Pooja Chavan Death Case: वनमंत्री संजय राठोड यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढला
संजय राठोड यांच्या मुद्द्यावरून अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधक आक्रमक होणार हे नक्की. संपूर्ण अधिवेशन संजय राठोड यांच्या मुद्दाने गाजण्याची शक्यता आहे.
मुंबई : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी विविध आरोप होत असलेले वनमंत्री संजय राठोड यांच्यावर राजीनामा देण्यासाठी दबाव वाढला आहे. संजय राठोड यांच्यामुळे महाविकास आघाडी सरकारची बदनामी होत आहे. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील नाराज असल्याचं बोललं जात आहे. भाजपने सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेत राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होण्यापूर्वी याबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. संजय राठोड यांच्या मुद्द्यावरून अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधक आक्रमक होणार हे नक्की. संपूर्ण अधिवेशन संजय राठोड यांच्या मुद्दाने गाजण्याची शक्यता आहे.
संजय राठोड यांनी राजीनामा न दिल्यास आम्ही अधिवेशन चालूच देणार नाही- अतुल भातखळकर
संजय राठोड यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करुन त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला हवा होता. अधिवेशनाच्या आधी राजीनामा घेणार असं बोललं जात आहे, मग हे सरकार कसली वाट पाहतय. महिलांवर अत्याचार करणाऱ्या मंत्र्यांना संरक्षण देणारं हे सरकार आहे. संजय राठोड यांनी राजीनामा न दिल्यास आम्ही अधिवेशन चालूच देणार नाही, असं भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी सांगितलं.
Pooja Chavan Death Case | संजय राठोड याला चपलेनं झोडलं पाहिजे : चित्रा वाघ
संजय राठोड यांनी स्वत: राजीनामा द्यावा- तृप्ती देसाई
संजय राठोड यांनी स्वत: राजीनामा देणे गरजेचं आहे. फोटो, ऑडियो क्लिप्स समोर आल्या आहेत, पोहरादेवी शक्तीप्रदर्शन या पार्श्वभूमीवर संजय राठोड यांनी राजीनामा देणे गरजेचं आहे. उद्धव ठाकरे स्वच्छ प्रतिमेचे मुख्यमंत्री आहेत. त्यांचा मान राखून संजय राठोड यांनी स्वत: राजीना दिला पाहिजे, असं भूमात ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी म्हटलं आहे. संजय राठोड यांनी राजीनामा दिला नाही तर आम्ही देखील आक्रमक होऊन आंदोलन करु असा इशाराही त्यांनी दिला आहे.