एक्स्प्लोर
प्रजा फाऊंडेशनचा अहवाल, मुंबईतील आमदारांचं रिपोर्ट कार्ड
प्रजा फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेने मंगळवारी मुंबईतील आमदारांचा वार्षिक कार्य अहवाल प्रकाशित केला. त्यातून ही माहिती समोर आली.
मुंबई : मुंबईतील आमदारांची सभागृहातील कामगिरी दिवसेंदिवस घटत आहे. मुंबईतील आमदारांची सरासरी गुणसंख्या 2016 च्या 65.11 टक्क्यांच्या तुलनेत 2018 मध्ये 59.33 टक्के इतकी कमी नोंदवण्यात आली आहे. प्रजा फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेने मंगळवारी मुंबईतील आमदारांचा वार्षिक कार्य अहवाल प्रकाशित केला. त्यातून ही माहिती समोर आली.
कामगिरीमध्ये अव्वलस्थानी असलेल्या तीन आमदारांमध्ये काँग्रेसचे अमीन अमीर अली पटेल, शिवसेनेचे सुनील वामन प्रभू आणि भाजपचे अतुल भातखळकर यांचा समावेश. त्यांची सरासरी गुणसंख्या अनुक्रमे 76.45 टक्के, 75.61 टक्के आणि 74.67 टक्के इतकी नोंदवली.
या वर्षीचा अहवाल आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांसाठीही महत्वाचा आहे. अहवालातील माहितीनुसार, सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेच्या आमदारांची सरासरी गुणसंख्या 58 टक्के इतकी आहे. तुलनेने प्रजा फाऊंडेशनने प्रकाशित केलेल्या चार कार्य अहवालांमध्ये गेल्या वेळी सत्ताधारी असणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची सरासरी गुणसंख्या 62 टक्के इतकी होती.
आमदारांच्या वार्षिक कार्य अहवालाच्या क्रमवारीसाठी त्यांचा चर्चेतील सहभाग, त्यांच्यावरील गुन्हे, लोकांचे समज याबाबतच्या माहितीचे विश्लेषण केलं जातं. या कार्य अहवालातून मुंबईतील 32 आमदारांचं कार्य प्रदर्शन प्रकाशित केलं आहे. त्यानुसार आताच्या बहुतेक आमदारांची सरासरी गुणसंख्या सुरुवातीच्या वर्षात 65.11 टक्क्यांवरुन 59.33 टक्के इतकी घसरली आहे, अशी माहिती प्रजा फाऊंडेशनचे संचालक मिलिंद म्हस्के यांनी दिली.
सभागृहातील उपस्थिती घटली
या अहवालानुसार, आमदारांच्या विधानसभा सभागृहातील उपस्थितीचंही विश्लेषण करण्यात आलं आहे, जे गेल्या वर्षीच्या तुलनेत 10.63 टक्क्यांनी घटलं आहे. याशिवाय 2018 मध्ये मुंबईतील 44 टक्के म्हणजे 16 आमदारांवर आरोपपत्र नोंदवण्यात आले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही 8 टक्क्यांची वाढ आहे.
प्रश्न विचारण्याची संख्याही घटली
मुंबईतील आमदारांच्या गेल्या सात वर्षांतील कार्य अहवालानुसार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची संख्या कमी होत चालली आहे. ही आकडेवारी 2011 पासून प्रत्येक वर्षी 7946, 11,049, 9188, 10435, 4343, 6199 ते यावर्षी 4519 अशी कमी झाली आहे. याचवेळी यावर्षी सत्ताधारी भाजप आणि शिवसेना आमदारांनी सरासरी 115 प्रश्न विचारले, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनी त्यांच्या कार्यकाळात सरासरी 123 प्रश्न विचारले.
कार्य अहवालातील ठळक मुद्दे
विधानसभा सभागृहात मुंबईमधील आमदारांच्या सरासरी उपस्थितीत 10.63 टक्क्यांची घट. 2017 मध्ये 91.88 टक्के असलेली सरासरी उपस्थिती घसरून 2018 मध्ये 81.25 टक्के
आमदारांकडून सभागृहात विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांच्या संख्येतही घट. 2017 मध्ये विचारण्यात आलेले प्रश्न 6199 तर 2018 मध्ये विचारण्यात आलेले प्रश्न 4519
विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचा दर्जाही घसरला. 2016 मध्ये टक्केवारी 58.49 होती, घसरून 2017 मध्ये 38.18 टक्के तर 2018 मध्ये 38.36 टक्के.
आमदारांची नागरिकांप्रती उपलब्धता 2017 च्या 45.55 टक्क्यांवरुन वाढ होऊन 2018 मध्ये 53.31 झाली
काँग्रेसच्या आमदारांची गेल्या 3 वर्षांमध्ये सर्वाधिक सरासरी गुणसंख्येची नोंद. त्यांनी 2016 मध्ये 76.83 टक्के, 2017 मध्ये 74.69 टक्के आणि 2018 मध्ये 68.22 टक्के इतकी सरासरी गुणसंख्या नोंदवली.
अव्वलस्थानी असलेल्या तीन आमदारांमध्ये काँग्रेसचे अमीन अमीर अली पटेल, शिवसेनेचे सुनिल वामन प्रभू आणि भाजपचे अतुल भातखळकर यांचा समावेश. त्यांची सरासरी गुणसंख्या अनुक्रमे 76.45 टक्के, 75.61 टक्के आणि 74.67 टक्के इतकी नोंदवली.
2018 मध्ये 16 आमदारांवर (44 टक्के) गुन्हे नोंदवण्यात आले आहेत, तर 2017 मध्ये हेच प्रमाण 13 आमदारांचे म्हणजेच 36 टक्के इतके होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
पुणे
बीड
राजकारण
Advertisement