसंच राहुल कंवल यांनी माफी मागावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी हे पत्र 'इंडिया टुडे ग्रुप'चे संस्थापक अरुण पुरी यांना लिहिलं आहे.
लंडनच्या 'द टाइम' वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अदर पुनावाला यांनी म्हटलं होतं की, "लस वाटपावरुन आपल्याला देशातील श्रीमंत आणि सामर्थ्यशाली व्यक्तींकडून धोका आहे." "सत्य बोलल्यास आपला शिरच्छेद केला जाईल," अशी भीतीही पुनावाला यांनी व्यक्त केली होती. यानंतर केंद्र सरकारने अदर पुनावाला यांना वाय दर्जाची सुरक्षा दिली आहे.
यानंतर पत्रकार राहुल कंवल यांनी खळबळजनक आरोप करत म्हटलं होतं की, "अदर पुनावाला यांनी मला व्हिडीओ पाठवले आहेत, ज्यात शिवसेनेचे गुंडे त्यांच्या फॅक्टरीबाहेर उभे राहून धमकी देत होते आणि लसीची मागणी करत होते."
Today in the @IndiaToday election coverage, their anchor, @rahulkanwal cooked up a lie to accuse the ShivSena of threatening Adar Poonawalla. This baseless piece of journalism is nothing but an attempt to malign the party. Our letter to India Today Group pic.twitter.com/mlRTqnHAuy
— Shivsena Communication (@ShivsenaComms) May 2, 2021
राहुल कंवल यांच्या दाव्यांनंतर शिवसेनेने 'इंडिया टुडे'चे संस्थापक अरुण पुरी यांना पत्र लिहून संबंधित अँकरवर कारवाई करण्याची मागणी केली. त्यामध्ये लिहिलं की, "तुमच्या वृत्तवाहिनीतील ज्येष्ठ निवेदकाने केलेल्या बनावट बातम्यांविषयी मी तुम्हाला लिहित आहे. राहुल कंवल यांनी आजच्या शोमध्ये लसीसाठी 'सेनेचे गुंड' अदर पुनावाला यांना धमकी देत असल्याचा दावा केला होता. ही बातमी पूर्णपणे चुकीची आणि बदनामीकारक आहे."
कंवल यांच्या आरोपाचा संदर्भ देताना शिवसेनेने म्हटलं आहे की, "दरम्यान, दुसर्या पक्षाच्या अध्यक्षाचा व्हिडीओ शिवसेनेशी जोडून आणि चुकीच्या माहितीच्या आधारे आमची बदनामी करणं यावरुन अँकरचा राजकीय पक्षपातीपणा स्पष्ट दिसतो. निवडणुकीच्या निकालाचा महत्त्वाचा दिवस आणि कोविड-19 महामारीबाबत देशभरात सुरु असलेल्या चर्चेपासून लक्ष विचलित करण्यासाठी जाणीवपूर्वक बदनामीकारक आणि खोटी माहिती पसरवण्याची मोहीम सुरु आहे."
यापूर्वी आपल्याच चॅनलमधील आणखी एका वृत्तनिवेदिकेने आमच्या पक्षाच्या नेत्यावर कशाप्रकारची टिप्पणी केली होती, याची आठवणही अरुण पुरी यांना या पत्रातून करुन दिली. आदित्य ठाकरे यांना 'शिवसेनेचा पप्पू' म्हणत असल्याचा अंजना ओम कश्यप यांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता, त्याचाच हा संदर्भ असल्याचं समजतं.
पत्रकारितेचे मूल्य राखत यासंदर्भात कारवाई करण्याची विनंती करतो, असं शिवसेनेने पत्रात म्हटलं. तसंच राहुल कंवल यांनी माफी मागावी अशी मागणी शिवसेनेने केली आहे. "ज्या शोमधून त्यांनी चुकीची बातमी दिली होती, त्या शोमध्येच त्यांनी दिलगिरी व्यक्त करावी अशी आमची अपेक्षा आहे," असं शिवसेनेने म्हटलं आहे.