Shiv Sena MP Sanjay Raut : संजय राऊतांचा कारागृहातील मुक्काम वाढणार? आज न्यायालयीन कोठडी संपणार
Shiv Sena MP Sanjay Raut : पत्राचाळ घोटाळा प्रकरणातील (Patra Chawl Scam Case) आरोपी खासदार संजय राऊत यांची न्यायलयीन कोठडी आज संपणार आहे.
Shiv Sena MP Sanjay Raut : पत्राचाळ घोटाळा प्रकरणी (Patra Chawl Case) न्यायालयीन कोठडीत असलेल्या संजय राऊत (Sanjay Raut) यांची न्यायालयीन कोठडी आज संपतेय. त्यामुळे आज त्यांना मुंबई सत्र न्यायालयात (Mumbai Sessions Court) हजर करण्यात येणार आहे. 30 जुलै रोजी ईडीनं (ED) संजय राऊत यांना अटक केली होती. त्यानंतर 8 दिवस ईडी कोठडीत राहिल्यानंतर न्यायालयानं राऊतांना 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. दरम्यान पत्राचाळ प्रकरणी ईडीची चौकशी सुरू असल्यानं ईडी आज संजय राऊतांची न्यायालयीन कोठडी वाढवून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे न्यायालयात आज काय होणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
पत्राचाळ प्रकरणात शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीनं अटक केली होती. 8 दिवसांच्या ईडी कोठडीनंतर त्यांना 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. ईडी कोठडी संपल्यानंतर आज त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं होतं. तिथे ईडीनं त्यांच्या कोठडीची मागणी केली नाही, त्यामुळे त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर संजय राऊतांची रवानगी आर्थर रोड कारागृहात करण्यात आली. आर्थर रोड कारागृहात संजय राऊत यांना घरचं जेवण आणि औषधं पुरवण्याची मुभा न्यायालयानं दिलं होती. पत्राचाळ कथित घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांना 31 जुलैंच्या मध्यरात्री अटक झाली. दरम्यानच्या काळात त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनाही पत्राचाळ आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीनं समन्स बजावलं होतं. त्यांचीही चौकशी करण्यात आली.
संजय राऊतांवर नेमके आरोप काय?
ईडीनं संजय राऊत यांचा पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी थेट हात असल्याचा आरोप केला आहे. त्यांचे भाऊ प्रविण राऊत पत्राचाळ डेव्हलेपमेंट पाहत होते. त्यांना HDIL ग्रुपकडून 112 कोटी रुपये मिळाले. त्यातील 1 कोटी 6 लाख 44 हजार रुपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यात पाठवले गेले. अलिबाग येथे याच पैशातून जमीन खरेदी करण्यात आली होती. राऊत परिवाराला पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहारात थेट आर्थिक फायदा झाला आहे. या प्रकरणात ज्यांचं नाव सुरुवातीला समोर आलं होतं आणि ज्यांच्यावर कारवाई झाली होती, ते प्रविण राऊत हे नावालाच होते. या प्रकरणातील खरे आरोपी संजय राऊत असल्याचा दावा ईडीनं केला आहे. संजय राऊत हेच प्रविण राऊत यांना समोर करून सर्व व्यवहार करत होते, असा आरोप ईडीच्या वतीनं करण्यात आला आहे.
पत्रचाळ प्रकरण काय?
मुंबईमधील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा (म्हाडा) भूखंड आहे. ईडीच्या आरोपानुसार, प्रवीण राऊत यांच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला ही चाळ विकसित करण्याचे काम देण्यात आले होते. मात्र त्यांनी या जागेचा काही भाग खासगी बिल्डरांना विकला, असा आरोप आहे. प्रवीण राऊत यांच्यावर पत्राचाळमध्ये राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. गुरु आशिष कन्स्ट्रक्शनला पत्रा चाळचे 3 हजार फ्लॅट बांधकाम करायचे होते, त्यापैकी 672 फ्लॅट येथील भाडेकरूला द्यायचे होते. उर्वरित फ्लॅट म्हाडा आणि विकासक यांच्यात वाटून घ्यायची होती. परंतु 2010 मध्ये प्रवीण राऊत यांनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे 25 टक्के शेअर एचडीआयएलला विकले. यानंतर 2011, 2012 आणि 2013 मध्ये भूखंडाचे अनेक भाग इतर खाजगी बिल्डर्सना हस्तांतरित करण्यात आले.