एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
PNB ला 11 हजार कोटींना गंडवणारे नीरव मोदी देशाबाहेर पळाले
हिरे व्यापारी नीरव मोदी यांनी आपल्या मित्रांच्या सहाय्यानं पँजाब नॅशनल बँकेला हा गंडा घातल्याचा आरोप आहे.
![PNB ला 11 हजार कोटींना गंडवणारे नीरव मोदी देशाबाहेर पळाले PNB Fraud Case accuse Diamond King Nirav Modi ran out of India latest update PNB ला 11 हजार कोटींना गंडवणारे नीरव मोदी देशाबाहेर पळाले](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/02/15090240/Diamond-King-Nirav-Modi-PNB-Fraud.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : पंजाब नॅशनल बँकेच्या घोटाळ्यातील मुख्य आरोपी आणि हिऱ्याचे व्यापारी नीरव मोदी सध्या देशात नाही तर परदेशात असल्याची माहिती समोर आली आहे. पंजाब नॅशनल बँकेच्या मुंबईतील ब्रिच कँडी शाखेत तब्बल 11 हजार 360 कोटींचा घोटाळा झाल्याचं उघड झालं आहे.
हिरे व्यापारी नीरव मोदी यांनी आपल्या मित्रांच्या सहाय्यानं पंजाब नॅशनल बँकेला हा गंडा घातल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर शेअर बाजारात बँकेचे शेअर जोरदार कोसळले. त्यामुळे पीएनबीने मुंबई शेअर बाजाराला पत्र लिहिलं.
280 कोटी रुपयांच्या घोटाळ्याची तक्रार अगोदरच देण्यात आली आहे. नीरव मोदी यांची आई आणि भावाविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाय पीएनबीने सीबीआयला लूकआऊट नोटीस जारी करण्यास सांगितलं आहे.
पंजाब नॅशनल बँकेच्या काही अकांऊट्सद्वारे गैरव्यवहार झाल्याचं उघड झालं होतं. काही खातेदारांच्या संगनमतानं हे व्यवहार झाल्याचं बँकेच्या निदर्शनास आलं. इतर बॅंकांकडूनही परदेशात या ठराविक व्यक्तींच्या खात्यामध्ये पैसा पाठवण्यात आला होता. बॅंकेनी हा प्रकार उघड होताच रितसर तक्रार केली.
घोटाळा कसा झाला?
नीरव मोदी आणि त्यांच्या तीन सहकाऱ्यांनी आपल्या तीन कंपन्यांद्वारे हे षडयंत्र रचल्याचा आरोप आहे. तीन कंपन्यांच्या नावावर हाँगकाँगमधून सामान येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. सामान मागवण्यासाठी लेटर ऑफ अंडरटेकिंगची मागणी बँकेकडे केली.
लेटर ऑफ अंडरटेकिंग म्हणजे मागवण्यात आलेल्या सामानाचे पैसे देण्याची जबाबदारी बँक घेत असल्याचं पत्र. हेच पत्र अलाहाबाद बँक आणि अॅक्सिस बँकेच्या हाँगकाँगमधल्या शाखांच्या नावावर काढण्याची मागणी केली. याद्वारे हाँगकाँगहून 280 कोटी रुपयांचं सामान मागवण्यात आलं.
पीएनबीने हाँगकाँगमधील अलाहाबाद बँकेला 5 आणि अॅक्सिस बँकेला 3 लेटर ऑफ अंडरटेकिंग जारी केली आणि जवळपास 280 कोटी रुपयांचं सामान आणण्यात आलं. 18 जानेवारीला या तिन्ही कंपन्यांचे संबंधित अधिकारी पीएनबीच्या मुंबई शाखेत गेले आणि त्यांनी सामानाचे पैसे भरण्यास सांगितलं.
कंपनीच्या अधिकाऱ्यांनी बँकेचं लेटर दाखवलं आणि पेमेंटची मागणी केली. जितके पैसे परदेशात पाठवायचे आहेत, तितकी कॅश भरायला बँक अधिकाऱ्यांनी सांगितलं. मात्र बँकेने जेव्हा चौकशी केली तेव्हा त्यांची झोपच उडाली. कारण बँकेत एक रुपयाही न ठेवता या कंपन्यांनी लेटर ऑफ अंडरटेकिंग जारी करायला लावल्याचं उघड झालं.
बँकेने तक्रार दाखल केली असून हे प्रकरण आता सीबीआयपर्यंत पोहोचलं आहे. नीरव मोदी यांना जारी केलेले आठही लेटर ऑफ अंडरटेकिंग बनावट असल्याचं उघड झालं. पीएनबीचे डेप्युटी मॅनेजर गोकुळनाथ शेट्टी यांनी एका कर्मचाऱ्याला हाताशी घेऊन हे लेटर जारी केल्याची माहिती आहे. त्यामुळे आता 280 कोटी रुपये पीएनबीला चुकते करावे लागणार आहेत.
नीरव मोदी कोण आहेत?
नीरव मोदी भारतातील मोठे हिरे व्यापारी आहेत. त्यांना भारतातील 'डायमंड किंग' असंही संबोधलं जातं. 48 वर्षीय नीरव मोदी फोर्ब्जया जगभरातील श्रीमंतांच्या यादीत 84 व्या स्थानावर आहे. फोर्ब्जच्या आकडेवारीनुसार नीरव मोदी यांची जवळपास 12 हजार कोटींची संपत्ती आहे.
नीरव मोदी यांची फाईव्ह स्टार डायमंड नावाची कंपनी आहे. त्यांनी 'नीरव मोदी डायमंड ब्रँड' या नावाने भारतासह जगभरात ज्वेलरी शोरुम सुरु केली आहेत. दिल्ली, मुंबईपासून ते लंडन, हाँगकाँग आणि न्यूयॉर्कपर्यंत नीरव मोदींची 25 लग्झरी स्टोअर्स आहेत.
नीरव मोदी यांच्या ज्वेलरीची किंमत 10 लाखांपासून 50 कोटी रुपयांपर्यंत आहे. बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा 'नीरव मोदी डायमंड ब्रँड'ची ब्रँड अॅम्बेसेडर आहे. केट विंसलेट आणि डकोटा जॉनसन यांच्यासारख्या हॉलिवूड अभिनेत्री नीरव मोदींच्या ज्वेलरीच्या ग्राहक आहेत. नीरव मोदींचे वडीलही हिरे व्यापारी आहेत. नीरव मोदींनी सुरुवातीचं शिक्षण अमेरिकेत घेतलं. अमेरिकेहून भारतात परतल्यानंतर व्यवसाय सुरु केला.
पीएनबी देशातली पहिली स्वदेशी बँक
122 वर्ष जुनी पीएनबी देशातली सर्वात मोठी दुसरी बँक आहे. पीएनबीचे एकूण 10 कोटी खातेधारक आहेत. तर देशात बँकेच्या एकूण 6941 शाखा, 9753 एटीएम सेंटर आहेत. पीएनबीचा 2017 या वर्षातील निव्वळ नफा 904 कोटी रुपयांचा आहे आणि एकूण एनपीए 57 हजार 630 कोटी रुपये आहे. देशातून फरार असलेल्या उद्योगपती विजय मल्ल्याकडे पीएनबीचं 815 कोटींचं कर्ज आहे. स्टेट बँक ऑफ इंडियानंतर पीएनबी देशातली सर्वात मोठी दुसरी बँक आहे.
संबंधित बातम्या :
पीएनबी घोटाळा : डायमंड किंग नीरव मोदीवर गुन्हा दाखल
पंजाब नॅशनल बँकेच्या मुंबईतील शाखेत 11 हजार कोटींचा गैरव्यवहार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
भारत
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)