नितेश राणेंच्या विरोधात मुंबईत पोस्टरबाजी, कारवाई करण्याची प्रसाद लाड यांची मगणी
भाजप आमदार नितेश राणे यांच्याविरोधात मुंबईत पोस्टरबाजी करण्यात आली आहे. मुंबईत चर्चगेट आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात लावलेले पोस्टर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
मुंबई : भाजप आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. त्यानंतर आता नितेश राणे यांच्याविरोधात मुंबईत पोस्टरबाजी करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईत चर्चगेट आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात लावलेले पोस्टर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या बॅनरवर नितेश राणे यांचा एक फोटो असून ते हरवले आहेत. त्यांना शोधून काढणाऱ्याला कोंबडी बक्षीस देण्यात येईल, असे म्हटले आहे. तर पिंपरी चिंचवडमध्ये भाजपाकडून राणेंच्या समर्थनार्थ होर्डिंग लावण्यात आले आहेत. मात्र, नितश राणेंच्या विरोधात लावलेल्या या पोस्टरचा भाजपने निषेध केला आहे.
पोस्टर लावणाऱ्यांवर कारवाई करावी - प्रसाद लाड
या पोस्टरबाबत भाजपने निषेध केला आहे. भाजपचे आमदार प्रसाद लाड हे या घटनेबाबत माटुंगा पोलीस स्थानकात गेले होते. सरकारला घाबरुन हे काम चालले आहे का? असा संशय आमच्या मनात असल्याचे प्रसाद लाड यावेळी म्हणाले. ज्यांनी हे पोस्टर लावण्याचे कृत्य केले आहे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. यामागे कोणाचा हात आहे, हे कळले पाहिजे. हे पोस्टर सगळीकडे सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. आम्हाला पोलीस सहकार्य करतील अशी अपेक्षा असल्याचे यावेळी प्रसाद लाड यांनी सांगितले.
शिवसैनिक संतोष परब यांच्यावर 18 डिसेंबरला हल्ल्या झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी 6 संशयीतांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्यांची चौकशीही करण्यात आली आहे. याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, नितेश राणेंचा काल सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे आता नितेश राणेंवर अटकेची टांगती तलवार अद्याप कायम आहे. अशातच, मुंबईत राणेंच्या विरोधात बॅनरबाजी केली आहे. हे बॅनर कोणी लावले आहेत, याबाबत त्यावर काहीही उल्लेख करण्यात आलेला नाही. त्यामुळे हे बॅनर कोणी लावले, याची जोरदार चर्चा सध्या सुरु आहे. हे बॅनर सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
- सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर भाजपची निर्विवाद सत्ता; महाविकास आघाडीचा पराभव, राणे पॅटर्नचा डंका, कार्यकर्त्यांचा जल्लोष
- सतीश सावंत यांच्या पराभवानंतर अज्ञातवासात असलेल्या नितेश राणेंची पोस्ट; म्हणाले, 'गाडलाच'