Mumbai Covid Scam : मोठी बातमी! ऑक्सिजन प्लांट घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांकडून कंत्राटदार रोमीन छेडा याला अटक
Covid Scam : ऑक्सिजन प्सांट घोटाळा प्रकरणी हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीचा प्रमुख रोमिन छेडा याला आज अटक करण्यात आली. आर्थिक गुन्हे शाखेने रोमिनची गुरुवारी (23 नोव्हेंबर 2023) सलग आठ तास चौकशी केली होती.
मुंबई : कोरोना काळात (Covid Scam) मुंबईतील ऑक्सिजन जनरेशन प्लांट घोटाळा (Oxygen Generation Plant Scam) प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गु्न्हे शाखेने (Mumbai Police EOW) आज मोठी कारवाई केली. हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीचा प्रमुख रोमिन छेडा (Romin Chheda) याला आज अटक करण्यात आली. आर्थिक गुन्हे शाखेने रोमिन छेडा याची गुरुवारी (23 नोव्हेंबर 2023) सलग आठ तास चौकशी केली होती. त्यानंतर आज त्याला अटक करण्यात आली. रोमिन छेडा याचे संबंध शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena UBT) नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्याशी असल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला होता.
आर्थिक गुन्हे शाखेकडून बुधवारी रात्री नागपाडा पोलीस ठाण्यात त्याचा विरोधात गुन्हा दाखल केला होता. रोमिन छेडा हे हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीचे मालक असून या कंपनीला कोविड काळात ऑक्सिजन प्लांट संबंधित कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले होते. या सर्व प्रकरणात गैरप्रकार आढळल्याने आर्थिक गुन्हे शाखेने याची चौकशी करत गुन्हा दाखल केला. आज पुन्हा चौकशी करण्यात आल्यानंतर रोमिनला पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली.
प्रकरण काय?
मुंबई पोलिसांनी 'एफआयआर'मध्ये दिलेल्या माहितीनुसार, मुंबई महानगरपालिकेच्या व्ही. एन. देसाई रुग्णालय, बी डी बी ए रुग्णालय, जीटीबी, कस्तुरबा, नायर, कूपर, भाभा, केईएम आणि सायन रुग्णालयात 30 दिवसात ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभारण्यासाठी कंत्राट देण्यात आले होते. हे कंत्राट रोमिन छेडा यांच्याशी संबंधित हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले होते.
हायवे कन्स्ट्रक्शन कंपनी ही उत्तर प्रदेश मधील कंपनी आहे. कोणतेही अनुभव नसताना आणि नियमांमध्ये बसत नसताना हे कंत्राट मिळवले. तसेच दिलेल्या 30 दिवसांच्या मुदती पेक्षा जास्त विलंबाने म्हणजेच ऑक्टोबर 2021 किंवा त्याही नंतर ऑक्सिजन प्लांट पालिकेला सुपूर्द केले. असे असूनही पालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी छेडा यांच्याशी संगनमताने ते कंत्राट तर या कंपनीला दिलेच, पण प्लांट उभारणीला विलंब झाल्याने दंड देखील कमी आकारला. यामुळे पालिकेचे 6 कोटी रुपयांचे नुकसान झाले. तसेच अनेक ऑक्सिजन अभावी नाहक बळी गेले.
सोमय्यांचे उद्धव ठाकरेंवर आरोप
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ऑक्सिजन प्लांट प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केले होते. रोमिन छेडा यांच्या हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीला उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यामुळे ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभारण्याचे कंत्राट दिले गेले असल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता.
कोविड काळात त्यावेळचे मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी देखील ऑक्सिजन जनरेशन प्लांटच्या कंत्राटाच्या विरोधात मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंग सहल यांना पत्र लिहून विरोध केला होता. त्यांची दोन पत्रे किरीट सोमय्या यांनी बाहेर आणली असून, नंतरच्या काळात असलम शेख यांचा विरोध का मावळला असे म्हणत असलम शेख यांच्या चौकशीची मागणी देखील त्यांनी केली आहे.
तसेच जंबो कोविड सेंटर्समध्ये देखील ऑक्सिजन प्लांट उभारणीसाठी 64 कोटी रुपयांचे कंत्राट याच कंपनीला देण्यात आले होते. मात्र हे प्लांट अपूर्ण असतानाच ते पूर्ण आहेत असे दाखवून पालिकेकडून पैसे उकळले गेले असल्याचा आरोप आहे.