एक्स्प्लोर
‘...तर मी नीरव मोदीला चप्पलने मारेन’
‘या संपूर्ण घोटाळ्याला नीरव मोदीच जबाबदार आहे. तो माझ्यासमोर आला तर मी त्याला चप्पलने मारेन. हवं तर सगळ्या चॅनलवर दाखवा.'

मुंबई : ‘नीरव मोदी जर माझ्यासमोर आला तर त्याला चप्पलने मारेन...’ अशा संतप्त शब्दात नीरव मोदीच्या कंपनीत कामाला असलेले अधिकारी अर्जुन पाटील यांच्या पत्नी सुजाता पाटील यांनी संताप व्यक्त केला. नीरव मोदीच्या कर्माची फळं आम्ही आणि हजारो कर्मचारी भोगत असल्याची खंतही सुजाता पाटील यांनी यावेळी व्यक्त केली. या संपूर्ण प्रकरणी माध्यमांशी बोलताना सुजाता पाटील यांनी फारच उद्विग्न प्रतिक्रिया दिली. सुजाता पाटील नेमकं काय म्हणाल्या? ‘या संपूर्ण प्रकरणात माझ्या पतींना अडकवण्यात आलं आहे. कोणत्याही गुन्ह्यात त्यांचा समावेश नाही. एका सामान्य माणसाला यामध्ये खूप वाईट पद्धतीने अडकवलं आहे. माझ्या नवऱ्याच्या केसाला जरी धक्का लागला तर बघा... आतापर्यंतआमची झालेली बदनामी कोण भरुन देणार आहे? माझ्या घरी येऊन बघा, काहीही मिळणार नाही तुम्हाला, अजून मी माझ्या घरादाराचं कर्ज फेडते आहे. माझी लहान मुलं आहेत. त्यामुळे मला काहीही नको, मला माझा नवरा सहीसलामत समोर हवा आहे.’ असं सुजाता पाटील यावेळी म्हणाल्या. ‘या संपूर्ण घोटाळ्याला नीरव मोदीच जबाबदार आहे. तो माझ्यासमोर आला तर मी त्याला चप्पलने मारेन. हवं तर सगळ्या चॅनलवर दाखवा. 2800 कर्मचाऱ्यांची चूल आज बंद झाली आहे. त्याला जबाबदार कोण? साधा पेपरवर्क करणाऱ्या माणसाला तुम्ही अडकवता? माझ्या मुलाबाळांना मी काय उत्तर देऊ? मला 100 टक्के विश्वास आहे की, माझे पती पूर्णपणे निर्दोष आहेत.’ अशा शब्दात सुजाता पाटील यांनी आपल्या पतीची बाजू यावेळी मांडली.' VIDEO : आतापर्यंत कुणाकुणाला अटक? या प्रकरणी अद्याप 12 जणांना अटक करण्यात आली आहे. मंगळवारीही सीबीआयने नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्या कंपनीच्या पाच कर्मचाऱ्यांना अटक केली. यामध्ये नीरव मोदीच्या कंपनीचा सीएफओ विपुल अंबानीची अटक सर्वात मोठी कारवाई आहे. घोटाळा कसा झाला? नीरव मोदी आणि त्यांच्या तीन सहकाऱ्यांनी आपल्या तीन कंपन्यांद्वारे हे षडयंत्र रचल्याचा आरोप आहे. तीन कंपन्यांच्या नावावर हाँगकाँगमधून सामान येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. सामान मागवण्यासाठी लेटर ऑफ अंडरटेकिंगची मागणी बँकेकडे केली. लेटर ऑफ अंडरटेकिंग म्हणजे मागवण्यात आलेल्या सामानाचे पैसे देण्याची जबाबदारी बँक घेत असल्याचं पत्र. हेच पत्र अलाहाबाद बँक आणि अॅक्सिस बँकेच्या हाँगकाँगमधल्या शाखांच्या नावावर काढण्याची मागणी केली. याद्वारे हाँगकाँगहून 280 कोटी रुपयांचं सामान मागवण्यात आलं. पीएनबीने हाँगकाँगमधील अलाहाबाद बँकेला 5 आणि अॅक्सिस बँकेला 3 लेटर ऑफ अंडरटेकिंग जारी केली आणि जवळपास 280 कोटी रुपयांचं सामान आणण्यात आलं. 18 जानेवारीला या तिन्ही कंपन्यांचे संबंधित अधिकारी पीएनबीच्या मुंबई शाखेत गेले आणि त्यांनी सामानाचे पैसे भरण्यास सांगितलं. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी बँकेचं लेटर दाखवलं आणि पेमेंटची मागणी केली. जितके पैसे परदेशात पाठवायचे आहेत, तितकी कॅश भरायला बँक अधिकाऱ्यांनी सांगितलं. मात्र बँकेने जेव्हा चौकशी केली तेव्हा त्यांची झोपच उडाली. कारण बँकेत एक रुपयाही न ठेवता या कंपन्यांनी लेटर ऑफ अंडरटेकिंग जारी करायला लावल्याचं उघड झालं. बँकेने तक्रार दाखल केली असून हे प्रकरण आता सीबीआयपर्यंत पोहोचलं आहे. नीरव मोदी यांना जारी केलेले आठही लेटर ऑफ अंडरटेकिंग बनावट असल्याचं उघड झालं. पीएनबीचे डेप्युटी मॅनेजर गोकुळनाथ शेट्टी यांनी एका कर्मचाऱ्याला हाताशी घेऊन हे लेटर जारी केल्याची माहिती आहे. त्यामुळे आता 280 कोटी रुपये पीएनबीला चुकते करावे लागणार आहेत. संबंधित बातम्या : पीएनबी घोटाळा : छोटे मासे गळाला, 3 आरोपींना 14 दिवसांची CBI कोठडी PNB चा तत्कालीन शाखा उपव्यवस्थापक गोकुळनाथसह तिघांना अटक PNB घोटाळा : 5 हजार कोटींचा गैरव्यवहार एनडीएच्या काळात PNB घोटाळा : नीरव मोदी, मेहुल चोक्सीचे पासपोर्ट रद्द पीएनबी घोटाळा : अकरा हजार कोटी परत कसे मिळणार? PNB घोटाळा : लेटर ऑफ अंडरटेकिंग म्हणजे काय? PNB ला 11 हजार कोटींना गंडवणारे नीरव मोदी देशाबाहेर पळाले पीएनबी घोटाळा : डायमंड किंग नीरव मोदीवर गुन्हा दाखल
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रिकेट
बुलढाणा
राजकारण























