(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Tiktok | टिकटॉक' अॅपवर बंदीसाठी उच्च न्यायालयात याचिका
टिकटॉक हे एक चायनीज मोबाईल अॅप्लिकेशन असल्याने यामागे भारताविरोधात छुपा मनसुबाही असू शकतो, अशी शक्यता या याचिकेतून व्यक्त करण्यात आली आहे.
मुंबई : सध्या तरुणाईला वेड लावणाऱ्या टिकटॉक या मोबाईल अॅपविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. हिना दरवेश या मुंबईतील गृहिणीकडून टिकटॉकवर बंदी आणण्याची मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे. तीन मुलांची आई असलेल्या हिना यांचा आरोप आहे की, टिकटॉकमुळे मुलांवर वाईट संस्कार होतात. या अॅपमध्ये अश्लील व्हिडीओ अधिक असतात. या व्यंगात्मक व्हिडीओजमुळे तरुणाईत आत्महत्यांचं प्रमाणदेखील वाढत आहे. तसेच यात अनेकदा जातीवाचक मुद्यांवरही व्हिडीओ प्रसारित केले जातात, ज्यामुळे देशात जातीयवाद भडकू शकतो.
टिकटॉक हे एक चायनीज मोबाईल अॅप्लिकेशन असल्याने यामागे भारताविरोधात छुपा मनसुबाही असू शकतो, अशी शक्यता या याचिकेतून व्यक्त करण्यात आली आहे. टिकटॉकवरील व्हिडीओजमुळे देशाची प्रतिमा आंतरराष्ट्रीय पातळीवर मलीन होत आहे. ज्याचा एकंदरित परिणाम देशाच्या विकासावरही होत असल्याचा दावा या याचिकेतून करण्यात आला आहे. हिना दरवेश यांनी अॅड. अली काशिफ खान यांच्यामार्फत दाखल केलेल्या या याचिकेवर लवकरच उच्च न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे.
VIDEO | Tiktok | टिकटॉक व्हिडीओचा नाद तरुणाच्या अंगलट | पालघर
टिकटॉक संदर्भात अनेकदा तक्रार करण्यात आल्या आहेत. धार्मिक भावना दुखावल्याबद्दल मुंबई पोलिसांकडून या संबंधित दोन गुन्ह्यांची नोंदही करण्यात आली आहे. मात्र म्हणावी तशी कठोर कारवाई करण्यात आलेली नाही. याआधी मद्रास उच्च न्यायालयातही टिकटॉकविरोधात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र यावरील सुनावणीनंतर हायकोर्टाने याचिकाकर्त्यांना कोणताही दिलासा देण्यास नकार दिला होता.