(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sanjay Raut : तपास यंत्रणा महापालिकेच्या शिपायांवर धाड टाकतील; संजय राऊत यांची उपरोधिक टीका
Sanjay Raut : शिवसेना नगरसेवक यशवंत जाधव यांच्या घरी आयकर विभागाने छापा मारला. या कारवाईवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी उपरोधिक टीका केली.
Sanjay Raut : केंद्रीय तपास यंत्रणा उद्या मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांच्या घरावर धाड टाकू शकतात, अशी उपरोधिक टीका शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केली आहे. आज, सकाळी मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष आणि शिवसेनेचे महत्त्वाचे नगरसेवक यशवंत जाधव यांच्या निवासस्थानी आयकर विभागाने आज धाड टाकली. या धाडीवर टीका करताना संजय राऊत यांनी टीका केली. मुंबई महापालिकेची निवडणूक जवळ आली असल्याने अशा प्रकारच्या कारवाया होत असल्याचे त्यांनी सांगितले.
संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले की, मुंबई महापालिकेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे या कारवाई होत आहेत. उद्या मुंबई महापालिकेच्या शिपयाच्या घरी धाड टाकण्यासाठी तपास यंत्रणा जातील असेही त्यांनी म्हटले. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, पंजाब, छत्तीसगड या भाजपेत्तर राज्यांना 2024 पर्यंत तपास यंत्रणांचा त्रास सहन करायचा असल्याचे त्यांनी सांगितले. 2024 नंतर पुढे पाहून घेऊ असेही राऊत यांनी म्हटले.
नवाब मलिकांचा राजीनामा?
राजकीय फायद्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग करणार, खोटे पुरावे तयार करणार, कॅबिनेट मंत्र्याला अटक करणार आणि तुम्हीच राजीनाम्यासाठी आंदोलन करणार. मुख्यमंत्र्यांनाही कोणाचा राजीनामा घ्यायचा याचा अधिकार आहे.
यशवंत जाधव यांच्या घरावर छापा
मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष आणि शिवसेनेचे नेते यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्या घरी आज सकाळी आयकर विभागानं (IT Raid) छापा घातला आहे. आयकर विभागाकडून त्यांच्या माझगाव येथील घरी चौकशी सुरु आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्षांच्या घरी आयकर विभागानं केलेली कारवाई म्हणजे, शिवसेनेला मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे. परंतु, यशवंत जाधव यांच्यावरील ही कारवाई पहिल्यांदा झालेली नाही. यापूर्वीही यशवंत जाधव आयकर विभागाच्या रडारवर आले होते.
इतर महत्त्वाच्या बातम्या: