(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांची एनसीबीकडून चौकशी
राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना एनसीबीने समन्स पाठवलं असून त्यांची चौकशी सुरु आहे.
मुंबई : राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना एनसीबीने समन्स पाठवलं असून त्यांची चौकशी सुरु आहे. आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्कर करण सजनानीच्या चौकशीदरम्यान समीर खान यांचं नाव समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यानंतर एनसीबीने समीर खान यांना समन्स पाठवलं. त्यानुसार समीर खान आज सकाळी एनसीबी कार्यालयात हजर राहिले असून त्यांची चौकशी सुरु आहे.
एनसीबी सूत्रांच्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात शनिवारी एनसीबीने करण सजनानी नावाच्या आंतरराष्ट्रीय ड्रग तस्कराला अटक केली होती. त्याच्याकडून 200 किलो गांजाही जप्त करण्यात आला होता. त्याचप्रकरणी चौकशीदरम्यान बऱ्याच लोकांचं नाव समोर आलं होतं. त्यात समीर खान यांचंही नाव असल्याचं उघड झालं. त्यामुळे मंगळवारी (12 जानेवारी) रात्री आठच्या सुमारास एनसीबीच्या एक टीमने वांद्र्यात जाऊन समीर खान यांना समन देऊन चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं होतं. त्यानुसार समीर खान आज (13 जानेवारी) सकाळी साडेआठ वाजता चौकशीसाठी एनसीबीच्या कार्यालयात हजर झाले. सध्या त्यांची चौकशी सुरु आहे.
दरम्यान याच प्रकरणी एनसीबीने मुंबईतील मुच्छड पानवाला यालाही समन्स बजावला होता. त्यानंतर चौकशी करुन त्याला अटक करण्यात आली.
किरीट सोमय्या यांचं ट्वीट तत्पूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज सकाळी ट्वीटकरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका मंत्र्याचा जावई ड्रग्ज प्रकरणात एनसीबी चौकशीच्या फेऱ्यात असल्याचं म्हटलं होतं. परंतु या ट्वीटमध्ये त्यांनी कोणाचाही उल्लेख केला नव्हता.
Now DAMAD of NCP Minister under investigation of Narcotics Control Bureau, involvement in Drug Scam @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra @BJP4India @ChDadaPatil @mipravindarekar
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) January 13, 2021
परंतु त्यानंतर काही वेळातच त्यांनी आणखी एक ट्वीट केलं, ज्यात त्यांनी थेट नवाब मलिक यांचं नाव घेतलं आहे. "नवाब मलिक जवाब दो", असं किरीट सोमय्या यांनी आपल्या ट्वीट म्हटलं.
Navab Malik Javab Do!!@Dev_Fadnavis @BJP4India @BJP4Maharashtra @ChDadaPatil
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) January 13, 2021
दरम्यान या विषयी नवाब मलिक यांनी बोलण्यास नकार दिला.