Sharad Pawar | शरद पवार यांनीही कोरोना लस घेतली, मोदींनी न पाळलेला नियम पवारांनी मात्र पाळला!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही आज कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. परंतु कोरोना लस घेताना मोदींनी न पाळलेला नियम पवारांनी पाळल्याचं दिसलं.
![Sharad Pawar | शरद पवार यांनीही कोरोना लस घेतली, मोदींनी न पाळलेला नियम पवारांनी मात्र पाळला! Sharad Pawar takes first dose of COVID-19 vaccine, but Pawar followed the rule which was not followed by PM Narendra Modi Sharad Pawar | शरद पवार यांनीही कोरोना लस घेतली, मोदींनी न पाळलेला नियम पवारांनी मात्र पाळला!](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/03/02010301/Pawar-and-Modi-Vaccine.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेचे खासदार शरद पवार यांनी मुंबईतील जे जे रुग्णालयात जाऊन कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. आज दुपारी तीनच्या सुमारास शरद पवार जे जे रुग्णालयात पोहोचले आणि कोरोना लस घेतली. यावेळी पवारांनी भारत बायोटेकची कोवॅक्सिन ही लस घेतल्याची माहिती त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून दिली.
देशात आज कोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. या टप्प्यात 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि गंभीर आजार असलेल्या 45 वर्षे वयाच्या नागरिकांना कोरोना लस दिली जाणार आहे. आज सकाळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीच्या एम्समध्ये कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. मोदी यांच्याप्रमाणेच शरद पवार यांनीही सोशल मीडियावर लसीकरणाबाबतचा व्हिडीओ पोस्ट करुन ही माहिती दिली.
शरद पवार यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे की, आज मुंबईच्या जे जे रुग्णालयात भारत बायोटेकची कोवॅक्सिन लस घेतली. आजपासून तिसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. ही लस घेण्यास पात्र असलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी लवकरात लवकर लस घेऊन कोरोना विरुद्धच्या लढ्यात सहभाग नोंदवावा, असे आवाहन करतो."
याआधी कोरोना लसीकरणाच्या या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. पंतप्रधान सकाळी नवी दिल्लीतील एम्समध्ये पोहोचले आणि कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. यासोबतच पंतप्रधानांनी देशवासियांनाही कोरोना लस घेण्याचं आवाहन केलं. कोविड-19 विरुद्धची जागतिक लढाई मजबूत करण्यासाठी आपल्या डॉक्टर आणि वैज्ञानिकांनी वेगाने काम केलं जे उल्लेखनीय आहे. लसीसाठी पात्र असणाऱ्यांना मी लस घेण्याचं आवाहन करतो. आपण सगळे मिळून भारताला कोरोनामुक्त बनवूया, असं मोदींनी म्हटलं.
पवारांनी नियम पाळला, मोदींनी नाही दरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी हात धुवा, मास्क लावा, सोशल डिस्टन्स पाळा असं आवाहन पंतप्रधान मोदींसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वारंवार करतात. मास्क कधीही काढू नका असं मोदी सातत्याने सांगत असतात. परंतु आज कोरोनाची लस घेताना स्वत: पंतप्रधानांनी मास्क लावलेला नव्हता. त्याउलट शरद पवार यांनी मात्र कोरोना लस घेताना कोरोनाविषयक नियमांचं पालन करत मास्क लावला होता. त्यामुळे मास्क न काढण्याचं आवाहन करणाऱ्या मोदींनी कोरोना लस घेताना मास्क काढल्याने त्यांच्यावर प्रश्नही उपस्थित केले जात आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)