पंतप्रधानांचं लसीकरण, लस घेताना एकाच वेळी अनेक संदेश देण्याचा मोदींचा प्रयत्न
पंतप्रधान मोदी यांनी आज सकाळीच दिल्लीतल्या एम्स हॉस्पिटलमध्ये जाऊन लस घेतली. या लसीकरणासाठी जी व्यवस्था करण्यात आली होती, त्यातून मोदींनी एकाचवेळी दोन तीन संदेशही देण्याचा प्रयत्न केलाय.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाची लस घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे. पंतप्रधान मोदी यांनी भारत बायोटेकची को-वॅक्सिन लस घेतली. देशात लसीकरणाचा दुसरा टप्पा आजपासून सुरु झाला आणि या टप्प्यातली पहिली लस पंतप्रधान मोदी यांनी घेतली. आज सकाळीच दिल्लीतल्या एम्स हॉस्पिटलमध्ये जाऊन मोदींनी लस घेतली. या लसीकरणासाठी जी व्यवस्था करण्यात आली होती, त्यातून मोदींनी एकाचवेळी दोन तीन संदेशही देण्याचा प्रयत्न केलाय.
देशात कोराना लसीकरणाला सुरुवात झाली ती 16 जानेवारीपासून. तेव्हापासून सातत्यानं हा प्रश्न विचारला जात होता की पंतप्रधान मोदी कधी लस घेणार? आज या प्रश्नाचं उत्तर अखेर मिळालं. दिल्लीतल्या एम्स हॉस्पिटलमध्ये आज सकाळी साडेसहाच्या सुमारास पंतप्रधान मोदींनी लस टोचून घेतली.
ज्या दोन नर्सनी पंतप्रधानांचं हे लसीकरण केलं, त्यापैकी एक होती पुदुच्चेरीची तर दुसरी केरळची. या दोन्ही राज्यात लवकरच विधानसभेच्या निवडणुका आहेत. शिवाय पंतप्रधानांनी यावेळी परिधान केलेला वेषही विशेष होता. त्यांच्या गळ्यात आसामी गमछाही होता. आसाममध्येही निवडणुका आहेतच. सकाळी साडेसहा वाजता सुरक्षेचा कुठलाही तामझाम न करता मोदी इथे पोहचले आणि त्यांनी स्पॉट रजिस्ट्रेशन करुन ही लस घेतली असंही पंतप्रधान कार्यालयाकडून सांगितलं गेलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली कोरोनाची लस, ट्वीट करत दिली माहिती
या लसीकरणाच्या वेळी एम्सचे डायरेक्टर डॉ. रणदीप गुलेरिया हे देखील उपस्थित होते. लसीकरणाबद्दलची आवश्यक माहिती, त्यानंतर घ्यायची खबरदारी याबाबत ते मोदींना माहिती देत होते. लसीकरणानंतर अर्धा तास नियमानुसार पंतप्रधान एम्सच्या कक्षात थांबले असंही सांगण्यात आलं.
साहजिक आहे सगळ्यांच्या मनात पहिला प्रश्न होता. मोदी कुठली लस घेणार? ब्रिटनच्या अस्त्रझेनेका या कंपनीच्या साहाय्यानं पुण्याच्या सीरम इन्स्टिस्ट्यूटमध्ये बनलेली कोविशील्ड की भारत बायोटेक या पूर्णपणे स्वदेशी कंपनीची लस असे दोन पर्याय मोदींसमोर होते. मोदींनी निवडली भारत बायोटेकची संपूर्ण स्वदेशी लस. भारत बायोटेकच्या लसीबद्दलच विरोधक अनेक प्रश्न उपस्थित करत होते. त्याच लसीची निवड करुन मोदींनी त्याबद्दलच्या टीकेला उत्तर देण्याचा प्रयत्न केला.
जगातल्या अनेक देशात तिथल्या राष्ट्रप्रमुखांनी पहिली लस टोचून लसीकरणाची सुरुवात केली. पंतप्रधान मोदींनीही तशीच सुरुवात करावी अशी अपेक्षा विरोधक व्यक्त करत होते. पण राजकीय नेत्यांनी त्यांचा नंबर येण्यासाठी वाट पाहावी, मध्येच रांगेत घुसण्याचा प्रयत्न करु नये असं मोदींनी आधीच सांगून ठेवलेलं होतं. आता जेव्हा ज्येष्ठ नागरिकांसाठीचा टप्पा सुरु होतोय, त्यावेळी मोदी या निकषात बसतात. 17 सप्टेंबर 1950 ही त्यांची जन्मतारीख. मोदींचं सध्याचं वय 71 वर्ष आहे. त्यामुळे निकषानुसार आपला नंबर आल्यानंतर मोदींनी ही लस घेतली.
देशात ज्यावेळी कोरोनाची संख्या वाढतेय, पण लसीकरणाबाबत फारसा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसत नाहीय त्यावेळी मोदींनी ही लस टोचून घेतली आहे. आता त्यांच्या या कृतीनं इतर राजकीय नेते कसं अनुकरण करतात आणि जनसामान्यांमध्ये लसीकरणाबद्दलच्या शंकांचं निरसन होतं का हे पाहणं औत्सुक्याचं असेल.