(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबई महापालिकेत शिवसेनेच्या अकार्यक्षमतेमुळे मलःनिस्सारण प्रक्रिया प्रकल्प 15 वर्षांपासून रखडला : भाई जगताप
मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी मुंबई महापालिकेच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले.आहेत. मुंबई महापालिकेत शिवसेनेच्या अकार्यक्षमतेमुळे मलःनिस्सारण प्रक्रिया प्रकल्प पंधरा वर्षांपासून रखडल्याचा आरोप त्यांनी केला.
मुंबई : मुंबई महापालिकेत शिवसेनेच्या अकार्यक्षमतेमुळे मलःनिस्सारण प्रक्रिया प्रकल्प पंधरा वर्षांपासून रखडल्याचा आरोप मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी केला आहे. शिवसेना आणि प्रशासनाच्या या अकार्यक्षमतेमुळे एकीकडे मुंबईकरांचे आरोग्य धोक्यात आले असून दुसरीकडे दंडापोटी लाखो रुपये वाया जात असल्याची भूमिका भाई जगताप यांनी मांडली. मुंबई महापालिकेच्या कारभारावरही भाई जगताप यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
2003 पासून मलनिःसारण प्रकल्पाची चर्चा चालू आहे. 2017 मध्ये हा प्रकल्प होईल असे आश्वासन देण्यात आले होते. पण तरीही आता सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करताच समुद्रात सोडले जात आहे. याबद्दल राष्ट्रीय हरित लवादाने मुंबई महापालिकेला तब्बल 29.5 कोटीचा दंड ठोठावला. यावर मुंबई महापालिकेने सर्वोच्च न्यायालयतून स्थगिती मिळवली यासाठी प्रशासन आपली पाठ थोपटून घेत आहे. लवादाच्या दंडाला स्थगिती मिळवली असली तरी विनाप्रक्रिया पाणी सोडत असल्याने न्यायालयाने दरमहा दहा लाखांचा दंड ठोठावला आहे, त्यामुळे करदात्यांचे पैसा वाया जात आहे, असा आरोप भाई जगताप यांनी केली.
पंधरा वर्षांपासून कोणामुळे प्रकल्प रखडले आणि प्रकल्प रखडवणारे हे झारीतील शुक्राचार्य कोण, असा सवाल भाई जगताप यांनी विचारला आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पर्शवभूमीवर काँग्रेस मुंबई शहरातील समस्यांवरुन शिवसेनेवर टीका करत असल्याचे चित्र आहे. डम्पिंग ग्राऊंड प्रकरणी देखील महापालिकेत शिवसेनेची सत्ता तर राज्यात शिवसेनेचे मुख्यमंत्री असल्याने त्यांनी निर्णय घ्यावा असे वक्तव्य भाई जगताप यांनी केले आहे
शिवसेनेच्या आरक्षणाच्या भूमिकेला काँग्रेसचा पाठिंबा
एकीकडे काँग्रेस शिवसेनेवर टीका करत असली तरी दुसरीकडे शिवसेनेच्या दहा वर्षाच्या आरक्षणाच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. भाजप सरकारने महापालिकेतील विविध आरक्षणाची कालमर्यादा पाच वर्षांची केली होती. पुढच्या निवडणुकीत हा वॉर्ड आपल्याकडे राहणार की नाही यामुळे अनेक नगरसेवक काम करत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे दहा वर्षांचे आरक्षण करण्याच्या शिवसेनेच्या प्रस्तावाला काँग्रेसचे समर्थन असल्याचे जगताप म्हणाले.