Save Soil Campaign : सदगुरू जग्गी वासुदेव यांच्या 'माती वाचवा' मोहिमेला मुंबईत पाठिंबा
Save Soil Campaign या मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी आणि मदत करण्यासाठी सुमारे 200 दुचाकीस्वारांच्या गटाने रविवारी मुंबईतील चार ठिकाणांवर रॅली काढली.
मुंबई: ईशा फाऊंडेशनचे संस्थापक सदगुरू जग्गी वासुदेव यांनी 'माती वाचवा' नावाची जागतिक मोहीम सुरू केली आहे. मातीचा होणारा ऱ्हास लक्षात घेता त्याच्या संवर्धनासाठी जागरुकता निर्माण करण्यासाठी सदगुरू जग्गी वासुदेव यांनी ही मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी आणि मदत करण्यासाठी सुमारे 200 दुचाकीस्वारांच्या गटाने रविवारी मुंबईतील चार ठिकाणांवर रॅली काढली.
मुंबईतील या रॅलीला गिरगाव चौपाटीपासून साडेसहा वाजता सुरुवात झाली. मलबार हिल येथील प्रियदर्शनी उद्यान या ठिकाणी रॅली आली. नंतर दादरच्या शिवाजी पार्क आणि वांद्रे किल्ल्यावर या रॅलीची सांगता करण्यात आली.
सर्व स्वयंसेवक 'माती वाचवा' अशा आशयाचे टी-शर्ट परिधान करून, प्लेकार्ड दाखवून मातीबद्दल जागरूकता निर्माण करतात. त्यांनी माती वाचवा या गीताची प्रतिज्ञाही केली आणि त्याची सांगता झाली. गेल्या काही महिन्यांत माती वाचवा चळवळीला जगभरातील लोकांकडून व्यापक आधार मिळाला आहे. ही बाईक रॅली म्हणजे आपल्या समाजाला या कार्याचे महत्त्व कळल्याचे प्रतीक आहे. या चळवळीला स्वयंसेवक आणि मोटरसायकल चालकांकडून मिळालेल्या प्रतिसादाने सर्वजण भारावून गेलो आहे असं ईशा फाऊंडेशनच्या वतीनं सांगण्यात आलं.
माती आणि पाण्याचे संवर्धन आवश्यक
मातीचा होणारा ऱ्हास लक्षात घेता त्याच्या संवर्धनासाठी जागरुकता निर्माण करण्यासाठी सदगुरू जग्गी वासुदेव यांनी ही मोहीम सुरू केली आहे. भारतातच नव्हे तर जगभरात शेतकरी आत्महत्या करत असल्याचं ते म्हणाले. या अभियानाच्या माध्यमातून वाढत्या वाळवंटीकरणावर जागरुकता आणि मातीचा होणारा ऱ्हास थांबवण्याचे प्रयत्न केले जातील असंही त्यांनी स्पष्ट केलं. सदगुरुंचे हे अभियान जागतिक अन्न संघटना आणि युनायटेड नेशन्स कन्झर्व्हेशन टू कॉम्बॅट डेजर्टीफिकेशन यांच्या माध्यमातून आहे.
यूएनसीसीडी म्हणजे युनायटेड नेशन्स कन्झर्व्हेशन टू कॉम्बॅट डेजर्टीफिकेशन (UNCCD) ने त्यांच्या एका अहवालात सांगितलं आहे की, 2050 सालापर्यंत जगभरातील 90 टक्के मातीचा ऱ्हास होण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम हा अन्न सुरक्षा, पाण्याचा तुटवडा, दुष्काळ, वातावरणातील बदल, स्थलांतर यावर होणार आहे. Save Soil campaign चा उद्देश हा जगभरातील किमान साडेतीन अब्ज किंवा 60 टक्के लोकांमध्ये मातीच्या संवर्धनाविषयी जागरुकता निर्माण करणे हा आहे.