मीरा-भाईंदर महापालिकेत बाळासाहेब ठाकरे कलादालनावरुन शिवसेना-भाजप नगरसेवक आमने-सामने
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कलादालनाचा विषय गेल्या तीन वर्षांपासून प्रतिक्षेत आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वीची ही कदाचित शेवटची बैठक असल्याने हा विषय पटलावर घ्यावा, अशी शिवसैनिकांची मागणी होती.
मिरा रोड : मीरा-भाईंदर महापालिकेमध्ये शिवसेना आणि भाजप नगरसेवकांमधील वाद शिगेला पोहोचला आहे. मीरा-भाईंदर महापालिकेत स्थायी समितीच्या बैठकीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कलादालनाच्या विषयाचा समावेश न केल्याने शिवसेनेच्या नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा घेतला.
मीरा-भाईंदर महापालिकेत मंगळवारी स्थायी समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. राज्यात आचारसंहिता लागू होण्यापूर्वीची ही कदाचित शेवटची बैठक असल्याने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कला दालनाचा विषय पटलावर घ्यावा, अशी शिवसेनेच्या नगरसेवकांची मागणी होती. मात्र महापौरांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने शिवसेनेचे नगरसेवक आक्रमक झाले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कलादालनाचा विषय गेल्या तीन वर्षांपासून प्रतिक्षेत आहे. त्यामुळे शिवसेनेच्या नगरसेवकांच्या आक्रमक पवित्र्यानंतर महापौरांनी सभा तहकूब केली. त्यानंतर शिवसेना-भाजपच्या नगरसेवकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. यावेळी शिवसेनेच्या नगरसेवकांनी भाजपचे स्थानिक आमदार नरेंद्र मेहतांना शिवीगाळ करत महापौर कार्यालय, स्थायी समिती सभागृहाची तोडफोड केली.
राज्यात युती झाली तरी मीरा-भाईंदरमध्ये युती होणार नाही, अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या. मीरा भाईंदर महापालिकेमध्ये भाजपचे 61 तर शिवसेनेचे 22 नगरसेवक आहेत. त्यामुळे मीरा भाईंदरमधील वादाची दखल दोन्ही पक्षातील वरिष्ठ नेते कसे घेणार आणि यातून काय मार्ग काढणार हे येत्या काळात समोर येईल.