Rajya Sabha Election 2022 : शिवसेनेच्या निमंत्रणाकडे पाठ फिरवून संभाजीराजे कोल्हापूरकडे रवाना
Rajya Sabha Election 2022 : राज्यसभा उमेदवारीसाठी संभाजीराजे छत्रपतींना शिवसेनेने पक्षप्रवेशाचं निमंत्रण दिलं होतं. परंतु शिवसेनेच्या निमंत्रणाकडे पाठ फिरवून संभाजीराजे कोल्हापूरकडे रवाना झाले आहेत.
Sambhajiraje Chhatrapati : संभाजीराजे छत्रपती शिवसेनेत प्रवेश करणार नाहीत. शिवसेनेच्या निमंत्रणाकडे संभाजीराजे पाठ फिरवली असून आज पहाटेच ते कोल्हापूरकडे रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी एबीपी माझाला दिली आहे. राज्यसभेच्या उमेदवारीसाठी शिवसेना प्रवेशाची अट संभाजीराजे यांना घालण्यात आली आहे.
संभाजीराजे छत्रपती आज दुपारी 12 वाजता वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार होते. शिवसेनेने त्यांना पक्ष प्रवेशाचं निमंत्रण दिलं होतं. त्यामुळे राज्यसभेच्या खासदारकीसाठी संभाजीराजे शिवबंधन बांधणार का? याची उत्सुकता सर्वांना लागली होती. परंतु संभाजीराजे यांनी शिवसेनेच्या निमंत्रण पाठ फिरवली असून कोल्हापूरकडे रवाना झाले आहेत. त्यामुळे ते शिवसेनेत प्रवेश करणार नाहीत.
संभाजीराजे घेणार मुख्यमंत्र्यांची भेट, खासदारकीसाठी शिवबंधन बांधणार का?
महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार म्हणून संधी देण्याची संभाजीराजे यांच्याकडून मागणी झाल्याची माहिती आहे. शिवसेना आणि महाविकास आघाडी यावर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. आज दुपारी 12 वाजता संभाजीराजे छत्रपती यांनी अधिकृत पक्षप्रवेश करावं, त्यानंतर त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात येईल असा निरोप मुख्यमंत्र्यांच्या वतीनं संभाजीराजेंना देण्यात आला होता. यावर शिवसनेचे नेते संजय राऊत यांनी संभाजीराजेंसोबत फोनवरुन चर्चा केली होती. आता शिवसेनेची ही ऑफर संभाजीराजेंनी नाकारल्याची माहिती आहे.
मराठा मोर्चा समन्वयकांशी चर्चा करुन निर्णय घेणार
शिवसेनेची ही ऑफर नाकारल्यानंतर संभाजीराजे छत्रपती मराठा मोर्चाच्या सर्व समन्वयकांशी चर्चा करणार असल्याची माहिती आहे. मराठा मोर्चा समन्वयकांनी आज पुण्यामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतली होती. त्यावेळी संभाजीराजेंच्या उमेदवारीला पाठिंबा द्यावा अशीही मागणी त्यांनी शरद पवार यांच्याकडे केली होती. राज्यसभेच्या सहा जागांसाठी 10 जूनला निवडणूक होणार आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेनेची उमेदवारी स्विकारुन निवडणूक लढवावी, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं होतं. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून शिवसेना संभाजीराजे छत्रपतींना राज्यसभेसाठी उमेदवारी देणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं.
महत्त्वाच्या बातम्या: