(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ठाण्यातील खासगी रुग्णालयाची नोंदणी रद्द; महापालिकेने पर्याय निर्माण करावा, भाजपची मागणी
ठाणे महानरपालिकेच्या हद्दीत covid-19 च्या रुग्णालयांमध्ये एकूण 4223 बेड उपलब्ध आहेत. यापैकी शंभर बेड्स होरायझन प्राईम हॉस्पिटल मधील होते. त्यामुळे जर रुग्ण संख्या वाढली असेल तर या हॉस्पिटलसाठी पर्यायी मार्ग शोधावा लागेल.
ठाणे : ठाण्यातील होरायझन प्राईम या हॉस्पिटलवर ठाणे महानगर पालिकेकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. रुग्णांकडून अवाजवी बिल आकारले गेल्याने महापालिकेने हॉस्पिटलचा रुग्णालयाचा दर्जा रद्द केला असून हॉस्पिटलची मान्यता देखील एका महिन्यासाठी रद्द करण्यात आली आहे. मात्र असे केल्याने महानगरपालिकेतील रुग्णांसाठी असलेली बेड्सची संख्या कमी झाल्याने पालिकेने पर्यायी व्यवस्था उभी करावी अशी मागणी आता करण्यात येत आहे.
ठाणे महानरपालिकेच्या हद्दीत covid-19 च्या रुग्णालयांमध्ये एकूण 4223 बेड उपलब्ध आहेत. यापैकी शंभर बेड्स होरायझन प्राईम हॉस्पिटल मधील होते. त्यामुळे जर रुग्ण संख्या वाढली असेल तर या हॉस्पिटलसाठी पर्यायी मार्ग शोधावा लागेल. 'कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन, होरायझन प्राईम रुग्णालय महापालिकेने बंद करण्याऐवजी अधिग्रहित करून, महापालिकेने ठरविलेल्या दरात रुग्णांवर उपचार करावेत,' अशी मागणी भाजपाचे गटनेते संजय वाघुले यांनी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्याकडे केली आहे.
'यापूर्वी महापालिकेने जनरल वॉर्डसाठी प्रतिदिन 4 हजार रुपये (बेड चार्जेस, डॉक्टर व्हीजीट, नर्सिंग चार्जेस, पीपीई कीट्स व जेवणाचा खर्च समाविष्ट, औषधे व सर्जिकल साहित्याच्या खर्चाला बाजारभावापेक्षा 15 टक्के कमी दराने आकारणी), ट्वीन शेअरिंग रुमसाठी 5 हजार रुपये, सिंगल रुमसाठी 7 हजार रुपये आणि आयसीयूमध्ये दाखल झालेल्या रुग्णांसाठी 10 हजार रुपये दर निश्चित केले होते. त्याचबरोबर व्हेंटिलेटर आवश्यक असलेल्या रुग्णांसाठी 2 हजार रुपये अतिरिक्त आकारण्यात येणार होते. याच दरांची अंमलबजावणी करावी', अशी विनंती देखील संजय वाघुले यांनी केली आहे.
होरायझन प्राईम हॉस्पिटलमध्ये सध्या 80 रुग्ण उपचार घेत असून, जोपर्यंत त्यांच्यावरील उपचार पूर्ण होत नाहीत तोपर्यंत पालिकेकडून दोन सदस्यांची एक टीम तैनात करण्यात आली आहे. या रुग्णांवर योग्य आणि माफक दरात उपचार होतील याची काळजी या दोन सदस्यांची असणार आहे. मात्र पुढील एक महिन्यापर्यंत या रुग्णालयात एकही नवीन covid-19 चे रुग्ण दाखल करण्यात येणार नाही.
दुसरीकडे ठाणे मतदाता जागृती मंचाद्वारे कारवाईला समर्थन जरी देण्यात आले असले तरी ठाण्यातील जुपिटर, हिरानंदानी आणि क्यूरे हॉस्पिटल पालिकेने covid-19 रुग्णालय घोषित करावी अशी मागणी करण्यात आली आहे. 'कोविडची साथ पसरत आहे ते बघता, ज्युपिटर, हिरानंदानी, क्युरे इ. हॉस्पिटल कोविड हॉस्पिटल म्हणून घोषित करावी आणि शासन मान्य दरात ट्रीटमेंट मिळेल याची निश्चिती करावी, मंजूर दरात कोविड पेशंटला सेवा देण्याचे बंधन घालून हॉस्पिटल सुरु करण्यास परवानगी द्यावी. वरील दोन्ही मागण्या या बंधनकारक असाव्यात. त्या जर हॉस्पिटल व्यवस्थापनास मान्य नसतील तर हॉस्पिटल पालिकेने ताब्यात घेऊन ते चालवावे' , अशी मागणी ठाणे मतदाता जागृती अभियानाचे संजीव साने यांनी पालिकेला केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
अवाजवी बिल आकारल्याने हॉस्पिटलची मान्यता रद्द, ठाणे महापालिकेची कारवाई