एक्स्प्लोर
40 वर्षांपूर्वी कोणीतरी गुटख्यापासून परावृत्त करायला हवं होतं : पवार
तंबाखू आणि सुपारीचं सेवन करत आल्याचा आपल्याला पश्चाताप होत आहे, अशी भावना शरद पवारांनी व्यक्त केली.

मुंबई : तंबाखू आणि सुपारीचं सेवन केल्याचा पश्चाताप होत असल्याची भावना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी बोलून दाखवली. 40 वर्षांपूर्वी कोणीतरी या व्यसनापासून परावृत्त केलं असतं, तर बरं झालं असतं, असंही पवार म्हणाले. मुंबईत इंडियन डेंटल असोसिएशन (आयडीए) ने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. 2022 पर्यंत तोंडाच्या कर्करोगाचं उच्चाटन करण्याचं आयडीएचं उद्दिष्ट आहे. तंबाखू आणि सुपारीचं सेवन करत आल्याचा आपल्याला पश्चाताप होत आहे. 40 वर्षांपूर्वी ही सवय सोडण्यासाठी कोणीतरी दटावलं असतं, तर बरं झालं असतं, अशी खंतही पवारांनी व्यक्त केली. शरद पवारांनी तोंडाच्या कर्करोगावर मात केली आहे. शस्त्रक्रियेमुळे अत्यंत त्रास झाल्याचं पवारांनी यावेळी सांगितलं. दात काढल्यामुळे तोंड उघडण्यास त्रास होतो. त्याचप्रमाणे अन्न गिळताना आणि बोलतानाही दुखत असल्याचं शरद पवार म्हणाले. लाखो भारतीय अजूनही गुटख्याच्या आमिषाला बळी पडतात, हे पाहून त्रास होतो, असं सांगतानाच पवारांनी हा मुद्दा सभागृहात उपस्थित करण्याचं आश्वासन दिलं. 20 मार्च हा जागतिक मौखिक आरोग्य दिन असून त्यानिमित्ताने आयडीएने रविवारी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं.
आणखी वाचा























