(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पीएमसीच्या खातेधारकांचं आरबीआयसमोर आंदोलन, 'मातोश्री'बाहेरही ठिय्या
पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपींवर लवकरात लवकर कारवाई केली जावी. तसेच सर्व खातेधारकांचे पैसे लवकरात लवकर त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावेत, या प्रमुख मागण्यांसह पीएमसी बँक खातेधारक आंदोलन करत आहेत.
मुंबई : पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपींवर कारवाई व्हावी. तसेच सर्व खातेधारकांचे पैसे लवकरात लवकर परत मिळावेत, या मागण्यांसाठी पीएमसी बँकेच्या खातेधारकांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कार्यालयासमोर आंदोलन सुरु केलं आहे. 'आरबीआय चोर है' अशा घोषणा देत आंदोलक आक्रमक झाले आहेत.
मागील सात दिवसांपासून मुंबईच्या आझाद मैदानात पीएमसी खातेधारकांचं आंदोलन सुरु आहे. आझाद मैदानात सुरु असलेल्या आंदोलनाकडे सरकार दुर्लक्ष करत असल्यामुळे पीएमसी बँकेच्या खातेधारकांनी आज आरबीआयच्या कार्यालयासमोर आंदोलन सुरु केले. तरीही शासनाकडून कारवाई होत नाही, असा आरोप आंदोनकर्ते पीएमसी खातेधारक करत आहेत.
पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपींवर लवकरात लवकर कारवाई केली जावी. तसेच सर्व खातेधारकांचे पैसे लवकरात लवकर त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावेत, या आंदोलनकर्त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. आज आरबीआयच्या कार्यालयासमोर केलेल्या आंदोलनात मोठ्या प्रमाणात पीएमसी बँक खातेधारक सहभागी झाले होते.
पीएमसी बँकेतील घोटाळ्याबाबत आरबीआयला 2011 पासूनच माहिती होती. तरीदेखील त्यांनी कारवाई केली नाही, असा आरोपदेखील आंदोलकांनी यावेळी केला.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीबाहेर आंदोलन करणाऱ्या खातेधारकांची भेट घेत त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच खातेधारकांना उद्धव ठाकरे यांनी आश्वासन दिलं आहे की, राज्य सरकारकडून जे सहकार्य करता येईल ते करु.
वाचा : आरबीआयने पैसे बुडवले नाहीत, पीएमसी खातेधारकांचे अधिक नुकसान होण्यापासून वाचवले : हायकोर्ट
पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँक अर्थात पीएमसी बँक प्रकरणात गेल्या आठवड्यात तीन माजी संचालकांना अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. मुक्ती बाविसी, तृप्ती बने आणि जगदीश मोखे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या तीन अटकेनंतर पीएमसी बँक घोटाळा प्रकरणात आतापर्यंत अटक करण्यात आलेल्यांची संख्या 12 वर पोहोचली आहे.
दरम्यान, भाजपचे माजी आमदार सरदार तारा सिंह यांचा मुलगा रजनीत सिंहला 16 नोव्हेंबरला याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. रजनीत सिंह पीएमसी बँकेचा रिकव्हरी बोर्डचा संचालक होता.
वाचा : पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी 12 जणांना अटक
पीएमसी बँकेचा 4,355 कोटी रुपयांचा घोटाळा समोर आल्यानंतर रिझर्व्ह बँकेने काही निर्बंध आणले, ज्याचा फटका खातेदारांना बसला. रिझर्व्ह बँकेने पीएमसी बँकेतून पैसे काढण्यावर निर्बंध आणले, या तणावामुळे काही खातेदारांचा मृत्यू सुद्धा झाला. हे पैसे परत मिळवण्यासाठी खातेधारकांवर आंदोलन करण्याची वेळ आली आहे.