शर्मिला टागोर, प्यारेलाल शर्मा, संजय राऊत यांना 'मास्टर दीनानाथ मंगेशकर' पुरस्कार
वर्ष 2020 साठीचे मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कार आज त्यांच्या 79व्या स्मृतीदिनी जाहीर करण्यात आले आहेत. मागील अनेक वर्षांपासून मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने हा मानाचा पुरस्कार दिला जातो.

मुंबई : दीनानाथ स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारे वर्ष 2020 साठीचे मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कार आज त्यांच्या 79व्या स्मृतीदिनी जाहीर करण्यात आले आहेत. वैद्यकीय क्षेत्रासाठी डॉ. प्रतित समधानी, डॉ. अश्विन मेहता, डॉ. राजीव शर्मा, डॉ. जनार्दन निंबाळकर, डॉ. निशित शहा तर अभिनयासाठी ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर, प्रेम चोपडा, नाना पाटेकर यांना पुरस्कार जाहीर झाला आहे.
मागील अनेक वर्षांपासून मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने हा मानाचा पुरस्कार दिला जातो. कला क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना हा पुरस्कार देण्यात येतो. प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी संगीत, समाजसेवा, रंगभूमी, साहित्य, चित्रपट, पत्रकारिता अशा विविध क्षेत्रांत अतुलनीय कामगिरी करणाऱ्यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येते.
ज्येष्ठ कवी-गीतकार संतोष आनंद, ज्येष्ठ संगीतकार प्यारेलाल शर्मा, ज्येष्ठ संगीतकार मीना खडिकर, ज्येष्ठ गायिका-संगीतकार उषा मंगेशकर यांच्यासह वृत्तपत्र पत्रकारितेसाठी दै. सामनाचे कार्यकारी संपादक शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनाही या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. एक लाख 11 हजार रुपये आणि स्मृतीचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.
कोरोना काळामुळे सध्या कोणताही समारंभ होणार नसून हे पुरस्कार या विजेत्यांना नंतर देण्यात येतील. त्या निमित्ताने पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी एबीपी माझाला ही माहिती दिली.
मास्टर दीनानाथांच्या स्वरप्रवासातील खास आठवणी... 'स्वर मंगेश'
मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या 79व्या पुण्यतिथीनिमित्त एबीपी माझावर आज रात्री 9 वाजता 'स्वर मंगेश' हा खास माहितीपट पाहायला मिळणार आहे. साक्षात गानसम्राज्ञी लता मंगेशकर आणि संगीत नाट्यसृष्टीतील एका जमान्यातल्या दिग्गजांकडून मास्टर दीनानाथ मंगेशकर यांची महती ऐकायला मिळणार आहे.
मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी मानाचा पुरस्कार दिला जातो. परंतु कोरोनामुळे मागील दोन वर्ष या कार्यक्रमाचं आयोजन करता आलेलं नाही. त्यामुळे यंदा दीनानाथ मंगेशकरांच्या पुण्यतिथीला त्यांचा संगीत-नाट्य क्षेत्रातील प्रवास उलगडण्याचा प्रयत्न मंगेशकर कुटुंबीयांनी केला आहे. त्याचे प्रसारण 'एबीपी माझा'वर होणार आहे. या कार्यक्रमाचं खास आकर्षण म्हणजे भारतरत्न लता मंगेशकर आपल्या बाबांबद्दलच्या आठवणींना उजाळा देणार आहेत. त्याचबरोबर दीनानाथांच्या लहानपणापासूनची दुर्मिळ छायाचित्रेही या माहितीपटात आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
