स्कॉर्पिओ कारमधील धमकीचं पत्र सचिन वाझेंनीच ठेवलं; एनआयच्या चौकशीत वाझेंची कबुली
सचिन वाझे यांच्यावर यूएपीएच्या कलम 16 आणि 18 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दहशतवादी कृत्य किंवा राष्ट्रविरोधी कारवायांविरोधात ही कलमं लावली जातात.
मुंबई : मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया बंगल्याबाहेरील स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ कारमधील धमकीच्या पत्राचं रहस्य उलगडलं आहे. NIA च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अँटिलियाजवळ पार्क केलेल्या स्कॉर्पिओ कारमध्ये सापडलेले धमकीचं पत्र स्वत: निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे यांनी ठेवलं होते. वाजे यांनी एनआयएच्या चौकशीत याची कबुली दिली आहे.
विनायक शिंदे यांच्या घरी सापडलेल्या एका प्रिंटरच्या माध्यमातून हे इंग्रजी पत्र तयार केलं होतं. ज्याचा तपास फॉरेन्सिक टीममार्फत करण्यात येत आहे. आज एनआयए सचिन वाझे व्यतिरिक्त मनसुख हिरण यांच्या हत्येतील आरोपी विनायक शिंदे आणि नरेश यांच्या कोठडीची मागणी करणार आहे. कोठडी मिळाल्यानंतर नरेश आणि विनायक यांची चौकशी केली जाणार आहे. काही दिवसांनी या सर्वांना समोरासमोर बसवून चौकशी केली जाऊ शकते.
सचिन वाझे यांच्या विरोधात UAPA अंतर्गत कारवाई
अँटिलिया स्फोटक प्रकरणी सचिन वाझे यांच्याविरोधात आता गैरकायद कृत्य प्रतिबंधित अधिनियम (UAPA) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दहशतवादी कृत्य किंवा राष्ट्रविरोधी कारवायांविरोधात ही कलमं लावली जातात. एनआयएने बुधवारी विशेष एनआयए कोर्टाला या प्रकरणात यूएपीए कलम लावण्याविषयी माहिती देताना अर्ज दाखल केला. वाझे यांच्यावर यूएपीएच्या कलम 16 आणि 18 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Mansukh Hiren case | मनसुख हिरण प्रकरणातील एटीएसकडे असलेले दोन्ही आरोपी एनआयएच्या ताब्यात
सचिन वाझे यांची कोठडी संपण्याच्या एक दिवस आधी एनआयएने हे पाऊल उचललं आहे. एनआयए मनसुख हिरण यांच्या हत्येचाही तपास करत आहे. 5 मार्च रोजी मनसुख हिरण यांचा मृतदेह ठाण्यातील खाडीत सापडला होता.