विधिमंडळात पावसाळी अधिवेशनाची तयारी; आजपासून 50 टक्के कर्मचार्यांची ड्युटी, दिव्यांग कर्मचाऱ्यांना सूट
कर्मचाऱ्यांची संख्या 50 टक्क्यांनी वाढवण्याबाबत बृहनमुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने आक्षेप घेतला आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना टक्क्यांची उपस्थिती कायम ठेवली असतांना विधिमंडळ सचिवलयाने 50 टक्के उपस्थिती अनिवार्य करण्याची घाई करू नये.
![विधिमंडळात पावसाळी अधिवेशनाची तयारी; आजपासून 50 टक्के कर्मचार्यांची ड्युटी, दिव्यांग कर्मचाऱ्यांना सूट Rainy session preparation starts in vidhimandal, 50 per cent employee presence compulsory विधिमंडळात पावसाळी अधिवेशनाची तयारी; आजपासून 50 टक्के कर्मचार्यांची ड्युटी, दिव्यांग कर्मचाऱ्यांना सूट](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/12/06094458/vidhanbhavan-compressed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या सावटात राज्याच्या विधिमंडळाने आजपासून अधिकारी व कर्मचार्यांची उपस्थिती 15 टक्क्यांवरून 50 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. 3 ऑगस्टपासून सुरू होणारे पावसाळी अधिवेशनाच्या तयारीसाठी विधिमंडळातील अधिकारी व कर्मचार्यांच्या उपस्थितीत वाढ करण्यात आली आहे. विधिमंडळ सचिवालयाने कर्मचार्यांच्या उपस्थितीसंदर्भात एक आदेश जारी केला आहे. ज्यामध्ये संबंधित विभागाचे सचिव व कक्ष अधिकारी यांची उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. मंत्रालयानंतर राजभवनात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर आता विधिमंडळातही कोरोनाच्या वाढत्या प्रदुभवामुळे चिंतेचे वातावरण आहे.
कोरोनामुळे विधिमंडळातील एका क्लर्क टायपिस्ट यांचे निधन झाले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार आतापर्यंत विधिमंडळातील 16 ते 17 कर्मचार्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 8 ते 9 पोलिसांचा सहभाग आहे. यापैकी अनेक जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. पुन्हा अधिवेशन तयारी आणि नव्या नियमानुसार कामावर रुजू होणार आहेत.
विधिमंडळात जवळपास 850 कर्मचारी कार्यरत असून नव्या नियमानुसार किमान 400 कर्मचाऱ्यांना हजर राहावं लागणार आहे. 22 किंवा 23 जुलै रोजी कामगार सल्लागार समितीची बैठक होणार आहे. या बैठकीत पावसाळी अधिवेशनाबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. मात्र तत्पूर्वी अधिवेशनातील तारांकित - आतरांकित प्रश्न - उत्तरं घेणं, संबंधित अधिकाऱ्यांचे पासेस बनवणं, सुरक्षा आढावा या सर्व कामकाजासाठी अधिकच्या कर्मचाऱ्यांची उपस्थिती गरजेची आहे.
विधिमंडळ सचिवालयाच्या आदेशानुसार 1 जुलै ते 31 जुलै या कालावधीत अधिकारी व कर्मचार्यांची 50 टक्के उपस्थितीचे परिपत्रक काढण्यात आले आहे. मात्र विधिमंडळातील दिव्यांग कर्मचाऱ्यांना उपस्थितीत राहण्यापासून सूट देण्यात आली आहे. तसेच ज्या कर्मचाऱ्यांची रजा आधीच मंजूर झाली आहे, त्याव्यतिरिक्त उर्वरित कर्मचार्यांना रोस्टरच्या आधारे कार्यालयात यावे लागेल.
विधिमंडळ सचिव यांच्या माहितीनुसार कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेविषयी सर्व काळजी घेण्यात आली आहे. आतापर्यंत विधानभवन इमारत आणि परिसरात एकूण तीन वेळा निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. याशिवाय कर्मचार्यांसाठी स्वच्छ पाणी आणि ठिकठिकाणी सॅनिटायझर ठेवण्यात आले आहेत.
मात्र तरीही कर्मचाऱ्यांची संख्या 50 टक्क्यांनी वाढवण्याबाबत बृहनमुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने आक्षेप घेतला आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना टक्क्यांची उपस्थिती कायम ठेवली असतांना विधिमंडळ सचिवलयाने 50 टक्के उपस्थिती अनिवार्य करण्याची घाई करू नये, असं मत संघटनेचे सचिव अविनाश दौंड यांनी व्यक्त केलं आहे. तसेच विधिमंडळात अनेक लोकप्रतिनिधी येत असतात. त्यामुळे त्यांच्यामार्फत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव त्यांच्या मतदारसंघा होण्याची भीती व्यक्त केली आहे. तसेच विधिमंडळाच्या अधिवेशनाची अधिकृत घोषणा झाल्यावरच कर्मचार्यांची उपस्थिती वाढवण्याबाबत विचार करण्याची मागणी संघटनेने केली आहे.
Coronavirus | राजभवनातील कोरोना बाधितांचा आकडा वाढताच; आणखी 5 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)