एक्स्प्लोर
पंकजा मुंडेंकडून पटेल, पवार, तटकरेंनी काहीतरी शिकावं: सामना
मुंबई: ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतल्याच्या पार्श्वभूमीवर चर्चांना उधाण आलं होतं. याच भेटीवरुन शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून राष्ट्रवादीवर निशाणा साधण्यात आला आहे.
आज भुजबळ ‘जात्या’त असले तरी काँग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक पुढारी ‘सुपा’त आहेत आणि निदान ‘आत’ले अनुभव आणि व्यवस्थेविषयी जाणून घेण्यासाठी तरी या मंडळींनी भुजबळांना भेटायलाच हवे होते, असं सामनामध्ये म्हटलं आहे.
मराठा मोर्चांचे ‘तांडव’ बाहेर चालले आहे म्हणून पंकजा मुंडे भुजबळांना भेटल्या काय? असे सवाल करणार्यांेच्या डोळ्यात सडक्या राजकारणाचा वडस वाढला आहे. तसेच पंकजाताई खंगलेल्या, थकलेल्या काकांना भेटायला गेल्या. पटेल, पवार, तटकरे यांनी काही शिकावे असा हा प्रसंग आहे, असंही सामनातून म्हटलं आहे.
एक नजर सामनाच्या अग्रलेखावर:
* छगन भुजबळ हे आमचे राजकीय विरोधक आहेत, पण सध्या ते ज्या अवस्थेतून जात आहेत त्याबद्दल आम्हाला माणूस म्हणून सहानुभूती आहे. भुजबळ यांनी शिवसेनेच्या तसेच शिवसेनाप्रमुखांच्या बाबतीत जे अघोरी कृत्य केले त्याचा कोळसा आम्हाला इथे उगाळायचा नाही. त्या कर्माचे फळ त्यांना मिळालेच आहे, पण ज्या राष्ट्रवादीसाठी भुजबळांनी ही सर्व अघोरी कृत्ये केली तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज भुजबळांना ‘कलटी’ देऊन दूर पळाला आहे. म्हणूनच पंकजा मुंडे यांनी जे.जे. रुग्णालयात जाऊन भुजबळांची चौकशी केली, प्रकृतीबाबत विचारपूस केली, या धाडसाचे आम्हाला कौतुक वाटते.
* भुजबळ व आसाराम बापू हे बर्यागच काळापासून तुरुंगात पडले आहेत. दोघांवरील गुन्हे आणि खटल्याचे स्वरूप पूर्णपणे वेगळे आहे, पण आमची न्याययंत्रणा कायद्यानेच चालते की कुणाच्या इशार्याेवर चालते याचा संशय येतो. गोव्यातील एका आमदार महाशयांवर बलात्कार, लैंगिक शोषणाचे आरोप पुराव्यांसह झाले. संबंधित पीडित मुलीने तसे पोलिसांना सांगितले. भक्कम पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी या आमदार महाशयांना अटक केली व फक्त आठवडाभरातच हे आमदार महाशय जामिनावर सुटून बाहेर आले. माझ्या विरोधकांनी मला संपविण्यासाठी कट रचल्याचे हे आमदार महाशय सांगतात. खरेखोटे न्यायदेवताच सांगेल, पण बलात्काराच्या आरोपाखालील आमदार महाशय बाहेर येऊन मोकाट सुटले. आसाराम बापू हे चारेक वर्षे तुरुंगात पडले आहेत. त्यांच्यावर महिला भक्तांशी गैरवर्तन, त्यांचे शोषण केल्याचा आरोप आहे व त्यांचे जामिनाचे अर्ज रोज फेटाळले जात आहेत.
* भुजबळांच्या चांगल्या दिवसांत सगळेच ‘साहेब’, ‘भुजबळसाहेब’ म्हणून उदो उदो करीत होते. भुजबळांच्या राजकीय मंचावरील नाट्यमय भाषणांना व विधिमंडळातील ठोसेबाजीला दाद मिळत होती. भुजबळ फार्मवर पाहुणचाराच्या पंगती झडत होत्या, पण आज थकलेल्या व खंगलेल्या भुजबळांना कुणी भेटायला गेले नाही. पंकजा मुंडे जे.जे. रुग्णालयात पोहोचल्या तेव्हा ‘‘यात ‘ओबीसी’चे काही राजकारण तर नाही ना?’’ अशा भुवया उंचावणार्यांळचीही आम्हाला कीव वाटते. राजकारण गेले चुलीत, पण मला या ‘अंडा सेल’मधून बाहेर काढा अशा मानसिकतेत भुजबळ असावेत.
* भ्रष्टाचार, आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपाखाली भुजबळ ‘आत’ आहेत. आज भुजबळ ‘जात्या’त असले तरी काँग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक पुढारी ‘सुपा’त आहेत व निदान ‘आत’ले अनुभव आणि व्यवस्थेविषयी जाणून घेण्यासाठी तरी या मंडळींनी भुजबळांना भेटायलाच हवे होते. पंकजा मुंडे भेटल्या हे त्यांचे धाडस. गोपीनाथ मुंडे हयात असते तर त्यांनीही अशीच हिंमत दाखवली असती. कर्माची फळे प्रत्येक जण भोगतच असतो, पण तोपर्यंत माणुसकी जपायला काय हरकत आहे?
* मराठा मोर्चांचे ‘तांडव’ बाहेर चालले आहे म्हणून पंकजा मुंडे भुजबळांना भेटल्या काय? असे सवाल करणार्यांाच्या डोळ्यात सडक्या राजकारणाचा वडस वाढलाय. पंकजाताई खंगलेल्या, थकलेल्या काकांना भेटायला गेल्या. पटेल, पवार, तटकरे यांनी काही शिकावे असा हा प्रसंग आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement