एक्स्प्लोर
राधेश्याम मोपलवार ईडी आणि सीबीआयच्या रडारवर
चौकशीपर्यंत पदच्युत करण्यात आल्यानंतर वरिष्ठ सनदी अधिकारी मोपलवार आता विविध तपास यंत्रणांच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकणार आहेत.
मुंबई : एबीपी माझाच्या बातमीनंतर वरिष्ठ सनदी अधिकारी आणि समृद्धी महामार्ग प्रकल्पाचे प्रमुख अधिकारी राधेश्याम मोपलवार यांना चौकशीपर्यंत पदच्युत करण्यात आल्यानंतर आता ते विविध तपास यंत्रणांच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकणार असल्याचं समजतं आहे. मोपलवारांवर सेटलमेंटचा आरोप होत आहे.
अंमलबजावणी संचलनालय म्हणजेच ईडीनं मोपलवारांच्या चौकशीची तयारी पूर्ण केल्याची माहिती सुत्रांकडून समजते आहे. तर मोपलवार हे आयकर विभाग आणि सीबीआयच्याही रडारवर असल्याचं सुत्रांनी सांगितलं आहे.
दरम्यान, मोपलवार यांच्याविरुद्ध सीबीआय आणि आयकर खात्याकडे याआधीही तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यावेळी तपास यंत्रणांनी याबाबत राज्य सरकाराकडे मोपलवार यांच्याविरुद्ध माहिती मागवली होती. पण त्यावेळी मोपलवारांविषयी पुरेशी माहिती त्यांना मिळाली नव्हती. मात्र, एबीपी माझाच्या बातमीनंतर आता पुन्हा एकदा तपास यंत्रणांनी सरकारकडून मोपलवारांविषयी सर्व माहिती मागवली आहे.
आयकर खातं आणि सीबीआयकडूनही मोपलवार यांची चौकशी होणार आहे. तर ईडीही चौकशीच्या तयारीत आहे. मात्र, अद्याप तरी ईडीकडून कोणतीही नोटीस अथवा समन्स मोपलवार यांना बजावण्यात आलेलं नाही.
दुसरीकडे मोपलवारांची वादग्रस्त ऑडिओ क्लीप खरी असल्याचा दावाही मध्यस्थी सतीश मांगलेनं केला आहे. त्यामुळे मोपलवारांच्या अडचणीत आणखी वाढ होणार आहे.
मोपलवारांची ‘ती’ ऑडिओ क्लीप खरी आहे : सतीश मांगले
‘मोपलवारांची ती ऑडिओ क्लीप खरी आहे. मोपलवारांशी मीच बोलत होतो. त्यामधील आवाजही माझाच आहे. या प्रकरणात मी माफीचा साक्षीदार होण्यास तयार आहे. ऑडिओ क्लीपसंबंधीची सगळी माहिती माझ्याकडे आहे. मी किंवा इतर कुणीही जर ब्लॅकमेल करत असेल तर मोपलवारांनी याबाबत आतापर्यंत तक्रार का दिली नाही?, दरम्यान, याआधी एकदा माझं अपहरणही करण्यात आलं होतं. त्यामुळे माझ्या जीवाला सध्या धोका आहे. म्हणून मला पोलीस संरक्षण देण्यात यावं.’ असं मांगलेनं सांगितलं.
या प्रकरणातील मी सीडी सीएमओ आणि पीएमओपर्यंत दिली आहे. त्यातील काही भाग कुणीतरी व्हायरल केला. माझ्यासारखे मोपलवारांकडे कामं घेऊन येणारे अनेकजण आहेत. ते काही कामं घेऊन येतात बिल्डरांची. नियमबाह्य कामांची फाईल मी मोपलवारांकडे घेऊन जायचो. त्यानंतर ते पुढे कुणाशी बोलायचे ते मला माहित नाही. पण त्यानंतर संबंधित फाईल क्लीअर करण्यासाठी किती पैसे ते सांगायचे.’ अशी धक्कादायक माहिती मध्यस्थी सतीश मांगलेनं दिली आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
सुरुवातीपासून वादग्रस्त ठरलेला समृद्धी महामार्ग प्रकल्प आता एका नव्या वादात सापडण्याची शक्यता आहे. या प्रकल्पाचे प्रमुख अधिकारी राधेश्याम मोपलवार यांचे वादग्रस्त फोन संभाषणं समृद्धी महामार्गाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर व्हायरल झाले आहेत. या ऑडिओ क्लीपची सत्यता एबीपी माझाने तपासलेली नाही.
ज्या समृद्धी महामार्गावरून सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये रण सुरु आहे, त्याच महामार्गाची जबाबदारी असलेल्या एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष आणि संस्थापकीय संचालक मोपलवार यांच्यावर एक गंभीर आरोप झाला आहे. धक्कादायक म्हणजे हा आरोप सेटलमेंटचा आहे. शेतकऱ्यांच्या मते या ऑडिओ क्लिपमध्ये मोपलवार आणि एक मध्यस्थ यांच्यात एका इमारतीच्या बांधकामावरून सेटलमेंट सुरु आहे.
‘त्या’ ऑडिओ क्लिपमध्ये काय आहे?
मोपलवार – जाल मेहता नाव सांगितलं ना तुम्ही? मध्यस्थी – हो.. जाल मेहता. मोपलवार – त्याला सांगा आपण त्याला 15 हजार स्क्वेअर फुटचा प्लॉट देतोय. मध्यस्थी – कुठे? मोपलवार – अरे तो बोरीवलीचा.. त्याला मंत्रालयात काही द्यावे लागतील.. आपल्याकडे..त्याला कोट करा 1 कोटी रुपये.. मध्यस्थी – अच्छा मोपलवार – त्याला आपण दिलेल्या प्लॉटमुळे हजार स्क्वेअर फुटचे 50 फ्लॅट विकायला मिळतील… मंत्रालयात 1 – 2 दिले तर ती जमीन मिळून जाईल. मध्यस्थी – म्हणजे टोटल मंत्रालय पकडून त्याला 4 करोडचा खर्च आहे.. मोपलवार – एक दोन पकडून काय असेल ते असेल… आपल्याकडे एकच्या खाली घेणार नाही.. नाहीतर सोडून द्या विषय. कुठल्याच फ्रेममध्ये बसत नाही ते मध्यस्थी – नियमबाह्य आहे म्हणून एवढं करावंच लागेल मोपलवार – 1500 मीटर, त्यात स्लम असल्यामुळे 2.5 चा एफएसआय मिळेल. एकूण त्याला 50 हजार स्क्वेअर फिटचे फ्लॅट सेल करायला मिळतील. 10 हजार पर स्क्वेअर फिट जरी म्हटलं तरी 50 कोटी रुपयांचे फ्लॅट होतील. त्यात 30 – 40 कोटी खर्च म्हटला तरी 10 कोटी त्याचा फायदा आहे. मध्यस्थी – त्याला वाढवून सांगू की आहे तसच? मोपलवार – सांगा तुम्ही… आधी काय म्हणतोय बघू.. मोपलवार – अशोक सखाराम उबाळे या हिरोचा फोन आला..त्याला नाही म्हणून सांग.. मध्यस्थी – काय म्हणून? मोपलवार – कुठल्या तरी मंडल अधिकाऱ्याची वसई जिल्ह्यातून ठाणे जिल्ह्यात बदली करायला. या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात बदली जमत नाही… नाही म्हणून सांग त्याला..बाकी त्याला सांगून टाक.या संभाषणात मोपलवार आहेत की नाहीत, याची पुष्टी आम्ही करत नाही… पण समृद्धी महामार्गाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर सध्या या आणि अशा अनेक ऑडिओ क्लिप्सची जोरदार चर्चा आहे. मोपलवारांची कारकीर्द वादग्रस्त कारकीर्द असलेल्या मोपलवारांना आघाडी सरकारच्या काळापासून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि कोकण विभागीय आयुक्त अशा प्लम पोस्टिंग मिळाल्या आहेत. भाजप सरकार आल्यानंतरही त्यांना मर्जीची खाती मिळाली. मोपलवारांचं स्पष्टीकरण ”माझ्यावर केलेले आरोप हे मला बदनाम करण्याचं षडयंत्र आहे. समृद्धीची जबाबदारी माझ्यावर असल्यामुळे माझ्यावर आरोप होत आहेत. काही लोक माझ्या खाजगी आयुष्याला लक्ष करून मला ब्लॅकमेल करत आहेत. यापूर्वीच्या प्रकरणांमध्ये चौकशी सुरू आहे आणि चौकशीअंती तथ्य समोर येईल.” असं स्पष्टीकरण मोपलवार यांनी दिलं. संबंधित बातम्या : ‘मोपलवारांसोबतची ‘ती’ ऑडिओ क्लीप खरी, तो आवाज माझाच’ एबीपी माझाचा गौप्यस्फोट, महामार्गात दलालांची ‘समृद्धी’?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement