संविधानानं प्रत्येकाला आंदोलनाचा अधिकार दिलाय, त्यांना मैदानात येण्यापासून कोणीही रोखू शकत नाही; रोहित पवारांची प्रतिक्रिया
Rohit Pawar :मनोज जरांगेंच्या आंदोलनाला आझाद मैदानावरील आंदोलनाला पोलिसांनी परवानागी नाकारल्यानंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया समोर आलीये.
मुंबई : मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी सुरु केलेल्या मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation)आंदोलनाला मुंबईत पोलिसांनी परवानगी नाकारल्याची माहिती समोर आली. यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिलीये. संविधानाने प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार दिलेला आहे. हे युवावर्गाचं आंदोलन असून त्यांना कोणाही आझाद मैदानात (Azad Maidan) येण्यापासून रोखू शकत नाही, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी एबीपी माझाला दिली.
आमदार रोहित पवार यांनी आझाद मैदानावर पोहचून तिथे पाहणी केली. उद्या म्हणजेच 26 जानेवारी रोजी मराठा समाजाचा मोर्चा हा मुंबईत दाखल होणार आहे. दरम्यान आझाद मैदानावर मराठा मनोज जरांगे यांच्याकडून आझाद मैदानावर परवनागी मागण्यात आली होती. परंतु ती परवानगी पोलिसांनी नाकारली. याच दरम्यान रोहित पवार यांनी या आंदोलनाला परवानगी नाकारल्यामुळे नाराजी व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं.
मनोज जरांगे यांना नोटीस
दुसरीकडे, मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांना नोटीस पाठवली आहे. मुंबईत होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही नोटीस देण्यात आली आहे. तसेच, मराठा आंदोलनामुळे विपरित परिणाम होऊन मुंबईची दैनंदिन वाहतूक व्यवस्था कोलमडेल असं नोटीसमध्ये म्हटलं आहे. आंदोलकांची संख्या लक्षात घेता मुंबईत आंदोलकांना जागा पुरेल एवढे मोठे एकही मैदान नाही, त्यामुळे आंदोलन करण्यासाठी खारघरमधील इंटरनॅशनल कॉर्पोरेशन पार्क मैदान संयुक्तिक राहील असे पोलिसांकडून नोटीसमध्ये सांगण्यात आले आहेत.
मनोज जरांगे काय म्हणाले?
आम्ही आतापर्यंत लोणावळ्यात थांबलो आहोत. कारण आम्हाला मार्ग काढायचा आहे, पण आम्हाला आरक्षण हवं आहे. कुठेही मार्ग निघो म्हणून आम्ही इथे थांबलो आहे. आम्हाला आरक्षण मिळणार आहे, मिळाल्यावर गावाकडे जाऊ. आम्हाला तिकडे मुंबईत जाण्याची हौस नाही. पण मराठा समाजाला आरक्षण हवं. दीड दिवसापूर्वी तेच सांगितलं, आठ दिवसापूर्वी तेच सांगितलं. पण तुम्ही शिष्टमंडळ पाठवा किंवा काहीही चर्चा करा, पण आम्हाला आरक्षण हवंच आहे. तुम्हाला जो निर्णय घ्यायचा आहे तो घ्या, आम्ही तोपर्यंत मुंबईकडे जातो.
मनोज जरांगे यांचं आंदोलन मुंबईच्या वेशीवर धडकणार
मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) एल्गार पुकारलेल्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची पायीदिंडी पुण्यातून आता मुंबईच्या दिशेने रवाना झाली आहे. दरम्यान हे वादळ आता नवी मुंबईत धडकणार आहे. पुण्यातील अभूतपूर्व स्वागतानंतर लोणावळ्यात आज सकाळी मनोज जरांगे पाटील यांचा ताफा पोहोचला. मनोज जरांगे यांनी आरक्षण घेतल्याशिवाय माघार घेणार नाही, असा निर्धार केला आहे. तसेच समाजाशी चर्चा केल्याशिवाय कोणताही निर्णय घेणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.